2019च्या लोकसभा निवडणुकांचं वारं वाहायला सुरुवात झालीय. येत्या 5 वर्षांसाठी आपल्या देशाचं 'नेतृत्व' कोण करणार ते या निवडणुकीत ठरणार. कोण राज्य करणार असं न म्हणायचं कारण की आता देशात लोकशाही आहे. राजेशाही आता नाही आणि घराणेशाही येणार नाही याची काळजी आपण घेऊच. आता तुम्ही विचाराल की 'कथित' हुकूमशाहीचं काय? पण याचंही समर्पक उत्तर मी देईन. प्रशासनात किंवा लोकांमध्ये शिस्त आणण्याच्या प्रयत्नाला आपण जर हुकूमशाही म्हणलं तर आपल्यासारखे ढिम्म आपणच. क्षणभर हुकूमशाही असं जरी गृहीत धरलं तरी राष्ट्राला योग्य दिशेत घेऊन जाणारी या प्रकारची ही 'कथित' हुकूमशाही चांगली की योग्यता (पात्रता) नसताना नेतृत्व करण्याची लॉटरी लागल्याच्या अविर्भावात राज्य करण्याचा स्वार्थ बाळगणारी असुसंस्कृत, अपरिपक्व घराणेशाही चांगली याचा निर्णय आपल्याला करायचा आहे. आणि आपण राष्ट्रहितामध्येच निर्णय घेऊ याची मला पूर्ण खात्री आहे. त्यासाठी कोणत्या गोष्टींचा प्राधान्याने विचार करणं आवश्यक आहे ते बघूया.
पूर्ण बहुमत महत्त्वाचं
अग्रलेखांसाठी 'कुप्रसिद्ध' असणाऱ्या दैनिकाच्या एका पत्रकारांनी परवा एका लेखात असा 'जावई'शोध लावला की एका पक्षाच्या पूर्ण बहुमताच्या सरकारपेक्षा घटक पक्षांचे एकत्रित सरकार लोकशाहीला बळकट करेल. पण इतिहासात डोकावून बघितलं तर लक्षात येईल की अशा कडबोळ्यांच्या सरकारांनीच लोकशाहीची सर्वाधिक वाताहत केली आहे. लोकसभेत केवळ 8 ते 10 खासदार असणाऱ्या पक्षांनी केंद्रात सरकारला पाठिंबा देण्याच्या बदल्यात 3-3 (महत्वाची) मंत्रीपदे उपभोगली आहेत (बाकीचे पदरात पाडून घेतलेले फायदे वेगळेच). त्या मंत्रालयाचा परफॉर्मन्स किती 'दिव्य' राहिला आहे हे देखील आपल्या सर्वांना माहीत आहे. तुम्हांला जनादेश किती तुम्ही मागता किती याचं तारतम्य न बाळगता केवळ सर्वाधिक संख्याबळ असणाऱ्या पक्षाला 272 पार करण्यासाठी भीती घालत राहायचं. सरकार चालू देण्यासाठी मूठभर संख्याबळाच्या आधारे असं ब्लॅकमेल करणं ही लोकशाहीची विटंबना नव्हे काय? पण आपल्याकडे इतिहासात न डोकावण्याची दांभिकता ठासून भरलेली असल्याने असे चुकीचे तर्क मांडून केवळ लोकांची दिशाभूल करणे हा एककलमी कार्यक्रम राबविला जातो.
प्रादेशिक/वैयक्तिक स्वार्थासाठी राष्ट्रहिताचा बळी देण्याऱ्या पक्षांच्या पारड्यात आपण आपलं 'बहुमूल्य' मत टाकणार आहोत का याचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. ज्या पक्षाच्या नेतृत्वाला राष्ट्रीय सुरक्षा, राष्ट्रहित, आंतरराष्ट्रीय संबंध इत्यादी विषयांचा गंध देखील नसतो त्यांच्या हाती आपण आपलं राष्ट्र देणार आहोत का? ज्या पक्षाच्या नेतृत्वाला देशापेक्षा आपलं राज्य महत्त्वाचं वाटतं तो पक्ष केवळ बार्गेनिंग पॉवर असल्याने केंद्राच्या सत्तेत सामील झाला तर तो संपूर्ण देशाला कसा न्याय देणार? सत्ताधाऱ्यांवर अंकुश जरूर हवा पण त्यांची कारकीर्द फक्त रुसवे-फुगवे काढण्यात जायला नको. जे पक्ष स्वतःच्या विजयापेक्षा दुसऱ्याचा पराभव व्हावा या नकारात्मक मानसिकतेतून खेळ्या करणारे अपघाताने जरी सत्तेत आले तरी ते सकारात्मक मानसिकतेने कारभार करतील याची हमी कोण देणार? त्यामुळे सरकार चालवणाऱ्या पक्षाला पूर्ण बहुमतच हवं याबद्दल सर्वसामान्य नागरिकांच्या मनात कोणतीही शंका नसेल.
