टीप- तमाम भाजपा समर्थकांसाठी (मी सुद्धा आहे त्यात). आपण नेहमीच भाजपा कशी चांगली ते सर्वांना सांगत असतो. पण जेव्हा अपयश येतं तेव्हा आपणच कसे शहाणे या अविर्भावात न राहता त्या अपयशाचं खुल्या दिलाने आत्मपरीक्षण केलं पाहिजे व सुधारणा केल्या पाहिजेत. तरंच आपण स्वतःला 'पार्टी विथ अ डिफरन्सचे' समर्थक/कार्यकर्ते म्हणवून घेण्यास लायक आहोत.
2013च्या अखेरीस झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने छत्तीसगड व मध्य प्रदेश येथे पुन्हा सत्ता मिळवली होती तर राजस्थानमध्ये काँग्रेसकडून सत्ता हिसकावून घेतली होती. यांतील छत्तीसगडचा विजय हा काठावर मिळवला होता. तर मध्य प्रदेश व राजस्थान मधील विजय दिमाखदार होता. खरंतर या दोन्ही ठिकाणी निवडून आलेलं संख्याबळ पाहिलं तर लक्षात येईल की ती मोदी लाटेची सुरुवात होती व त्याचा थेट फायदा इथलं संख्याबळ वाढण्यात झाला होता. उदाहरणच द्यायचं झालं तर 2013 मध्य प्रदेशातील 230 पैकी भाजपने जिंकलेल्या 165 जागांपैकी सुमारे 50 जागा दहा हजारांपेक्षा कमी मताधिक्याने निवडून आलेल्या होत्या.(याचं विश्लेषण मी स्वतः अधिकृत आकडेवारीच्या आधारे काही महिन्यांपूर्वीच केलं होतं व ते वरिष्ठ पातळीवर पोहोचवण्याचा प्रयत्न देखील केला होता. असो.) एक म्हणजे 15 वर्षांच्या सत्तेमुळं निर्माण होणाऱ्या विरोधी वातावरणात या जागा गमावल्या जाऊ शकत होत्या. दुसरं म्हणजे ती मोदी लाट आता नाहीये त्यामुळे या जागा हमखास कमी होण्याची शक्यता होती. कारण स्पष्ट आहे की त्या अधिकच्या जागा हे कोणाचंही कर्तृत्व किंवा मर्दुमकी नव्हती तर ती लाटेची कमाल होती. त्याचप्रमाणे राजस्थान मध्ये 200 पैकी 164 जागा वगैरे ही जरा अतिशयोक्तीच होती त्यात आता थेट 90 जागांची घट झाली आहे. त्यामुळे एकंदरीतच ही सगळी जागांना आलेली सूज होती. परवाच्या निकालांनी ही सूज उतरवली असं म्हणायला काहीच हरकत नाही.
या जागांना सूज म्हणायचं कारण म्हणजे त्या 'अधिक' जागा जिंकण्यासाठी ना संघटनेची विशेष मेहनत होती ना उमेदवारांची(किरकोळ अपवाद वगळता) याचं कारण म्हणजे बहुतांश उमेदवार हे स्थानिक मुख्यमंत्री व तत्कालीन पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या पुण्याई व प्रभावामुळे निवडून आले होते. बरं, निवडून आले ते आले पण पुढं जाऊन त्या तोडीचं काम करू शकले नाहीत. जनतेनं ज्या नेतृत्वाकडे पाहून यांना मतं दिली त्या विश्वासाला ते पात्र ठरू शकले नाहीत हे कटू सत्य आहे. मला वाटतं की पराभवाचं हे एक मूलभूत आणि मुख्य कारण आहे. बाकीचे पण अनेक छोटे-मोठे मुद्दे आहेत. राज्य बदलेल तसं इतर मुद्दे काही प्रमाणात बदलतील. पण हा समान धागा सगळ्यांच राज्यात राहणार आहे आणि तो भाजपासाठी प्रचंड हानिकारक ठरू शकतो. आम्हांला जनतेनं निवडून दिलंय ते आमच्या नेतृत्वाकडे बघून नव्हे तर केवळ आमच्या कर्तृत्वावर असा खोटा आत्मविश्वास बाळगून सातव्या आसमंतात वावरणाऱ्या नेत्यांमुळं झालेला हा पराभव आहे. त्यामुळं अशा अहंकारी लोकांना भाजपाने वेळीच वठणीवर आणलं पाहिजे किंवा मुख्य प्रवाहातून बाजूला केलं पाहिजे. अहंकार नेतृत्वाला नव्हे तर काँग्रेसी संस्कृती प्रमाणे आपण या क्षेत्राचे सुभेदारच असल्याच्या अविर्भावात वागणाऱ्या लोकप्रतिनिधींना झाला होता आणि आहे. नेतृत्व रात्रंदिवस सर्वसामान्य जनतेच्या कामासाठी झटत आहे, पण यांचा रुबाब करण्यातच अधिकतम वेळ जात आहे. देशपातळीवरील व राज्यपातळीवरील नेतृत्व श्रेष्ठच आहे (म्हणून तर तुम्ही इथपर्यंत पोहोचला) पण निवडून आल्यावर ज्या लोकांनी तुम्हांला निवडून दिलंय त्यांचीच कामं करायचं विसरला तर अशी अपयशी अद्दल वारंवार घडेल आणि तुमच्या नाकर्तेपणाची किंमत पक्षाला व सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मोजावी लागेल.
