Tuesday, 18 July 2017

प्राण्यांवर प्रेम...मग मनुष्य हा प्राणी नव्हे का?

आम्ही शाळेत शिकलो मनुष्य हा प्राणी आहे. नंतर अनुभव आले तसे प्राण्यांसोबतच जनावरं सुध्दा भेटली हा भाग वेगळा. विनोद राहू दे. गंभीर मुद्याकडं वळू. गोरक्षण हा आजकाल एक नको तेवढ्या मर्दुमकीचा विषय बनला आहे. मला दोन्ही बाजूनं गोष्टी समोर ठेवायच्या आहेत. Choice is yours.
पहिली बाजू. गायींना का मारतात? जे लोक गाय पालन करतात ते गायी भाकड झाल्या की कत्तलखान्यात विकतात. तिथून मग त्यांची कत्तल होऊन पुढे मांस विक्री वगैरे होते. व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिलं तर ते भाकड गाय विकणं काही चूक नाही. व्यवसायात अनुत्पादक अथवा कमी नफा देणाऱ्या गोष्टी बाजूला करणं बऱ्याचदा गरजेचं असतं. कधी कधी आर्थिक परिस्थितीमुळं अशा गायी सांभाळणं शक्य होतंच असं नाही. पण धार्मिकदृष्टया पाहिलं तर गाय मातेसमान आहे. विकणार्यांना नसेल त्याची किंमत पण मग तथाकथित गोरक्षकांना तर आहे ना? मग ते त्या गायी विकत का घेत नाहीत?
दुसरी बाजू. असा सुध्दा एक प्रकार केला जातो की मुद्दाम लोकांच्या भावना दुखावल्या जाव्यात म्हणून गोमांस खाण्याचा गवगवा करायचा. नको तेवढी त्याला प्रसिद्धी द्यायची. भावना भडकवायच्या. परत दंगा झाला म्हणून ओरडायचं. अजून एक प्रकार आहे. गायींची कत्तल करताना काही लोक मुद्दाम गायींना हाल हाल करून मारतात. कुठला आसुरी आनंद मिळतो त्यातून देव जाणे. मारणार आहात तर इतके हाल करून का मारताय? इतके उद्योग केल्यावर लोक येऊन ठोकणार नाहीतर हात जोडून विनंती करणार?
दोन्ही बाजू मांडून झाल्या. आता माझं मत सांगतो. मध्यंतरी एक मेसेज आला होता. उंदीर मारायच्या औषधांवर का बंदी घालत नाहीत? उंदीर हे गणपतीचं वाहन आहे ना? मुद्दा असा आहे की जी ढोंगी प्रसिद्धी गाय या विषयावर मिळते ती उंदीर या विषयावर मिळणार नाही. मलाही गायीबद्दल आदर आहे. माझ्या लहानपणापासून मी पाहतोय की आमच्या दारात आलेल्या गायीला, श्वानाला कधीही उपाशी पाठवलं जात नाही. हे माझे संस्कार झाले ना. मी कोणाकडून तशी अपेक्षा करणं सुद्धा गैर नाही. पण समजा माझ्या शेजाऱ्यांनी तसं न करता गायीला दारातून हटकलं, दगडं मारली तर त्यांना मी शेजाऱ्यांना मारायचं का? मला जर एकदा कळालं की ते गायीला मारतात तर मी गायीला वाचवलं पाहिजे ना. शेजाऱ्याला मारणं हा उपाय नव्हे. एवढी साधी अक्कल नसेल तर काही उपयोग नाही. गोसेवा करायची आहे तर भाकड गायींची करा. दुभत्या गायी तर सगळेच पाळतात. एका प्राण्याचं रक्षण करायचं म्हणून दुसरा प्राणी मारणे हे दरवेळचं solution असू शकत नाही. कारण तसं करणं हा मानसिक दुबळेपणा देखील असू शकतो. एक घाव दोन तुकडे ठीक आहे. पण घाव कुठं घालायचा हे सुद्धा कळलं पाहिजे. नाहीतर तुकडे हवे तसे होत नाहीत. दुसरे शहाणे आहेत असं अजिबात नाही. पण लक्षात ठेवा घरभेदी तेव्हाच तयार होतात जेव्हा घरातच फूट पडते. तेव्हा ती फूट संपवणे क्रमप्राप्त ठरते. नाहीतर जुने घरभेदी मारून नवीन तयार होतील आणि त्या फुटीचा फायदा घेत राहतील. ढोंगीपणा बास झाला आता. लोकांकडून अपेक्षा ठेवण्यासोबतच आपल्याला जे चांगलं करता येईल ते करू. पण त्यांनी तसं वागावं ही जबरदस्ती अथवा मारहाण योग्य नाही. असा विचार करूया की भाकड गायींच्या गोशाळा उभारता येतील का? मार्केट मधला पुरवठा थांबला तर कायमचा विषय संपेल. पण गोष्टी धगधगत्या ठेवायची दांडगी हौस असेल तर काय करणार? इच्छा प्रामाणिक असेल तर काम करा. दुसऱ्याला मारून आसुरी आनंदा पलीकडे काहीच मिळणार नाही. दुसरा माणूस जनावर आहे म्हणून आपण तसं वागायचं का? आपण मनुष्य प्राणी आहोत, जनावर नाही ही गोष्ट वागण्यातून दिसली पाहिजे. समस्या संपली पाहिजे. मनुष्य प्राणी नव्हे.


