बरेच दिवस कोणता चित्रपट पाहिला नव्हता. रिपोर्ट चांगला आहे म्हणून मुद्दाम वेळ काढून 'कबीर सिंह' पाहिला. चित्रपट कसा आहे यावर अनेक मतमतांतरे असू शकतात. कथानक आणि कलाकृती म्हणून चित्रपट उत्तमच आहे. पण काही वेळा असं वाटतं की किती नकारात्मकता दाखवली आहे. पण या नकारात्मकतेतून आपण सकारात्मक काय घेऊ शकतो ते शोधून शेअर करावं वाटलं यासाठी हा खटाटोप. हा मसालापट असल्याने डोकं बाजूला ठेवूनच तो बघायचा असतो परंतु काही गोष्टींचं अनुकरण होऊ शकतं यासाठी यावर भाष्य करणं आवश्यक आहे. आधीच शौक म्हणून प्रचंड स्मोकिंग करणाऱ्या हिरोचं प्रेमप्रकरण फिस्कटल्यानंतर तो नशेच्या प्रचंड आहारी जातो. दारू, गांजा, ड्रग्ज इत्यादी इत्यादी. त्या सगळ्या प्रकारात जवळपास 2-3 वेळा तो मरणाच्या दारात जाऊन सुदैवाने परत येतो. बऱ्याचदा तो भरकटून कसाही वागलेला दाखवलं आहे. एखादी व्यसनी व्यक्ती 3 महिन्यात जेवढं नशापाणी करणार नाही तेवढं त्या 3 तासाच्या चित्रपटात केलं गेलं आहे. याचं कारण काय तर मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टी.
आता थोडं चित्रपटातून बाहेर येऊ. आयुष्यात कित्येक गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडत असतात. सगळेच फासे आपल्याला हवे तसे पडतात असं नाही. आयुष्य म्हणलं की थोडं प्लस-मायनस व्हायचंच. पण याचा अर्थ असा नव्हे की त्या एखाद्या मनाविरुद्धच्या गोष्टीची शिक्षा संपूर्ण आयुष्याला द्यायची? आपल्या या नशापाण्याने लोकांच्या जाऊ दे, आपण स्वतःच्या उपयोगाचे देखील राहत नाही. यासाठी आपण मानसिकता बदलली तर अशा नशेच्या कुबड्या घेऊन आयुष्य जगण्याची वेळ येणार नाही. तसंही ज्याला आपण कुबड्या समजतो त्या आधार देण्याऐवजी खड्ड्यात घालत असतील तर या कुबड्या देखील कामाच्या नाहीत. चित्रपटाच्या सुरुवातीला एक जाहिरात पाहिली त्यात एका इसमाला सिगारेट घ्यायला पैसे आहेत पण सॅनिटरी नॅपकिनसाठी पैसे नाहीत. जीवाची काळजी घेणाऱ्या गोष्टीपेक्षा जीव धोक्यात घालणाऱ्या गोष्टी आपल्याला जवळच्या वाटत असतील तर ती आपली वैचारिक दिवाळखोरी नव्हे काय? अशा प्रकारच्या गोष्टींवर सातत्याने चर्चा करून कृती केली तरच काहीतरी सुधारणेची अपेक्षा बाळगता येईल. सकारात्मक गोष्टींची केवळ अपेक्षा करण्यापेक्षा सकारात्मक दृष्टिकोन बाळगणे केव्हाही उत्तम. तसंही नशेची इतकी आवर्तनं करून समस्येचं निराकरण तर होतंच नाही. तथाकथित 'सुकून' वगैरे मिळतो, पण तो क्षणिक असतो.
अर्थात तो चित्रपट असल्यानं त्याचा शेवट गोड करणं ही अपरिहार्यता असू शकते. पण रोजच्या आयुष्यातील गोष्टींचा शेवट गोडच होईल याची कोणतीच खात्री देता येत नाही. शेवट गोड झालाच तर सोन्याहून पिवळं. पण एखादी गोष्ट नाही झाली गोड म्हणून काही सगळंच कडू होतं असं नाही. खरंतर ते किती कडू करून घ्यायचं ते आपल्यावर असतं. त्यामुळं 'कुछ मीठा हो जाए' असा दृष्टिकोन ठेवलेला कधीही चांगला. कोणी कसं वागायचं हा व्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा असला तरी दोन चांगल्या गोष्टी सांगितल्या तर काही फरक पडत नाही. बाकी चित्रपट उत्तम आहे. फक्त नशे की चीजें सीखने से अच्छा है कुछ प्यार की चीजें सीखें। शायद कभी काम आएगा।😜
आणि गाणं म्हणजे सगळ्यात 'चेरी ऑन केक'...
दिल बनके मैं दिल धड़काउंगा,
मैं तेरा बन जाऊंगा...❤️
दिल बनके मैं दिल धड़काउंगा,
मैं तेरा बन जाऊंगा...❤️

