देशाच्या प्रगतीमध्ये अनेक घटक महत्त्वाचे असतात. उद्योजक त्यांपैकीच एक. एका बाजूला नीरव मोदी, मेहुल चोक्सी, विजय मल्ल्या यांच्यासारखे पळपुटे उद्योजक पाहिल्यावर उद्योजक पळपुटे आणि वाईट आहेत असं नकारात्मक वातावरण निर्माण केलं जातंय. पण राफेलच्या वादानं या नकारात्मक वातावरणात आणखीनच भर पाडली आहे. ती भर दुसऱ्या कोणी नव्हे तर देशातील प्रमुख विरोधी पक्ष व त्यांच्या अध्यक्षांनी पाडली आहे. याचं कारण असं की सत्ताधारी आणि त्यांच्या नेतृत्वावर चिखलफेक करण्याच्या नादात विरोधकांनी आपली आधीच भरकटलेली नैय्या आणखीनच भरकटवून घेतली आहे. राफेलच्या करारात भ्रष्टाचार झाला किंवा नाही हा एक वेगळा मुद्दा असू शकतो. पण सतत 'अनिल अंबानी यांनीच सरकारला पैसे दिले, पळून जाण्याचा पुढचा नंबर अनिल अंबानी यांचा असेल, सरकार गरिबांचा पैसा काढून अंबानींना देत आहे' अशी वक्तव्य राजकीय किंवा वैचारिक विरोध नव्हे तर केवळ राजकीय फायद्यासाठी केलेली बाष्कळ बडबड आहे. यामुळे सर्वसामान्य लोकांच्या मनात उद्योजकांविषयी द्वेष निर्माण होण्याचीच जास्त शक्यता आहे. कर्ज बुडवून पळालेल्या उद्योजकांचं समर्थन अजिबातच होऊ शकत नाही. पण इथं तर चांगलं काम करणाऱ्यांनी पळून जावं अशी परिस्थिती निर्माण केली जात आहे.
हा लेख अनिल अंबानी यांची वकिली करणारा मुळीच नाही. मुद्दा इतकाच आहे की अनिल अंबानी हे अनेक चांगल्या उद्योजकांपैकी एक आहेत. ते एक प्रातिनिधिक उदाहरण झालं. इथं फक्त सतत अंबानी यांचा उल्लेख होत असल्यानं ते फक्त संदर्भ म्हणून घेतलं आहे. आज अंबानी आहेत, उद्या आणखी कोणते तरी उद्योजक असतील. तसंही अंबानींच्या पूर्वजांची विश्वासार्हता आरोप करणाऱ्यांच्या पूर्वजांपेक्षाही अधिक आहे हे विसरता कामा नये. आत्तापर्यंतच्या सगळ्याच सरकारांनी कमी अधिक प्रमाणात उद्योजकांनाच झुकतं माप दिलं आहे. त्यात काँग्रेसची राजवट तर अजिबातच अपवाद नाही. फक्त फरक इतकाच की काँग्रेसने सर्वसामान्य लोकांच्या ऐवजी आपल्याच पक्षाच्या नेत्यांना 'उद्योजक' बनवलं. कारण इतके वर्षांत आपली चांगल्या रीतीने औद्योगिक प्रगती का झाली नाही, उद्योजकांना इतक्या लालफितींचा सामना का करावा लागतो याचं जास्त चांगलं उत्तर दीर्घकाळ सत्ता उपभोगलेली काँग्रेसच देऊ शकेल. आज काँग्रेस जितक्या उद्योजकांच्या नावानं शंख करत आहे त्यांना स्वतः सत्तेत असताना त्यांचे सर्व प्रकल्प नियमाच्या अधीन राहून मंजूर केलेत व त्यासाठी एक दमडीही कोणत्याही प्रकारे घेतली नसल्याचं सिद्ध करून दाखवावं. तरच त्यांच्या आरोपांना खरं मानता येईल.
काँग्रेसच्या माननीय अध्यक्षांचा संभ्रम इतका झालाय की त्यांनी सत्ताधारी पक्षाविरोधात मोहीम उघडलीय का उद्योजकांविरोधात हे त्यांनाच कळेनासं झालंय. एखाद्या यशस्वी उद्योजकाला आदर्श ठेवून वाटचाल करणारे अनेक उद्योजक असतात.(मुळात अपघातानेच यशस्वी होणाऱ्यांना यशस्वी म्हणजे काय ते समजणार तरी कसं?) त्या उद्योजकाच्या नाकर्तेपणामुळे त्याची प्रतिमा खालावली तर भाग वेगळा. पण तुमच्या बिनबुडाच्या आणि राजकीय स्वार्थाच्या आरोपांमुळे त्या उद्योजकाची प्रतिमा डागळून त्यांना आदर्श मानणाऱ्या उद्योजकांचं मनोधैर्य खच्ची झाल्यास त्याला जबाबदार कोण? क्षणभर अनिल अंबानी दोषी आहेत असं गृहीत धरलं तरी तुम्ही ज्या आक्रस्ताळेपणाने आरोपांची राळ उठवत आहात ते पाहता उद्या अशा प्रकारच्या नवीन गुंतवणुकीसाठी दुसरे उद्योजक पुढे येतील का? उद्या दुर्दैवी अपघाताने तुम्ही पंतप्रधान झालाच आणि अशा मोठ्या उद्योजकांनी त्यांच्या लाखोंच्या संख्येने कर्मचारी असलेल्या कंपन्या बंद करण्याची घोषणा केली तर आपल्या देशाला ते परवडणार आहे का? (लोकं घराण्याच्या पुण्यावर पुढची पिढी राजकारणात जगवतात तर उद्योजक देखील त्यांच्या कष्टाच्या पैशावर कंपनी बंद करून का जगू शकणार नाहीत?) तुमचे राजकीय हेवेदावे कितीही असू द्यात, पण त्यात उद्योजकांना ओढून बदनाम करू नका. राजकीय आखाडा फक्त राजकीय मुद्यांसाठी असावा. जो काही विरोध/वादविवाद करायचा तो राजकीय असू दे, कोणाला बदनाम करणारा नको.

