Thursday, 7 December 2017

गुजरात: विकासाची नेमकी परिस्थिती काय?


गुजरात विधानसभा निवडणुकीच्या अभ्यासाच्या निमित्ताने गुजरातमध्ये जाण्याची संधी मिळाली. Indian Institute of Democratic Leadership या आमच्या संस्थेनं आम्हा विद्यार्थ्यांना विधानसभा निवडणूक व त्याचा प्रचार कसा असतो त्याचा अभ्यास करता यावा त्यासोबतच अनुभवही मिळावा यासाठी या अभ्यासदौऱ्याचं आयोजन केलं होतं. त्याबद्दल संस्थेचे व सर्व मार्गदर्शकांचे मनःपूर्वक आभार.
आजच्या राजकीय परिस्थितीत गुजरातची निवडणूक प्रमुख राजकीय पक्षांनी प्रचंड प्रतिष्ठेची केली आहे. विकास वेडा झालाय या जाहिरातीच्या पार्श्वभूमीवर विकास वेडा झालाय का तो समजून घेण्याची क्षमता नसणारे लोक वेडे आहेत हे तपासायची सुवर्णसंधी मिळाली. बऱ्यांच वेळा गुजरातवर टीका होते की शहरी भागाचाच विकास केला आहे आणि ग्रामीण भाग मागासलेलाच आहे. त्यासाठी मुद्दाम ग्रामीण भागाची निवड केली होती आणि थोडासा वेळ अहमदाबाद व गांधीनगरसाठी ठेवला होता. मी स्वतः शहरी भागात राहत असल्याने ग्रामीण भागाविषयी विशेष आकर्षण वाटतं. त्यातच गुजराती ग्रामस्थांसोबत संवाद साधण्याची संधी असल्याने प्रचंड उत्सुकता होती. साबरकांठा जिल्ह्यातील प्रांतीज आणि तलोद या तालुक्यातील काही गावांमध्ये ग्रामस्थांसोबत संवाद साधला. साधारण 10-12 गावांमध्ये प्रत्यक्ष भेट दिली. तर आता प्रत्यक्षात जे पाहिलं आणि जे जाणवलं त्याकडे येऊ.
समाजाच्या मूलभूत गरजा कोणत्या असतात? रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण, इत्यादी. यातल्या सगळ्या बाबतीत गुजरात बरंच पुढं असल्याचं दिसतं. खेडेगावात सुद्धा सिमेंट काँक्रीटचे रस्ते बघायला मिळतात. काही ठिकाणी तर अनेक वर्षांपूर्वी म्हणजे साधारण 10-12 वर्षांपूर्वी केलेले रस्तेही दिसतात. ते सुद्धा बऱ्यापैकी चांगल्या अवस्थेत. प्रत्येक गावांत दिवसातील 24 तास वीज उपलब्ध आहे व शेतीसाठी 8 तास वीज उपलब्ध आहे. 24 तास पाणी देखील उपलब्ध आहे. त्यामुळं कुठंही घागरी घेऊन पाण्यासाठी वणवण फिरणारी जनता देखील दिसली नाही. अनेक गावांत तर शुद्ध पाण्यासाठी आरओ प्लांट्स आहेत. आपल्याकडच्या खासगी शाळांना लाजवतील अशा प्रकारच्या तेथील सरकारी शाळा आहेत. मुलांना दप्तरं शाळेत ठेवायची व्यवस्था आहे. शिवाय बहुतांश गावात सरकारी बँकेची शाखा व ATM आहे. एका 3000 लोकसंख्येच्या गावात तर HDFC बँकेची शाखा आणि ATM होतं. बहुतांश गावांमध्ये गॅस पाईपलाईन व भूमिगत ड्रेनेजची व्यवस्था आहे. स्वच्छ भारत योजनेतून अनेक शौचालये देखील बांधली गेली आहेत. काही गावांत तर 2014च्या आधीच शौचालये बांधली गेली आहेत. तसंच रस्त्यावर लख्ख प्रकाशासाठी शुभ्र रंगाचे एलइडी लाईट्स आहेत. प्रत्येक गावात दूध संकलन केंद्र असून त्याचे पैसे थेट खात्यात जमा केले जातात. त्यामुळं पशुपालन करणारा वर्ग प्रचंड प्रमाणात आहे. आरोग्याच्या दृष्टीने प्रत्येक गावात आरोग्य केंद्र असून तिथं सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंत डॉक्टर उपलब्ध असतात. रुग्णवाहिका देखील जास्तीत जास्त 15 मिनिटात दारात येते(महाराष्ट्रात देखील हीच रुग्णवाहिकेची सेवा 2014 आधीपासून आहे). गावांतील लोकांचं राहणीमान देखील शहरी भागापेक्षा मागे नाही.