टीप - मी स्वतः कधीही मांसाहार केलेला नाही. पण तरीही खाण्याबाबतीत स्वातंत्र्य असावं हे माझं स्पष्ट मत आहे. फक्त जे काही खाल ते गावभर दवंडी पिटून त्यावरून सामाजिक वाद निर्माण करत असाल तर तुमची या समाजात राहण्याची पात्रता नाही. कोणाकडे भाकड गायींसाठी काम करायची योजना असल्यास त्यावर नक्की काम करू.

Tuesday, 11 July 2017

'सद्रक्षणाय' झालं..पण 'खलनिग्रहणाय'चं काय?

कोल्हापूर परिक्षेत्राच्या आदरणीय विशेष पोलिस महानिरीक्षकांना पत्र...

सर्वप्रथम आपल्याला पदभार स्वीकारून 12 जुलैला 1 वर्ष पूर्ण होत आहे त्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा. सामान्य नागरिक या नात्यानं काही चांगल्या-वाईट गोष्टी मांडायची इच्छा आहे. आपण या गोष्टी नक्की विचारात घेऊन त्यावर कार्यवाही कराल याची खात्री वाटते. 
आपल्या पोलिस खात्याचं ब्रीदवाक्य आहे. "सद्रक्षणाय खलनिग्रहणाय". नुकताच आपण कोल्हापूर परिक्षेत्रात हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. लोकांचा जीव वाचावा ही आपली प्रामाणिक इच्छा पाहिली तर त्याबद्दल आपण अभिनंदनास पात्र आहात. रस्त्यांची दुरावस्था वगैरे गोष्टी आपल्या कार्यकक्षेत येत नाहीत. त्यामुळं त्याबद्दल आपणांस दूषणं देता येणार नाहीत. तथापि आपण घेतलेल्या निर्णयामागची भावना पाहून त्याचं स्वागत केलं पाहिजे. सद्रक्षणाचं काम झालं. पण खलनिग्रहणाचं काय? लोकांनी वाहतुकीचे नियम मोडू नये, बेकायदा वाहतूक करू नये म्हणून आपण वाहतूक शाखेसोबत खाकी वर्दीतले पोलिस सांगलीतल्या चौकाचौकात नेमता त्यासोबतच थोडे खाकी वर्दीतले लोक गैरव्यवहार केलेल्या पोलिसांच्या मागावर पाठवले तर तमाम जनतेला खचितच आनंद होईल. जवळपास 3-4 महिने उलटून गेले तरी ते गैरव्यवहार केलेले पोलिस आपणांस एकदाही 'सापडत' नाहीत ही गोष्ट निश्चितच खटकणारी आहे. कारण आपल्याच खात्याच्या सांगलीतील लोकांनी काही वर्षांपूर्वी एका गुन्ह्यात नेपाळ सीमेवर जाऊन आरोपींना अटक केली होती असा इतिहास आहे. म्हणजे गुणवत्तेची वानवा आहे असंही म्हणता येणार नाही? बरं तो गैरव्यवहार काय सर्वसामान्य लोकांनी उघडकीस आणलेला नाही. आपल्याच खात्याच्या लोकांनी उघडकीस आणला आहे. मग चुकतंय काय? दिशा चुकतीय का राजकीय दबाव आहे? बरं हे जे कोण पोलिस आहेत ते अटकपूर्व जामिनासाठी अर्ज वगैरे करतात ती काय आकाशवाणी असते का? विचारा त्यांच्या वकिलाला, कुठं आहेत तुमचे अशील? जो पोलिसी खाक्या गावगुंडांना(प्रसंगी सामान्य जनतेला) दाखवता तो एखाद्या आरोपीच्या वकिलाला दाखवा. आपले कर्मचारी गेले 2 महिने जोरदार वाहनांची तपासणी करत आहेत. मग असे पोलिस घोटाळेबाज पोलिसांना एकदाही पकडू शकत नाहीत? या गोष्टी सर्वसामान्य लोकांना अनाकलनीय आहेत. सांगली-मिरज परिसरात अनेक घरफोड्या, चेन स्नॅचिंग अशा बऱ्याच घटना वरचेवर घडतात. त्यातल्या कित्येकांचा छडा लागलेला नाही. आणि छडा लावून सुद्धा जर