Monday, 27 May 2019

लाटेचा "अंडर-करंट"


23 मे 2019 रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी पूर्ण बहुमताने सत्तेत येणार हे स्पष्ट होतं. मुद्दा इतकाच होता की त्यांना जागा किती मिळणार. भाजपने एकट्याने तीनशेचा पल्ला पार केला आणि 'रालोआ' म्हणून 353 जागा मिळाल्या. अनेक वेळेला लोकांसोबत चर्चा करताना काही मुद्दे ऐकायला मिळत होते की 2014 सारखं वातावरण नाही, उत्साह नाही. मग पुन्हा मोदींच्या नेतृत्वातच सरकार येणार का? पण ग्राऊंड लेव्हलला सरकारनं खूप कामं करून ठेवल्यामुळे अँटी इन्कमबन्सी नावाची गोष्टच गायब झाली. मोदींनी केवळ राष्ट्रवादाची ढाल करून निवडणूक जिंकल्याचं चित्र रंगावण्यात तथाकथित पुरोगामी गुंतले आहेत. राष्ट्रवाद हा निवडणुकीचा मुद्दा असू शकत नाही पण तो चर्चेला आणावा लागतो हे देखील आपलं दुर्दैव. राष्ट्रवाद आपल्याकडं लोकांना शिकवावा लागतो आणि 'भारत तेरे टुकडे होंगे' हे मात्र उत्स्फूर्तपणे येतं ही शोकांतिका नव्हे काय? असो. पण पुन्हा एकदा तथाकथित पुरोगामी ग्राऊंड रिऍलिटीला फाटा देऊन स्वतःचं आकलन मांडत आहेत. पण ते स्वतःसोबतच जनतेला देखील फसवत आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. ते कोणत्या मुद्द्यांच्या आधारे आहे, याचं स्पष्टीकरण मी देणार आहे. नेमकी कोणती कारणं आहेत ज्यांनी मोदींचा विजय सोपा केला, लाट कशी निर्माण झाली, करंट कुठून आला आणि मोहीम फत्ते कशी झाली याचं विश्लेषण करण्याचा एक प्रयत्न.

1.मुख्यमंत्र्यांना फ्री-हँड
भाजपची ही सगळ्यात जमेची बाजू आहे. काँग्रेसच्या काळात मुख्यमंत्र्यांना छोट्या छोट्या गोष्टींसाठी उठसूठ दिल्ली वाऱ्या करायला लागत होत्या. स्वतःच्या राज्यात दौरे कमी आणि दिल्लीत जास्त अशी परिस्थिती असायची. भाजपने आपली राज्य सरकारे असणाऱ्या मुख्यमंत्र्यांना मनासारखे काम करायची मोकळीक दिली आणि मुख्यमंत्र्यांनी देखील तो विश्वास सार्थ ठरवत चांगली कामगिरी करून दाखवली. मुळात इथं कोणत्या घराण्याचे हितसंबंध आड येत नसल्यामुळे आणि कोण कोणाचा नातेवाईक नसल्याने मुख्यमंत्र्यांना मोकळीक द्यायला नेतृत्व कचरलं नाही. मुख्यमंत्र्यांनी आपल्याला मिळालेल्या फ्री हँडचा वापर पक्ष वाढवायला आणि योजनांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचायला केला.

2.संघटनात्मक बांधणी-
एका राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षाने कोणत्या प्रकारे काम करायचं असतं याचा वस्तुपाठ अमित शहांनी घालून दिला. 543 पैकी तब्बल 312 लोकसभा मतदारसंघांमध्ये अमित शहांनी दौरा केला. काही ठिकाणी तर प्रचार अभियानाची सुरुवात करताना स्वतः पोस्टर लावून त्याचा प्रारंभ केला. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आपसूकच ऊर्जा निर्माण झाली. तसंच सतत काही ना काही कार्यक्रम आयोजित करून पक्षाच्या यंत्रणेला व कार्यकर्त्यांना व्यस्त ठेवलं. ज्यातून पक्ष सतत लोकांच्या संपर्कात राहिला. त्यामुळं पक्ष संघटना नेहमीच प्रचार मोड मध्ये असल्याचं दिसलं. संघटना वरिष्ठांनी बांधली असली तरी अंतिमतः निवडणूक लोकांनीच हाती घेतल्याने विजयाचा मार्ग सुकर झाला.