त्यासोबतच पुंसरी या मॉडेल व मॉडर्न व्हिलेजला भेट देण्याचा योग आला. तिथं गेल्यावर तर एखाद्या महानगरात आल्यासारखं वाटतं. संपूर्ण गावात सीसीटीव्ही कॅमेरे, सार्वजनिक घोषणा प्रणाली, शासकीय शाळेत देखील सीसीटीव्ही कॅमेरे, त्या कॅमेऱ्यांचं चित्रीकरण पाहण्याची ऍप्स अशाप्रकारच्या अनेक गोष्टी इथं बघता आल्या. याप्रकारच्या सुविधा गेल्या 8-9 वर्षांपासून गावांत आहेत. सदर योजना राबविलेल्या सरपंचांसोबत सुद्धा चर्चा करण्याची संधी मिळाली.
काही ठिकाणी आजही सुधारणा करायला वाव आहे. 24 तास विद्युत पुरवठा असूनही एका गावात रस्त्यावरील दिव्यांची आजही समस्या आहे असं दिसून आलं. किरकोळ गावांत स्वच्छ भारत योजनेतील स्वच्छतेचा तितका प्रभाव दिसला नाही. 2-3 गावांत अजूनही पाण्याचा निचरा होणारी व्यवस्था पूर्णत्वास गेलेली नाही. तसंच काही ग्रामस्थांचं असं म्हणणं होतं की दारूबंदीची अजून कठोर अंमलबजावणी होणं अपेक्षित आहे. एका गावात बँक व ATM ची समस्या होती त्यामुळं त्याबाबतीत लोक समाधानी दिसले नाहीत. पण एकूणच हे किरकोळ अपवाद आहेत. जे दूर करणं फार मोठी गोष्ट नाही. लोकांच्या समस्यांचा स्तर देखील उंचावला आहे. एका गावात तुमची समस्या काय आहे ते विचारलं तेव्हा मिळालेल्या उत्तरानं अवाक झालो. तेथील नागरिक म्हणाले की कोणतीही समस्या नाही फक्त इथंच 4G चा स्पीड कमी येतोय आणि शेजारच्या गावात मात्र चांगला स्पीड आहे. लोक तुलना करताना सुद्धा वेगळ्याच स्तरावर आहेत.
पाहणी/अभ्यास करताना कोणत्या गोष्टी चांगल्या आणि वाईट आहेत या दोन्हींची पाहणी करून त्या स्वीकारणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. जोपर्यंत कामातील कमतरता आपण स्वीकारत नाही तोपर्यंत आपण प्रगती करू शकत नाही. नुसतंच गोड चित्र रंगवण्यापेक्षा सध्याचं उत्तम चित्र आणखी सर्वोत्तम कसं करता येईल यावर भर असला पाहिजे. त्यामुळं दोन्ही प्रकारच्या गोष्टी इथं मांडल्या.
एकंदरीतच राजकीय इच्छाशक्ती व प्रशासकीय पकड असली तर कसं चांगलं काम करता येऊ शकतं याचा उत्तम उदाहरण म्हणजे गुजरात आहे. आजही समस्या आहेत. पण समस्यांचा स्तर उंचावला आहे. सगळं काही आलबेल आहे, रामराज्य आहे असं नाही. पण महाराष्ट्रासोबत तुलना करायची म्हणलं तर गुजरात ग्रामीण विकासात 5 वर्षे तरी नक्कीच पुढं आहे. आणि याच वेगानं गुजरात काम करत राहिला तर त्यांना मागे टाकणं अन्य राज्यांना केवळ अशक्य आहे. अहमदाबाद शहर व राजधानी गांधीनगरचा परिसर तर अत्यंत उत्तम आहे. रस्ते व परिसर विकासात घेतलेली मेहनत दिसून येते. मुद्दा असा आहे की जे आहे ते स्वीकारून त्यावर चांगलं काम कसं करता येईल, दुसऱ्यांचं चांगलं काम शिकून त्याची अंमलबजावणी कशी करता येईल याचा विचार केला तर महाराष्ट्र आणि पर्यायानं आपला देश पुढं जाईल. एकूण काय तर विकास झाला आहे असं खुद्द भाजपला विरोध करणारे स्थानिक गुजराती नागरिक देखील मान्य करतात. प्रॉब्लेम गुजरात बाहेरच्या लोकांचाच आहे. विकास वेडा नाही तर तो गुजरातमध्ये आहेच. अशीच विकासयात्रा संपूर्ण देशात सुरू राहू दे आणि भारत देश सुजलाम सुफलाम होऊ दे हीच सदिच्छा.

गर्दी नियंत्रणाचे अडलेले घोडे

  मध्यंतरी महाराष्ट्रात दुर्दैवी अपघात घडला. मुंब्रा-दिवा स्टेशन दरम्यान दोन लोकल शेजारून जाताना त्यातील काही प्रवाशांचा रेल्वे ट्रॅकवर पडून...