डॉक्टर हे देव असतात असं म्हटलं जातं. अर्थात असं म्हणता येईल असे सर्वच डॉक्टर नसतात आणि असं मानणारे सर्वच पेशंट सुद्धा नसतात. मला विचाराल तर डॉक्टर हे देवच आहेत. मी पाहिलेत तेवढे तरी नक्कीच. तरीही दोन्ही बाजू लक्षात घेऊ आपण.
आजकाल 'पैसा फेको, तमाशा देखो' या उक्तीवर भक्ती करून मूठभर डॉक्टरांचे व्यवसाय सुरू आहेत. भरमसाठ शुल्क आकारुन देखील सेवा दर्जेदार नाही. व्यवसाय स्वातंत्र्य असले तरी किमान आपण जे उपद्व्याप करतो त्याचे परिणाम आपल्या व्यवसाय बंधूंना सुद्धा भोगायला लागतात याची चाड बाळगण्यास हरकत नसावी. इतक्या उच्च शिक्षणाने डोक्यात एवढा तरी प्रकाश पडायला हवा.
तसंच सगळ्याच डॉक्टरांना वाईट चष्म्यातून पाहण्याची गरज नाही. कारण बहुतांश डॉक्टर हे चांगलेच असतात. मूठभर लोकांसाठी सर्वांना वाईट ठरवायची गरज नाही. जे डॉक्टर आपल्या दुखण्यावर इलाज करतात त्यांनाच मारहाण करून आपण स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतोय हे सुद्धा न कळण्या इतपत आपल्या लोकांची बुद्धी गंजलेली आहे का? भावनांच्या आहारी जाऊन मारहाण करणं हे निषेधार्हच आहे.
संप करणे ही या दुखण्याची तात्पुरती मलमपट्टी आहे. रामबाण इलाज नव्हे. रामबाण इलाज डॉक्टरांनी नव्हे तर पेशंटनी करायचा आहे. दोन्ही बाजूंनी सामंजस्याची भूमिका असावी. एकमेकांची गैरसोय नको. डॉक्टरांचं हे दुखणं नैसर्गिक नाही तर मानवनिर्मित आहे. हे दुखणं आपण बंद केलं तरच आपल्या भावी दुखण्यांवर इलाज होईल हे समाजबांधवांनी लक्षात ठेवावं. अन्यथा या अवघड अभ्यासक्रमास गुणवंत विद्यार्थी प्रवेशच घेणार नाहीत. असं झाल्यास आपल्या देशाला सुदृढ पाहणं दुरापास्तच होईल.