3.लोककल्याणकारी योजना-
भाजपच्या दैदिप्यमान विजयात या एका मुद्द्याचा अत्यंत मोलाचा वाटा असल्याचं नीट अभ्यास करणाऱ्या कोणालाही लक्षात येईल. सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून बहुतांश योजना राबविल्या गेल्या. उजाला, स्वच्छ भारत, उज्ज्वला सारख्या योजनांमुळे देशात बीपीएल वरून एक नवीन लोअर मिडल क्लास तयार व्हायला लागला. लोकांचं राहणीमान उंचावायला लागलं. कारण लोकांचा मूलभूत गोष्टींसाठी होणारा खर्च कमी झाला. थेट लाभ हस्तांतरण माध्यमातून तब्बल 439 योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचवला गेला. मधली दलाली व गळती थांबली. हे लोकांना नक्कीच सुखावणारं होतं. जसं यूपीए 2 च्या काळात घोटाळे मोजताना थकून जायला व्हायचं तसं मोदी सरकारच्या योजना मोजताना थकून जायला होतं. ही गोष्ट सरकारला कम बॅक करायला खूप मोठा हातभार लावून गेली.

4.लोकसहभाग-
भाजपने लोकसहभागाचा अत्यंत खुबीने वापर करून घेतला. 'माय गव्ह' सारख्या पोर्टलच्या माध्यमातून जनतेला सरकारच्या विविध गोष्टींमध्ये सहभागी होण्याची संधी दिली. शिवाय स्वच्छ भारत, गिव्ह इट अप सारख्या योजनांच्या माध्यमातून जनतेमध्ये जागरूकता निर्माण केली. त्यामुळे लोकांना जणू आपणच सरकारचा एक भाग आहोत ही भावना निर्माण झाली. चांगलं काहीतरी सुरू असल्यामुळे भाजपपासून अंतर राखणारे लोक देखील स्वतःहून त्यात सहभागी झाले. आणि हेच लोक निवडणुकीच्या काळात भाजपला रेडिमेड प्रचारक म्हणून मिळाले. कारण हे माझं सरकार असल्याची भावना लोकांमध्ये निर्माण झाली.

5.उत्तरदायी सरकार-
आजपर्यंत सरकार लोकांना उत्तरदायी असतं ही संकल्पनाच अस्तित्वात नसल्यासारखं सरकारचं कामकाज चालायचं. मोदी सरकारनं ही संकल्पना सत्यता उतरवून थेट लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केलं. एका बाजूला मोदी पत्रकार परिषद घेत नाहीत काही ठराविक लोकांचा दंगा सुरू होता तर दुसऱ्या बाजूला सरकारी कामकाजाबाबत लोकांच्या तक्रारींचं समाधान करून सरकार थेट लोकांना भिडत होतं. ट्विटर, पीएमो, विविध मंत्रालयांचा परिणामकारक वापर करून लोकांच्या समस्यांचं समाधान केलं जात होतं. आजचं सरकार माझ्या समस्येची दखल घेतंय ही बाब जनतेला सुखावणारी होती. समस्येचं समाधान म्हणजे लोकांसाठी 'चेरी ऑन केक' होतं. जे लोकांना कधीच मिळालं नव्हतं. त्यामुळेच जे मिळतंय ते कायम राहावं ही लोकांची भावना झाली.

6.स्वच्छ कारकीर्द-
यूपीए-2 ची कारकीर्द भ्रष्टाचाराने अक्षरशः डागाळलेली होती त्यामुळं लोकांनी आपणहूनच त्या सरकारची गच्छंती केली. पण मोदी सरकार आपली स्वच्छ प्रतिमा घेऊनच निवडणुकीला सामोरे जाऊ शकले. राफेलचे आरोप कुठंही सिद्ध न होऊ शकल्याने त्यात तथ्य राहिलं नाही. काँग्रेसने आरोप करताना सतत कथित घोटाळ्याची रक्कम बदलल्याने त्या आरोपातील हवाच निघून गेली. या सरकारमध्ये एकही मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपाने पायउतार झाला नाही हे वैशिष्ट्य.

