Tuesday, 30 July 2019

पवारांचे आत्मचिंतन


भाजप दबावाचं राजकारण करतो असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वक्तव्य केल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना चिंतन करण्याचा सल्ला दिला. अर्थात आत्मकेंद्रित विकासात मग्न असणाऱ्यांना आत्मचिंतन करायची इच्छा तरी कशी होणार. खरं तर 2014 पासूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गळती लागली आहे. पण 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर ती गळती अधिक 'तेज' होताना दिसत आहे. पक्षांतराचे कारण म्हणजे केवळ सत्तेला आसुसलेले नेते या एकाच चष्म्यातून आपण पाहणार असलो तर ते अगदीच उथळ विश्लेषण होईल. त्याशिवाय बरेच मुद्दे आहेत त्यावर विश्लेषण होणं गरजेचं आहे.

1. फोडाफोडीची पार्श्वभूमी
आज भाजपवर फोडाफोडीचा आरोप करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्थापनेलाच काँग्रेस मधील नेते फोडले. नंतरच्या काळात शिवसेना भाजप मधील अनेक नेते फोडले. आनंद परांजपे, गणेश दुधगावकर, जयसिंगराव गायकवाड हे खासदार व किरण पावसकर, धनंजय मुंडे हे आमदार फोडले. तसंच दिवंगत रमेश वांजळे यांच्या पत्नीला पोटनिवडणुकीत मनसेतून फोडून राष्ट्रवादीत आणणे अशी काही ठळक उदाहरणे देता येतील. मुळात ज्यांच्याकडे 'राष्ट्रवादी'त घडवलेले नेते नाहीत त्यांनी फोडाफोडीचे आरोप करणे हास्यास्पद आहे.

2. सुभेदारी पद्धत
राष्ट्रवादीने संघटनात्मक किंवा मंत्रिपद देताना जणू काही त्या भागातील सुभेदारी देत आहोत अशा अविर्भावात प्रस्थापित नेत्यांना जबाबदाऱ्या वाटल्या. नेत्यांचे बगलबच्चे हे कधीच पक्षाचे कार्यकर्ते नसतात तर ते फक्त त्या नेत्याचे कार्यकर्ते असतात. पर्यायाने प्रस्थापित नेतेच अधिक मुजोर होत गेले. त्यामुळे नवीन कार्यकर्ते निर्माणच झाले नाहीत. या प्रस्थापितांना जेव्हा जनतेने नाकारलं तेव्हा पक्षाची अशी संघटनात्मक बांधणी नसल्याने राष्ट्रवादीची सद्दी संपली.

3. घराणेशाही
ज्या प्रमाणात काँग्रेसने घराणेशाही अंगीकारली तोच कित्ता राष्ट्रवादीने देखील गिरवला. आता तर पवारांची तिसरी पिढी  निवडणुकीच्या राजकारणात आलीय. एकाने तर दारुण पराभव देखील पाहिला. शिवाय बहुतांश बड्या नेत्यांची मुलं खासदार-आमदार झाली आहेत. आणि कालांतराने नाकर्तेपणामुळे जनतेने नाकारली देखील आहेत. पण तरीही राष्ट्रवादीने यातून धडा घेतलेला नाहीच.

4. पक्षाची भ्रष्ट प्रतिमा
अजित पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांच्यासारख्या बड्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्या आरोपांवर अजूनही पक्षाला धड स्पष्टीकरण देता आलेले नाही. शिवाय लवासावर चर्चा होते ती वेगळीच. छगन भुजबळ, रमेश कदम यांनी तुरुंगाची हवा देखील खाल्ली. दुसऱ्या बाजूला जिल्हा मध्यवर्ती बँका, कारखाने डबघाईला आणले. त्यामुळे जनमानसात राष्ट्रवादीची प्रतिमा भ्रष्टवादी होत गेली.

5. जनतेला गृहीत धरणं
ज्या पश्चिम महाराष्ट्राने पवारांना भरभरून दिलं त्याबदल्यात त्यांनी लवासा व बारामती सोडून कुठंच ढुंकूनही पाहिलं नाही. त्यामुळे सर्वसामान्य मतदार देखील त्यांच्यापासून दुरावला. माढ्याचे खासदार असताना देखील त्या मतदारसंघाला सापत्न वागणूक दिली. आपण कसंही वागलो तरी मतदार आपल्या पाठीशी राहील या भ्रमात ते राहिले. अखेर 2019 साली हा भ्रमाचा भोपळा खऱ्या अर्थाने फुटला.

6. तुष्टीकरण
आजपर्यंत केवळ काँग्रेसवर तुष्टीकरणाच्या राजकारणाचा आरोप व्हायचा. पण राष्ट्रवादीने त्याबाबतीत काँग्रेसला देखील लाजवेल अशी कामगिरी करून दाखवली. प्रसंगी इशरत जहाँ सारख्यांची बाजू घेऊन देखील त्याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला. खुद्द पवारांनी देखील अल्पसंख्याक तरुणांवर खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचा निराधार आरोप केला होता. त्यामुळे राष्ट्रवादीच्या तुष्टीकरणाच्या राजकारणाची मजल कुठपर्यंत आहे ते आपल्या लक्षात येईल.

