साधारण १९९६ चा काळ होता. तीन ते साडेतीन वर्षांचा होतो. नुकतंच थोडंफार कळायला लागलं होतं. मला आजही आठवतंय त्याप्रमाणे मी राजकीय क्षेत्रात सगळ्यात पहिल्यांदा अटलबिहारी वाजपेयी यांचं नाव ऐकलं.(बाकीच्या क्षेत्रातील इतकं आठवणीत नाही पण राजकीय मात्र पक्कं लक्षात आहे.) कारण माझ्या आजोबांना कोणासोबत तरी बोलताना ऐकलं होतं की वाजपेयी पंतप्रधान झाले आणि लगेच त्यांचं सरकार पडलं. त्यामुळं अटलजींची पहिली ओळख पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी अशीच माझ्या स्मरणात आहे. नंतर सकाळी शाळेला जाताना घरी रेडिओवर बातम्या लागलेल्या असायच्या तेव्हा देवेगौडा, शंकर दयाळ शर्मा वगैरे नावं कानावर पडल्याचं आजही आठवतं. 1998 साली पुन्हा निवडणुका झाल्या. मतदान मतपत्रिकेवर होत असल्याने निकालाला देखील उशीर व्हायचा. रोज रात्री साडेनऊ-दहाच्या सुमारास झोपणारे आजोबा त्या मतमोजणीच्या दिवशी चक्क अकरा वाजेपर्यंत जागे होते.(मला त्यावेळी घड्याळ कळत नव्हतं पण घरातल्यांच्या बोलण्यावरून उशीर झाल्याचं कळलं) आजोबांनी बऱ्यापैकी संख्याबळ झालेलं पाहिलं असेल आणि मग म्हणाले, "चला, भाजप जिंकलं. आता वाजपेयी पंतप्रधान होतील." त्यानंतर टीव्ही बंद करून ते झोपले. जवळपास 20 वर्षे होऊन गेली तरी आज हा प्रसंग अगदी काल परवा घडल्यासारखा स्पष्टपणे आठवतोय. तर अशी ही पहिली ओळख आणि आठवण सुद्धा.
सुरुवातीला अटलजींचं फक्त नाव ऐकलं. पण नंतर जसं वाचन वाढत गेलं तसं लक्षात आलं की आपण आपल्या आयुष्यात सगळ्यात आधी ज्या व्यक्तीचं नाव पंतप्रधान म्हणून ऐकलं ती व्यक्ती काहीतरी अद्भुत आहे. पुढं राजकारण, नेतृत्व आणि सुशासन या गोष्टी शास्त्रीय पद्धतीने अभ्यासताना देखील त्यांच्या दूरदृष्टीची अनेक उदाहरणं समजून घेण्याची संधी मिळाली. अटलजींनी लोकार्पण केलेल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या परिसरात काही महिने राहून राजकारण, नेतृत्व आणि सुशासन याबद्दल शिकण्याची संधी मिळाली यापेक्षा मोठं भाग्य काय असू शकतं?
अटलजींच्या कामाचा मला आलेला एक अनोखा अनुभव देखील सांगतो. (माझी कधीही त्यांच्यासोबत भेट झालेली नाही किंवा त्यांना बघण्याची संधी देखील मिळालेली नाही. पण काही व्यक्तीचं अस्तित्व तुम्हांला त्यांच्या कामातून जाणवतं.) लहानपणापासून सुट्टीत बऱ्याचदा सांगली ते पुणे असा प्रवास व्हायचा. कधी कधी तो सांगली ते कराड, कराड ते सातारा, सातारा ते पुणे असा तीन टप्प्यांत प्रवास व्हायचा. कुठं प्रवासाला जायचं म्हणलं की माझा पहिला प्रश्न असायचा किती वेळ लागणार? हा प्रश्न मी नेहमीच विचारायचो. त्यामुळं नेहमी मिळणारं उत्तर आजही लक्षात आहे. सांगली ते कराड- 2 तास, कराड ते सातारा सव्वा तास, सातारा ते पुणे तीन ते सव्वा तीन तास. म्हणजे सांगली ते पुणे या प्रवासाला निश्चितपणे किमान सहा ते साडेसहा तास लागायचे. अटलजींचं सरकार होतं तेव्हाच मी वर्तमानपत्रात वाचलं होतं की रस्त्यांचा सुवर्ण चतुष्कोन (Golden Quadrilateral) नावाचा एक प्रकल्प सुरू केलाय आणि रस्त्यांची मोठी कामं सुरू आहेत. 2004 साली मे महिन्याच्या सुट्टीत सांगली पुणे प्रवास करताना अटलजींची मोठी पोस्टर्स या मार्गावर लावलेली पाहिल्याचं देखील आठवतंय. (या पोस्टर्सचं नंतरच्या सरकारनं काय केलं ते बोलायची आज वेळ नाही. पुन्हा कधीतरी सांगेन.) रस्ते मोठे झालेले जाणवत होतं. पूर्वीपेक्षा प्रवास वेगवान झाला होता. दोन महिन्यांपूर्वी तर साडेतीन तासात सांगलीतून पुण्यात पोहोचलो.