मीडिया बातम्या देत नसेल तर मीडियाचा सुद्धा निषेध करू. पण आधी छडा तरी लावणं अपेक्षित आहे. लोकांच्या गाफीलपणानं चोऱ्या,चेन स्नॅचिंग होतात ही गोष्ट सुद्धा नाकारता येणार नाही. आपण याबद्दलच्या केलेल्या आवाहनाला लोक दाद देत नाहीत हे सुद्धा खरं आहे. पण तपासाचं काय हा प्रश्न उरतोच. नो-पार्किंग मधल्या गाड्या उचलताना जी तत्परता दाखवली जाते ती इतर गंभीर गुन्ह्यांचा छडा लावताना का दाखवली जात नाही?
आपलं खातं निष्क्रिय आहे असं अजिबात नाही. पण याला पूर्ण सक्रियतासुद्धा म्हणता येणार नाही असं वाटतं. बऱ्याच अवघड गुन्ह्यांचा छडा आपलं खातं लावतं. त्याबद्दल अभिमानच आहे. परवा मटकेवाल्यांवर हद्दपारीची कारवाई केली त्याबद्दल अभिनंदन. अनेक दिवस त्यावर कारवाई गरजेची होती. पण त्यानंतर अशी बातमी आली की या लोकांनी सांगलीच्या सीमेवरच तळ ठोकलाय आणि पुन्हा उद्योग सुरु केलेत. याची शहानिशा आपण करालंच. पण हे खरं असेल तर तिथूनही त्यांना हद्दपार केलं पाहिजे नाहीतर जेरबंद केलं पाहिजे. तसंच सांगली-मिरज रस्त्यावर पोलिस मुख्यालयासमोरून होणारी अवैध वडाप वाहतूक कोणत्या कारणाने दुर्लक्षित केली जाते? 4-5 प्रवासी अवैधरित्या एका रिक्षात कोंबून आपल्याच लोकांसमोरून वाहतूक सुरु असते तेव्हा कारवाई का केली जात नाही? रोज इतक्या दुचाकी-चारचाकी धारकांची धरपकड सुरू असते (त्याबद्दल आक्षेप नाही कारण त्यामुळं अनेक वेगळे गुन्हे उघडकीस आले आहेत) पण त्यात या वडापवाल्या रिक्षांवर कारवाई का केली जात नाही? या अवैध रिक्षांच्या बेफाम चालवण्यामुळे अनेक किरकोळ अपघात घडत असतात. त्यातले नोंद किती होतात हा वेगळा मुद्दा आहे. नेहमी नाही पण बऱ्याचदा वाहतूक नियंत्रण शाखेचे कर्मचारी एकतर कोपऱ्यात शांत उभे असतात किंवा दंड वसूल करत असतात. अशावेळी वाहतूक नियंत्रण शाखा आहे का वाहतूक कर संकलन शाखा आहे याबद्दल सर्वसामान्यांना प्रश्नच पडतो.
मध्यंतरी माझ्या बाबतीत घडलेला एक किस्सा सांगतो. मी कारमधून चाललो होतो आणि एक माणूस त्याच्या गाडीवरून 2 स्त्रियांना 2 व्हीलर वरून ट्रिपल सीट घेऊन निघाला होता. तो माझ्या गाडीच्या आडवा आला आणि परत मलाच शिव्या द्यायला लागला. मी काही न बोलता पुढच्या चौकात गेलो, काच खाली करून तिथं वाहतूक पोलिसांना सांगितलं की एक व्यक्ती ट्रिपल सीट येत आहे. तर त्या ढिम्मपणे माझ्याकडं बघत राहिल्या. त्यामुळं तो माणूस आरामात चौक ओलांडून पुढं गेला. आणि पुढं जाऊन मला शिव्या देण्यासाठी थांबला होता. हे सुद्धा ते पोलिस बघत होते. पण कारवाई शून्य. हा सगळा प्रकार माझ्या आरशात मला दिसत होता. मी कामाच्या ठिकाणी जात असल्याने या प्रकारासाठी मला वेळ नव्हता. पण ट्रिपल सीटला पकडायचं ही गोष्ट नागरिकांनी सांगून सुद्धा कळत नसेल तर काय डोकं फोडायचं? आपलं खातं इतकं ढिम्म कधी झालं?
