काल रात्री मनोहर पर्रिकर यांच्या दुःखद निधनाची बातमी कळाली तेव्हा मित्राच्या गाडीवर मागे बसलो होतो. आपसूकच डोळे पाणावले आणि तो अश्रूंचा बांध फुटू नये म्हणून पटकन डोळे घट्ट मिटायच्या आतच अश्रूंनी डाव साधला. कारण त्यापूर्वीच अश्रूंचा ओघळ खाली आला होता. असं का होतं? खरंतर गेल्या दोन वर्षांत राजकीय क्षेत्रातील अनेक मोठ्या व्यक्तींना भेटण्याची संधी मिळाली. पण मनोहर पर्रिकर यांच्यासोबत संवाद साधण्याची इच्छा अपूर्ण राहिली याची खंत वाटते आणि ती नेहमीच राहील. कदाचित त्यांच्यासोबत संवाद व्हावा इतकं माझं भाग्य नसेल. आपण ज्यांना कधीच भेटलो नाही त्यांच्याबद्दल इतक्या झटक्यात अश्रू अनावर का होतात? ज्यावेळी आपली वैयक्तिक हानी होते त्यावेळीच असं घडतं.
राजकारण, नैतिकता, मूल्य हे तीन शब्द एकत्रितपणे ऐकायला तसे विचित्र वाटतात. या तिन्ही गोष्टींचा एकमेकांशी काडीचाही संबंध नाही असं वाटतं. पण मनोहर पर्रिकर यांनी हा समज खोटा ठरवला. मूल्यांवर आधारित राजकारणाला नैतिकतेची जोड देऊन काम करणं म्हणजे काय असतं ते पर्रिकरांनी सबंध देशाला दाखवून दिलं. पर्रिकर पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हापासून त्यांना फॉलो करायला लागलो. गोव्यासारख्या छोट्याशा राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थितीला तोंड देत पर्रिकरांनी स्वतःचं असं एक स्थान निर्माण केलं. नुसतीच सत्ता हस्तगत करणं तुलनेनं सोपं असतं पण त्या सत्तेसोबतच सर्वमान्यता मिळवणं खूप कठीण असतं. याची खरी प्रचिती 2017 मध्ये आली. भाजपा दुसऱ्या क्रमांकावर असताना देखील केवळ मनोहर पर्रिकर मुख्यमंत्री होणार असतील तर आम्ही पाठिंबा देऊ अशी भूमिका छोट्या पक्षांनी घेतली. खरंतर गोव्याची राष्ट्रीय राजकारणात विशेष 'बार्गेनिंग पॉवर' नसल्याने पर्रिकरांचा राष्ट्रीय राजकारणात उशिरा प्रवेश झाला. गेल्या एक वर्षात मृत्यूशी झुंज देत त्यांनी सर्व क्षमता पणाला लावून राज्यकारभार केला. अखेर मृत्यूने त्याने गाठलंच. खरंतर गेले काही दिवस त्यांच्या प्रकृतीची अवस्था बघवत नव्हती. प्रकृती साथ देत नसताना देखील कामाप्रति असलेली त्यांची निष्ठा त्यांना काम करायला प्रवृत्त करत होती. पदाला चिकटून राहणं हा उद्देश त्यात नव्हता. माझ्या राज्याला माझी गरज आहे त्यामुळे मी काम करणार ही प्रामाणिक भावना होती. संरक्षण मंत्रीपद हे शोभेचं नसून देशाची संरक्षण यंत्रणा मजबूत करणे आणि वाईट नजरेनं पाहणाऱ्या शत्रूची दाणादाण उडवून त्याची जगभरात शोभा करण्यासाठी आहे, हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं.