नेतृत्वाचं महत्त्व
केवळ पूर्ण बहुमत महत्त्वाचं नाही तर त्यासोबतच त्या पूर्ण बहुमताचं नेतृत्व देखील परिपक्व आणि खंबीर हवं. आजच्या घडीला ते फक्त भाजपाकडे आहे. अन्य किती पक्षांच्या नेतृत्वाला चांगली वैचारिक बैठक आणि त्या विचारांची अंमलबजावणी करण्याची क्षमता आहे ते मतदान करताना तपासून पाहायला हवं. भाजपा सोडून देशातील अन्य राजकीय पक्ष वाईटच आहेत असा माझा अजिबात दावा नाहीये. सर्व पक्षांमध्ये चांगली व्यक्तिमत्त्व कार्यरत आहेत. विचारधारा भिन्न असल्या तरी ते आपल्याच देशाचे नागरिक आहेत. त्यामुळं त्यांना शत्रू म्हणण्याऐवजी वैचारिक/तात्विक विरोधक संबोधणं संयुक्तिक ठरेल. पण मग भाजपाच का असा प्रश्न निर्माण होतो. कारण स्पष्ट आहे, भाजपाकडे जितकं परिपक्व नेतृत्व आहे, तितकं परिपक्व नेतृत्व कोणत्याही पक्षाकडे नाहीये. राजकीय व प्रशासकीयदृष्ट्या परिपक्व म्हणजे काय ते एखाद्या नेतृत्वाचा कारभार 'डोळसपणे' पाहिला की आपल्याला नक्कीच कळून येईल. नेतृत्वाच्या बाबतीत अन्य पक्ष सपाटून मार खातात ही वस्तुस्थिती आहे. बाकी उथळ टीका करणारे करत राहतात पण आपण स्वतःच्या विचारांती मतदान करणं केव्हाही चांगलं. एखाद्या पक्षाला मतदान करण्याआधी त्याच्या नेतृत्वात नेमकं असं काय आहे की त्याला मी मत द्यावं याचे 2-3 मुद्दे जरी काढले तरी आपल्याला सहज लक्षात येईल.
काम करणाऱ्याला न्याय देण्यासाठी
काही व्यक्ती या आपलं सर्वस्व पणाला लावून काम करत असतात. पण त्यावर त्या व्यक्ती अजिबातच समाधानी नसतात किंवा त्याचा गर्वही नसतो. इतकं काम करून परत जनादेश मिळाला तर पुढच्या कामाला अधिक गती देता येईल हा शुद्ध विचार त्यामागे असतो. त्यांच्या या कामाला मतदानरुपी पोचपावती दिली तरंच त्यांच्या कामाला न्याय दिल्यासारखं होईल. पण आपण जर अन्याय केला तर त्याच समर्पित भावनेनं देशासाठी काम करायला अन्य कोणीच पुढे येणार नाही ही गंभीर बाब आपण लक्षात घेतली पाहिजे.
'नोटा'ची नकारात्मकता
केवळ 'नोटा'चं बटन दाबून आपली जबाबदारी संपत नाही तर ती झटकली जाते. उपलब्ध पर्यायांबाबत आपल्याला इतकीच चीड असेल तर यांना पर्याय म्हणून आपण का पुढं येत नाही हा प्रश्न 'नोटा' करणाऱ्या मतदारांनी स्वतःला विचारायला हवा. आपलं नकारात्मक मत फक्त नकारात्मकताच पसरवेल आणि पर्यायाने नकारात्मक मानसिकतेचाच पक्ष सत्तेत येईल. आपल्याला घटनेनं मतदानाचा अधिकार उपलब्ध पर्यायांपैकी चांगला पर्याय निवडण्यासाठी दिलाय, पर्याय नाकारण्यासाठी नव्हे. 'नोटा'ला मत देणं म्हणजे आपलं मत बाद करणं. कारण तुमच्या त्या नोटामुळे व्यवस्थेत कोणताच फरक पडणार नाहीये. पण चांगला पर्याय निवडण्याने तो फरक पडण्याची शक्यता मात्र निर्माण होते.
वरील सगळे मुद्दे वाचल्यावर असं वाटू शकतं की भाजपाला मतदान करावं असं आवाहन केलं आहे का? तर नक्कीच तसं आवाहन केलं आहे. लेखामध्ये मांडलेल्या निकषांमध्ये भारतीय जनता पार्टीच नीट बसत असेल तर त्यावर टीका करण्यापेक्षा इतर पक्ष या निकषांत का बसत नाहीत याचा विचार त्या पक्षांच्या समर्थकांनी करावा. आपण ज्या नेतृत्वाची टिमकी वाजवतो त्यातच जर दम नसेल तर दुसऱ्यावर टीका करून त्या 'टुकार' नेतृत्वात दम येणार नाही हे वेळीच ओळखायला हवं.
निवडणूक म्हणलं की कोणाचाही विजय हा होणारच आहे. पण राष्ट्राला पुढे घेऊन जाण्याची प्रबळ इच्छाशक्ती आहे, राष्ट्रासाठी अहोरात्र काम करून दाखवलं आहे अशा पक्षाचा विजय झाला तरंच त्या निवडणुकीतील विजयाला 'राष्ट्रीय' विजय म्हणता येईल. इतर कोणाचाही विजय राष्ट्राला मागे घेऊन जाणारा ठरेल. असा विजय भविष्यात राष्ट्राचा पराभव करेल. त्यामुळे हा 'राष्ट्रीय' विजय देशासाठी पर्यायाने आपल्यासाठीच महत्त्वाचा आहे. त्यामुळे मतदान करताना आपण किती जागरूक असायला हवं याचं महत्त्व आपल्याला कळलं पाहिजे. काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा आपण प्रकर्षाने विचार केला पाहिजे. पक्ष कोणताही जिंकला तरी पर्यायाने राष्ट्र जिंकलं पाहिजे. मतदान ही राष्ट्राला विजयी करण्याची लोकशाहीनं आपल्याला दिलेली संधी आहे. आपण त्याचं सोनं करतो का माती करतो हे येणारा काळ ठरवेलच. पण आपल्याला देशाचा सुजाण आणि जागरूक नागरिक म्हणून 'राष्ट्रीय' विजयाची ही जबाबदारी पार पाडलीच पाहिजे. तर आजच्या राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त संकल्प करूया की जास्तीत जास्त संख्येने मतदान करू आणि लोकशाही बळकट करून 'राष्ट्रीय' विजयाला हातभार लावू.
By Sanket...
'राष्ट्रीय' विजयासाठी...