वाईट अनुभव सांगितला. पण चांगला अनुभवसुद्धा सांगतो. 4 वर्षांपूर्वी मी मुंबईत गेलो होतो. रात्रीचे 9:30 वाजले होते. बस पकडायची होती. बस स्टॉपला जायला एकही रिक्षा तयार नव्हती. पण एका वाहतूक पोलिसांना विनंती केल्यावर त्यांनी एका रिक्षाला जबरदस्तीने आम्हांला बस स्टॉपला सोडायला लावलं. आजही ती आठवण मनात ताजी आहे. त्यामुळं आपल्या खात्यात माणुसकी आहे याची नागरिकांना वेळोवेळी प्रचिती येत असतेच. पण पुन्हा तोच मुद्दा आहे की सद्रक्षण झालं. पण खलनिग्रहणाचं काय?
या पत्राचा उद्देश पोलिसांवर टीका करायचा नाहीये. पण काही त्रुटी दिसल्या त्या अनाकलनीय आहेत यासाठी हा पत्रप्रपंच. याचा अर्थ कायदा व सुव्यवस्थेची वाईट अवस्था आहे, अराजक माजलंय असं नाही. काम चांगलं सुरू आहे. पण या त्रुटी सुधारल्या तर सर्वोत्तम होईल असं वाटतं. उलट यामाध्यमातून मी विचारू इच्छितो की सामान्य नागरिकांकडून तुम्हांला अपेक्षित असलेलं सहकार्य जाहीर करा. सामूहिक पद्धतीनं त्या अपेक्षांवर काही काम करता येईल का याचाही विचार करू. सततच्या बंदोबस्ताचा ताण, सतत बदलणाऱ्या शिफ्ट, अपुरं मनुष्यबळ, शासकीय घरांची दुरवस्था, ऐनवेळी येणारा राजकीय दबाव याची कल्पना आहे. आपले लोक शासकीय सेवेत असल्यानं खुलेआम बोलू शकत नाहीत. पण खासगीत बोलू शकता. कुठलंही सरकार तुम्हांला चुकीची कामं करायला लावत असेल तर स्थानिक नागरिक तुमच्या बाजूनं उभे राहतील. मग कोणताही सत्ताधारी पक्ष असू दे किंवा कोणीही गृहमंत्री असू दे. पण त्यासाठी स्थानिकांचा विश्वास संपादन करणं आवश्यक आहे. मला याची जाणीव आहे की फक्त समाजमाध्यमे आणि वृत्तपत्रांचे रकाने भरून काही होत नसतं. त्यासाठी आवश्यक कृतीसुध्दा करावी लागते. एक सजग नागरिक म्हणून आम्ही आवश्यक कृती करायला तयार आहोत. फक्त आम्हांला आपलं खातं सहकार्य करेल हा विश्वास हवाय. नाहीतर नेहमी प्रमाणेच समाजमाध्यमांच्या भिंती, वृत्तपत्रांचे रकाने भरले जातील, लोकं टाळ्या वाजवतील आणि मूळ समस्या दुर्लक्षितच राहतील. हेच यावेळी टाळायचं आहे. तुम्ही सद्रक्षण तर करतच आहात. फक्त खलनिग्रहण सुद्धा करावं अशी अपेक्षा. नाहीतर वाईट प्रवृत्ती संपणार कशा? आम्ही लोक तुम्हांला तुमच्या कर्तव्याची जाणीव करून देण्याइतके मोठे नाही. पण ज्या गोष्टी निदर्शनास आल्या त्या समोर ठेवणे गरजेचे वाटले. आज आम्ही जे काही सुरक्षित आहोत ते तुमच्यामुळेच. त्रुटी दाखवल्या याचा अर्थ आपला अनादर करायचा आहे असा होत नाही. आपण सद्रक्षण करता याचा अभिमान आहेच. खलनिग्रहण केलं तर अभिमान नक्कीच वाढेल. कारण अजूनही सामान्य लोकांना पोलिसांचा धाक वाटतो आणि गुंडांना पोलिसांचा धाक वाटत नाही. हीच खरी शोकांतिका आहे. ही परिस्थिती नेमकी विरुद्ध करायची गरज आहे. तरंच आपण सामाजिकदृष्ट्या सक्षम,सुरक्षित आणि प्रगत होऊ.

गर्दी नियंत्रणाचे अडलेले घोडे

  मध्यंतरी महाराष्ट्रात दुर्दैवी अपघात घडला. मुंब्रा-दिवा स्टेशन दरम्यान दोन लोकल शेजारून जाताना त्यातील काही प्रवाशांचा रेल्वे ट्रॅकवर पडून...