7. उद्धट नेते
दुष्काळी भागातील जनता पाण्यासाठी आंदोलन करत असताना अजित पवार यांनी पाणी नाही तर धरणात लघुशंका करायची का असा प्रश्न विचारून जनतेची थट्टा केली होती. अशा प्रकारची अनेक विधानं राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून करण्यात आली. पण अध्यक्ष या नात्याने त्यांना कोणतीही तंबी देण्याचं काम पवारांनी केलं नाही.

8. यु टर्न
ज्या विदेशी मूळाच्या मुद्यावरून राष्ट्रवादीची स्थापना झाली त्यानंतर अवघ्या 4 महिन्यांतच त्यांनी काँग्रेस सोबत सत्तेसाठी घरोबा केला. त्यामुळे सुरुवातीलाच त्यांच्या पक्षाची विश्वासार्हता संपुष्टात आली. तसंही पवार हे राजकारणात बेभरवशाचे म्हणूनच ओळखले जातात. कारण एखादं मत मांडून किंवा भूमिका घेऊन त्यावर यु टर्न मारणं हे नेहमीचंच आहे. पर्यायाने सुज्ञ लोकांनी राष्ट्रवादीकडे आश्वासक पर्याय म्हणून कधीच पाहिलं नाही.

9. खंजीर खुपसणे
राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापनाच मुळात काँग्रेस मधून फुटून झाली आहे. त्याआधी काँग्रेसमधूनच फुटून त्यांनी पुलोदचा प्रयोग देखील केला होता. त्यामुळे पवारांनी पक्ष नेतृत्वाच्या पाठीत खंजीर खुपसल्याची अशी ज्वलंत उदाहरणं आहेत. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलेल्यांनी काय आदर्श घ्यावा हे खुद्द पवारांनीच कृतीतून दाखवून दिलं आहे. सत्तेचा यथेच्छ लाभ घेणे आणि काम झाल्यावर टांग मारणे हाच आदर्श त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना घालून दिला.

10. विचारधारेचा अभाव
मुळात राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना सोनिया गांधींच्या विदेशी मूळ असल्याच्या कारणाने झाली. त्यात कोणताही 'राष्ट्रवादी' उद्देश किंवा बाणा वगैरे नव्हता. विचारधारेचा पाया असल्याशिवाय राजकीय पक्ष तग धरून राहू शकत नाही. स्थापनेच्या वर्षीच सत्तेची ऊब मिळाल्याने अनेकजण तिथं टिकून राहिले. गेल्या वीस वर्षांत राष्ट्रवादीने कोणत्याही(धार्मिक/जातीय सोडून) राष्ट्रीय प्रश्नावर हिरीरीने साधं मत मांडल्याचं निदर्शनास येत नाही. केवळ आकडेवारीनुसार राष्ट्रीय पक्ष पण एकाही राष्ट्रीय प्रश्नांची जाण नाही. विचारधारा नसल्याने कोणताही ठोस मतदार वर्ग तयार झाला नाही. जे मतदार जोडले गेले ते केवळ नेत्यांच्या संस्थात्मक पसाऱ्यामुळे, सत्तेच्या लाभांमुळे आणि तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे.

11. गटबाजी
ज्या पश्चिम महाराष्ट्राला राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणलं जातं तिथंच मुळात गेल्या कित्येक वर्षांपासून प्रचंड गटबाजी आहे. बाकीच्या प्रांतातील चर्चा न केलेलीच बरी.
सांगली- आर आर पाटील-जयंत पाटील
सातारा- तिन्ही राजे
कोल्हापूर- मंडलिक-मुश्रीफ
सोलापूर- मोहिते पाटील-बबनदादा शिंदे
पुणे- दिलीप वळसे पाटील- अजित पवार
सांगली आणि पुण्यात गटबाजीची तीव्रता तुलनेनं कमी आहे. पवारांनी या बालेकिल्ल्यातील गटबाजीवर वेळीच हस्तक्षेप केला असता तर कदाचित वेगळं चित्र दिसलं असतं. पण काँग्रेसी संस्कृती पवारांच्या नसानसांत भिनली असल्याने नेत्यांच्या झुंजी लावून त्याच्या गंमती बघणे हे देखील ओघाने आलेच.

शिवसेनेचा उमेदवार असणाऱ्या मतदारसंघात भाजपला मत गेलं असं डोळ्यांनी पाहिल्याची थाप मारणाऱ्या शरद पवार यांनी या सगळ्या गोष्टी समोर घडत असताना डोळे उघडे ठेवले असते तर कदाचित परिस्थिती वेगळी असली असती. सुभेदार नेमले की सत्ता जाईल तसे ते साथ सोडतात पण कार्यकर्ते घडवले तर ते वाईट काळात देखील साथ देतात. तसंही संस्थाने खालसा झाली की सुभेदारांचे अस्तित्व संपुष्टात येते आणि पर्यायाने 'तथाकथित' जाणत्या राजांचेही.

गर्दी नियंत्रणाचे अडलेले घोडे

  मध्यंतरी महाराष्ट्रात दुर्दैवी अपघात घडला. मुंब्रा-दिवा स्टेशन दरम्यान दोन लोकल शेजारून जाताना त्यातील काही प्रवाशांचा रेल्वे ट्रॅकवर पडून...