7.निष्क्रिय विरोधक-
जेव्हा मोदी जनतेपर्यंत पोहोचत होते तेव्हा विरोधी पक्ष एकीचा सूर आळवत होते. पण या एकीच्या सुरात कमालीचा कपटीपणा होता. एकतर आपण जिंकण्यापेक्षा दुसऱ्याला हरवणं ही नकारात्मकता त्यात ठासून भरलेली होती. दुसरं म्हणजे आपण कोणासोबतही सेटलमेंट केली तरी आपली वोट बँक आपल्याच पाठीशी राहील या भ्रमात ते राहिले. आणखी एक कारण म्हणजे या पक्षांचा परस्परांवर असलेला अविश्वास. हे विरोधक आजपर्यंत कधी ना कधी एकमेकांविरोधात उभे ठाकून अगदी कट्टर विरोध करत निवडणुका लढलेले आहेत. त्यामुळे यांचा परस्परांवर तेवढा विश्वास नाहीये. याउलट भाजपचं आहे. अकाली दल, जेडीयु, शिवसेना असे जुने एकनिष्ठ मित्रपक्ष भाजपसोबत असल्याने त्यांनी आपसांतले मतभेद वेळीच मिटवून थेट सत्तेपर्यंत पोहोचण्याचं उद्दिष्ट ठेवलं. परिणामी लोकांनी संधीसाधू व संधीचं सोनं करणाऱ्यांमधील फरक ओळखला आणि आपला कौल दिला.

8.योजनांचे संदर्भासहित स्पष्टीकरण-
भाजपचे कार्यकर्ते आणि संघाच्या स्वयंसेवकांनी मोदी सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवून त्याचं महत्त्व लोकांना वेळोवेळी पटवून दिलं. कोणत्या योजनांचे किती फायदे झाले, त्याचे लाभार्थी किती ही सगळी आकडेवारी लोकांपर्यंत पोहोचवली. शिवाय युवा मतदारांसाठी ही आकडेवारी वेबसाईटवर उपलब्ध होती. योजना व त्यांचे फायदे स्पष्ट असल्यानं मतदारांना समजावणं तुलनेनं सोपं गेलं. याऊलट काँग्रेसची अवस्था होती. काँग्रेसनं 'न्याय' योजना आणली खरी (ती चांगली की वाईट हा चर्चेचा वेगळा मुद्दा आहे) पण ती लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचवायला ते कमी पडले. ती योजना काँग्रेसच्या किती नेत्यांना नीट सांगता येईल हा देखील संशोधनाचा विषय आहे.

9.मोदीच सर्वेसर्वा असल्याचा संदेश/मोदी है तो मुमकीन है-
पक्षात इनकमिंग मोठ्या प्रमाणावर सुरू असताना लोकांमध्ये/कार्यकर्त्यांमध्ये काही प्रमाणात नाराजी होती. पण मोदी हेच नेतृत्व करतील आणि त्यांच्या शिस्तबद्ध पद्धतीनेच पक्ष चालेल हे लोकांच्या मनावर बिंबवण्यात भाजप यशस्वी झाला. कारण स्पष्ट आहे की लोकांचा विश्वास मोदींवर आहे, आयात केलेल्या सुभेदारांवर नाही हे मोदींच्या टीमने वेळीच ओळखलं होतं. त्यामुळे तुमच्या मतदारसंघात निवडून कोणीही आलं तरी मोदींचं नेतृत्वच सर्वेसर्वा असल्याचं लोकांना पुन्हा जाणवून दिलं. तसंच देशहितासाठी कठोर निर्णय घेण्याची वेळ आली तर केवळ मोदीच ते करू शकतात ही प्रतिमा लोकांसमोर निर्माण करण्यात मोदी यशस्वी झाले.

वरील मुद्द्यांचा विचार केल्यास लाट कशी निर्माण केली गेली हे लक्षात येईल. 2014 सारखी प्रस्थापित सरकारविरोधात अँटी इन्कमबन्सी नसल्याने ही लाट वरवर दिसणारी नव्हती. पण विविध प्रकारच्या डावपेचांनी निवडणुकीसाठी संपूर्ण मशागत केली होती. त्यामुळे लाटेचा एक अंडर करंट तयार झाला होता. त्या करंटने आपलं काम चोख केलं. या करंटने ज्यांना ऊर्जा द्यायची होती त्यांना ऊर्जा दिली आणि करंट्या लोकांना झटका दिला असंच म्हणावं लागेल.

गर्दी नियंत्रणाचे अडलेले घोडे

  मध्यंतरी महाराष्ट्रात दुर्दैवी अपघात घडला. मुंब्रा-दिवा स्टेशन दरम्यान दोन लोकल शेजारून जाताना त्यातील काही प्रवाशांचा रेल्वे ट्रॅकवर पडून...