मनोहर पर्रिकरांची कौटुंबिक पार्श्वभूमी समजून घेतली तर त्यांचं मोठेपण अधिक जाणवायला लागतं. मध्यंतरी पर्रिकरांनी ते संरक्षण मंत्री असताना एका दिवाळी अंकातील त्यांनी लिहिलेला लेख वाचला होता. त्यांच्या कुटुंबाबद्दल लिहिलं होतं. सुमारे एका वर्षाच्या अंतरात या माणसाने आपले आई, वडील आणि पत्नी यांना कायमचं गमावलं होतं. शिवाय लहान असलेल्या दोन मुलांची जबाबदारी खांद्यावर होती. गमावलेल्या सगळ्या नात्यांचे रोल निभावून मुलांना वाढवणं हे देखील आव्हानच होतं. त्यासोबतच राजकारणात देखील ते एक एक पायरी पुढं जात होते. जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा प्रचंड गर्दी जमली होती. आनंदाचा क्षण होता पण त्या गर्दीत त्यांना नेहमी साथ दिलेले आई, वडील आणि पत्नी नव्हते याची रुखरुख त्यांना लागली होती. आपली माणसं गमावल्यावर जितकं दुःख होत नाही त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने दुःख आनंदाच्या क्षणी आपल्या माणसांच्या या जगात नसण्याने होतं. या सगळ्या कौटुंबिक पार्श्वभूमीवर स्वतःची सगळी दुःख विसरून या व्यक्तीने जनतेसाठी अखेरच्या श्वासापर्यंत काम केलं.
मनोहर पर्रिकर जी, आज तुम्ही आम्हांला कायमचं सोडून गेलात. देशाचं, पक्षाचं वगैरे नुकसान तर झालंच. त्यासोबतच आमच्यासारख्या तरुणांना तुम्ही पोरकं करून गेलात. आज दोष कोणाला द्यायचा ते समजत नाहीये. देवाला की नशिबाला? फक्त एवढं समजतंय की आपण खूप काही गमावलंय. पण तरीही यापुढे तुमची शिकवण आम्हांला मार्गदर्शन करत राहील. आपल्यावर चालून आलेल्या संकटाला शरण न जाता त्या संकटालाच कसं झुंजवायचं असतं हे तुम्ही शिकवलं. शरीर साथ देत नसतं तेव्हा इच्छाशक्तीने त्यावर मात करायची असते. परिस्थिती कितीही विरोधात गेली तरी तिला टक्कर द्यायची असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या जवळची माणसं कायमची गमावल्यानंतर सुद्धा कसं झोकून देऊन चांगल्याप्रकारे काम करायचं असतं याचा देखील वस्तुपाठ तुम्ही घालून दिलाय. यासाठी कमिटमेंट आणि डेडिकेशनची काय लेव्हल असली पाहिजे हे सुद्धा तुम्ही दाखवून दिलंय. केवळ राजकीय क्षेत्रातीलच नव्हे तर सर्व क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांचा आदर्श घेण्यासारखा आहे. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांची आपल्या कामासोबत असणारी निष्ठा व इच्छाशक्तीच आपल्याला सांगून जाते की कमिटमेंट आणि डेडिकेशनचं दुसरं नाव...मनोहर पर्रिकर. शेवटच्या भाषणात त्यांनी सगळ्यांना एक मोठी जबाबदारी दिलीय. Hows the josh असं विचारून झाल्यावर I will transfer my josh to you असं त्यांनी सांगितलं आहे. तो जोश कायम ठेवून सातत्याने काम करणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
मनोहर पर्रिकर यांच्यासाठी माझ्याकडून काही खास ओळी...
वाटचाल करताना तहानभूक मी हरपेन,
भारतमातेचा प्रत्येक आदेश शिरसावंद्य मी मानेन,
काम करताना सगळ्या वेदना मी विसरेन,
आलेल्या वादळांना देखील मी झुंजवेन,
समर्पणाच्या कसोटीवर खरा मी उतरेन,
आली कितीही संकटे तरी संघर्ष मी करेन,
नुसताच संघर्ष नाही तर त्यांना मी पुरून उरेन,
पुरून उरलेला मी आता स्वर्गातून काम करेन,
हे भारतमाते,
निरोप घेतो तुझा आता पण पुन्हा नव्याने या भूमीवर मी अवतरेन...
By Sanket...
निःशब्द...