लोकांसोबत संवाद साधला तर बऱ्याचदा लोक विचारतात की मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री चांगलं काम करत आहेत वगैरे सगळं ठीक आहे पण त्यांचे सहकारी काय करत आहेत. कारण सरकारचं नेतृत्व आणि हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या मंत्र्यांचं काम सोडलं तर बाकी कोणालाच आपल्या कामाचा ठसा उमटवता आला नाहीये हे वास्तव नाकारता येणार नाही. दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील बरेच नेते फक्त सत्तेच्या फुशारक्या मारण्यात आणि गुर्मी दाखवण्यात मग्न आहेत त्यामुळे खरंच यांपैकी कोणाला काम करायचं आहे का असा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. फक्त वाचाळपणा दाखवायचा आणि कामाच्या नावानं शंख ही परिस्थिती पक्षासाठी धोकादायक आहे. त्यामुळं अशा नेत्यांनी देखील आपल्या नेतृत्वाच्या तोडीस तोड काम करून आपल्याला दिलेल्या जबाबदारीला न्याय देणं अपेक्षित आहे. तरंच लोकं पुन्हा भाजपाला मतं देतील. कारण आता खडी फोडण्याची नव्हे तर परफॉर्म करण्याची वेळ आहे.
सत्ता जिथं असते तिथं दलाली करण्याचे उद्योग आपसूकच सुरू होतात. पण अशा सत्तेची दलाली करणाऱ्या लोकांना किती मोठं करायचं याचाही विचार पक्षाच्या विविध पातळीवरील नेतृत्वाने केला पाहिजे. पक्षाच्या कामाला वेग आणि कार्यकर्त्यांना बळ देण्यापेक्षा इथून-तिथून मागून सोय करून घेतलेल्या पदांचा पुरेपूर वापर करून घ्यायचा, ही तर अशा व्यक्तींची खासियत असते. काँग्रेसच्या काळात अशा व्यक्तींचं प्रचंड पीक होतं आणि जनता त्यालाच वैतागली होती. त्यामुळं या सरकारच्या काळात चित्र वेगळं असेल अशी अपेक्षा होती पण ते चित्र आधीपेक्षा बरं असलं तरी ते फारसं सकारात्मक नाही हे सुद्धा खरं. पक्षाला मिळालेल्या सत्तेच्या माध्यमातून कानाकोपऱ्यातून पदं शोधून शोधून ती मिळवायची अन त्या पदांचा उपयोग करून वारेमाप प्रसिद्धी मिळवायची आणि कोणी कार्यकर्ते काम घेऊन आले की फालतू तांत्रिक बाबी दाखवून त्यांना पिटाळून लावायचं पण आपले खिसे गरम करून घ्यायचे. त्यामुळं अशा प्रवृत्तीच्या लोकांना पायबंद घालावा लागेल. तरंच लोकांना काहीतरी बदललंय याची प्रचिती 'याची देही याची डोळा' यायला लागेल.