आजही आठवतं, 2004 च्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीवेळी सकाळपासून टीव्ही बघत होतो. मे महिना असल्यानं सुट्टीच होती. वर्तमानपत्राच्या वाचनानं अनेक आमदार, खासदार, मंत्री यांची नावं माहीत असायची. त्यामुळं निवडणुकीचा निकाल काय लागतोय यात तेव्हाही प्रचंड उत्सुकता आणि रस होता. सगळे निकाल हाती आल्यावर अटलजींनी त्यांच दिवशी स्पष्टपणे सांगितलं होतं की आम्ही विरोधी पक्षात बसणार आहोत. तेव्हा आजच्या इतकं विचारधारा वगैरे खूप काही कळत नव्हतं पण खूप वाईट वाटलं होतं. एक चांगली व्यक्ती आता पंतप्रधान होणार नाही याचं दुःख झालं. लहानपणापासून ऐकलेलं आणि म्हणलेलं पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी असं यापुढे म्हणता येणार नव्हतं. 2004 साली देखील अटलजींचं सरकार आलं असतं तर आज देश आणखी पुढं गेला असता. पण असो, 2004 नंतर कधीच तसं 'ते पंतप्रधान' अटलबिहारी वाजपेयी असं म्हणता आलं नाही. मी आयुष्यात पहिल्यांदा ऐकलेले 'ते पंतप्रधान' होते हे शेवटपर्यंत माझ्या स्मरणात राहील. काही वर्षे आधी जन्म झाला असता तर कदाचित त्यांना भेटण्याची संधी मिळाली असती. त्यांची भेट होऊ शकली नाही ही खंत देखील नेहमीच असेल.
आज अटलजींचं निधन झालं. पण कोण म्हणतं अटलजी आपल्यात नाहीत. अटलजी नेहमीच आपल्यासोबत राहतील. त्यांच्या कवितांमधून, त्यांच्या भाषणातून, त्यांच्या कामातून आणि एक आदर्श म्हणून सुद्धा. ग्रामीण भागातल्या रस्त्यावरून जाताना पंतप्रधान ग्रामसडक योजना आणणारे 'ते पंतप्रधान' अटलजी आठवतील, कोणत्याही हिंसाचाराविना तीन राज्यांची सर्वसहमतीने निर्मिती करणारे 'ते पंतप्रधान' अटलजी आठवतील, भ्रष्टाचारावर प्रहार करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणारे 'ते पंतप्रधान' अटलजी आठवतील, सुशासनाची संकल्पना प्रत्यक्षात आणणारे 'ते पंतप्रधान' अटलजी आठवतील, आण्विक चाचणी करणारे 'ते पंतप्रधान' अटलजी आठवतील, मैत्रीचा हात पुढे करत बस घेऊन लाहोरला जाणारे पण कपटीपणाने वागणाऱ्या पाकिस्तानसोबत युद्ध करणारे 'ते पंतप्रधान' अटलजी आठवतील,
आणि...
यापुढेही सांगली-पुणे किंवा सुवर्ण चतुष्कोनाच्या कोणत्याही रस्त्यावरून प्रवास करताना मला 'ते पंतप्रधान' अटलजी आठवतील...😢
आणि...
यापुढेही सांगली-पुणे किंवा सुवर्ण चतुष्कोनाच्या कोणत्याही रस्त्यावरून प्रवास करताना मला 'ते पंतप्रधान' अटलजी आठवतील...😢
माझ्याकडून काही खास ओळी...
हम चल रहे एक राह से, और टकरा रहे है मुश्किलों से,
फिर भी 'अटल' चलते रहना है इस राह पे भारी उम्मीदो से...
आजतक मिली हमें प्रेरणा आपके कार्य से,
पर आज टूट पड़ा ये दिल आपके गुजरने से,
सदा आपको याद करेंगे आपके कार्य से,
आज हमारे आदर्श को अंतिम विदाई देंगे उदास मन से,
फिर भी आप हमें आखिरी संदेश में कहेंगे, आगे भी तुम्हे 'अटल' चलते रहना है इस राह पे भारी उम्मीदो से...
फिर भी 'अटल' चलते रहना है इस राह पे भारी उम्मीदो से...
आजतक मिली हमें प्रेरणा आपके कार्य से,
पर आज टूट पड़ा ये दिल आपके गुजरने से,
सदा आपको याद करेंगे आपके कार्य से,
आज हमारे आदर्श को अंतिम विदाई देंगे उदास मन से,
फिर भी आप हमें आखिरी संदेश में कहेंगे, आगे भी तुम्हे 'अटल' चलते रहना है इस राह पे भारी उम्मीदो से...
By Sanket...
खास अटलजींसाठी...😢
खास अटलजींसाठी...😢