एखादा पक्ष जेव्हा सत्तेत येतो तेव्हा त्यात कार्यकर्त्यांची भूमिका मोठी असते. पण सत्तेत आल्यावर ते विसरून चालत नाही नेमकी तिथंच आज भाजपा चुकत आहे. एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला आधार देणं किंवा त्याच्या पाठीशी उभं राहणं, किमानपक्षी त्याच्यासोबत संवाद साधून त्याच्या भावना ऐकून घेणं या गोष्टी होत नाहीत. त्यामुळं कार्यकर्ता काम करताना विचार करतो आणि मग निवडणुकीत अपेक्षित यश मिळत नाही. आर्थिक सोडून कार्यकर्त्यांच्या बऱ्यांच अपेक्षा नेते सहजपणे पूर्ण करू शकतात. पण तेही केलं जात नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं कार्यकर्ते नाराज होतात. (कॉन्ट्रॅक्ट मिळालं नाही म्हणून उठसूट नाराज होणाऱ्या कार्यकर्त्यांबद्दल बोलत नाहीये)
पक्ष संघटनेमध्ये विविध प्रकारच्या व्यक्तींना सामावून घेत पक्षाचा विस्तार करण्यात काहीच गैर नाही. पण हा आमच्यासोबत आला, तो आमच्यासोबत आला त्यामुळे आता आमची शक्ती वाढली अशी शेखी मिरवण्यात कोणतीही हुशारी नाही. एक तर बरेच लोक तुम्हांला जोडले जात आहेत याचं मुख्य कारण म्हणजे आज भाजपाच्या नेतृत्वामुळे भाजपाला असलेला लोकांचा पाठिंबा. यातल्या किती लोकांना भाजपाच्या विचारधारेचा गंध आहे हा एक चिंतेचा मुद्दा आहे. त्यामुळे संघटनेची संख्यात्मक वाढ दिसत असली तरी त्यात गुणात्मकतेचा अभाव आहे असं खेदाने नमूद करावं लागेल. विचारधारेशी बांधील कार्यकर्ते काम करत राहतात आणि बाहेरून आलेले पक्षाला बदनाम करतात असं चित्र देखील पाहायला मिळतं. त्यामुळं पक्षाने विचारधारेशी बांधील कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या संधी देऊन ते अहंकारी होणार नाहीत यावर लक्ष ठेवलं तरी बऱ्याच प्रमाणात सुधारणा होऊ शकेल.
या गुणात्मकतेच्या अभावामुळे संघटनेत एक प्रकारची मरगळ आलेली आहे. आपण काम नाही केलं तरी मोदींची किंवा राज्यातील नेतृत्वाची एखादी सभा झाली की आपण निवडणूक जिंकून जाऊ या भावनेनं संघटनेला ढिम्मपणा आला आहे. भाजपाच्या स्थानिक पातळीवरील किती पदाधिकाऱ्यांना सरकारच्या किती योजना नीटपणे माहीत आहेत व त्या किती प्रभावीपणे पोहोचवू शकतो याचा किती अंदाज आहे हा देखील संशोधनाचा विषय आहे. मुळात पदाधिकारी व कार्यकर्ते लोकांपर्यंत योजनांच्या माध्यमातून प्रभावीपणे पोहोचत नसल्यामुळे जनमानसात ती 'सकारात्मक' प्रतिमा टिकवून ठेवणे तितकेसे जमून येत नाहीये. नुसतंच मोदी-मोदी करून काही होणार नाहीये. लोकांसाठी सरकार किती काम करत आहे ते पटवून देणे आवश्यक आहे. काही ठिकाणी तर आपली हांजी हांजी करणारे बगलबच्चे स्थानिक नेत्यांनी संघटनेत पदाधिकारी म्हणून नेमल्याने देखील तेथील संघटनेत मरगळ आल्याची उदाहरणे आहेत.
या सगळ्या विश्लेषणातून इतकंच सांगता येईल की पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालांनी अकारण आलेली संख्याबळाची सूज उतरवली. त्यासोबतच काडीचीही योग्यता(पात्रता देखील) नसताना केवळ नेतृत्वाच्या कर्तृत्वावर निवडून आलेल्यांच्या अहंकारी वृत्तीला देखील दणका दिला आहे. फक्त या दणक्यामुळे अहंकार उतरवला तरंच भाजपा पुन्हा भरारी घेईल आणि 2014 किंवा त्यापेक्षा अधिक यशाची पुनरावृत्ती होईल. अन्यथा 2009 पेक्षाही दारुण पराभव वाट्याला येईल.
