भारताचा पहिला वहिला यशस्वी माजी कर्णधार सौरव गांगुलीने मागच्या आठवड्यात बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. खरंतर बीसीसीआयचे अध्यक्षपद हे प्रतिष्ठेचे असले तरी ते मलईदार म्हणून अधिक कुप्रसिद्ध झाले. त्यात आयपीएल नावाच्या बांडगुळाने तर अब्रूची लक्तरे संपूर्ण क्रिकेटविश्वाच्या वेशीवर टांगली. ज्या भारताचा क्रिकेटची जागतिक महासत्ता असा उल्लेख केला जातो तिथं तर हे सगळं अशोभनीय होतं. तसंही या सगळ्याची पडली कोणाला होती? संघटनेतील बहुतांश लोक आपली पोळी भाजून घेण्यात आणि मलिदा गोळा करण्यात मश्गुल होते. शिवाय राजाश्रयाच्या नावाखाली राजकीय लोकांचा धिंगाणा सुरूच होता. त्यात सर्वपक्षीय हितसंबंध गुंतल्याने सगळीच अळीमिळी गुपचिळी होती. न्या.लोढा समितीच्या हस्तक्षेपानंतर काहीतरी सुधारेल ही अपेक्षा होती, पण ती देखील फोल ठरली. कारण नियम कडक करण्याच्या नादात त्याला दिशाहीनताच अधिक येऊ लागली. तसंच गेले 33 महिने बीसीसीआय निर्नायकी अवस्थेत होते. प्रशासकीय समितीच्या मार्फत चालवला जाणारा कारभार त्यांच्या अंतर्गत वादांनीच जास्त गाजला. एकूण काय तर जुने पदाधिकारी जाऊन नवीन हेवेदावे करणारे लोक आले यापेक्षा जास्त काही झालं नाही.
2000 साली ज्या परिस्थितीत गांगुलीकडे भारतीय संघाची सूत्रं आली होती ती परिस्थितीच अत्यंत बिकट होती. मॅच फिक्सिंगच्या काळ्या डागानंतर टीम बांधण्यापेक्षा टीमचं मनोधैर्य उंचावणं ही प्राथमिकता होती. हे करतच पुढे जाऊन चांगली टीम बांधली. अनुभवी आणि नवोदित यांचं एक चांगलं कॉम्बिनेशन तयार केलं. ज्यावेळी गांगुलीला आपण पहिला यशस्वी कर्णधार म्हणतो त्यावेळी त्याच्या यशापेक्षा एक गोष्ट अधिक भारावून टाकते. गांगुलीने मरगळलेल्या टीममध्ये चैतन्य निर्माण केलं, परदेशात जिंकण्याची सवय लावली, टीम एकसंध ठेवली, युवा खेळाडूंना प्रोत्साहन दिलं. पण त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाचं म्हणजे प्रतिस्पर्ध्यांच्या डोळ्यात डोळे घालून मॅचेस खेळायला शिकवलं. जहीर खान हा त्याबाबतीतला गांगुलीचा पहिला शिष्य ज्याने डोळ्यात डोळे घालून बॉलिंगला सुरुवात केली. गांगुलीचं भारतीय टीम साठी योगदान हे वैयक्तिक पेक्षा सांघिक पातळीवर अधिक आहे. कारण त्याने कधीच स्वतःची शतकं, विक्रम, स्वतःचं वलय असल्या तुलनेनं दुय्यम गोष्टींवर लक्ष दिलं नाही. म्हणूनच आज तो इतका मोठा होऊ शकला. अर्थात मोठा झाला असला तरी क्रिकेट सोबतची नाळ तेवढीच घट्ट आहे जेवढी संघाचं नेतृत्व करताना होती. अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारताना टीम इंडियाचं ब्लेझर घालून येणं हे देखील त्याचंच उदाहरण. आज आपली टीम ज्या विजयी दिमाखात वावरत असते त्याचा पाया गांगुलीनेच रचला असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही.
खरं पाहायला गेलं तर जगमोहन दालमियांच्या नंतर क्रिकेटची जाण आणि तळमळ असणारा अराजकीय अध्यक्ष दुर्दैवाने लाभलाच नाही. प्रत्येकाने आपली राजकीय पार्श्वभूमी वापरून पदं मिळवली. भाजप वा काँग्रेस हे दोन्ही पक्ष त्याला अपवाद नाहीत. आज बीसीसीआयची विश्वासार्हता रसातळाला गेलीय त्यात या राजकारण्यांचा वाटा मोठा आहे. क्रिकेटचं मैदान हे राजकीय आखाडा नाही एवढं साधं तारतम्य या लोकांना बाळगता आलं नाही. जगमोहन दालमिया हे आपल्याच लोकांच्या फुटीरतावादी आणि दगाबाज वृत्तीने गोत्यात आले होते हे विसरून चालणार नाही. त्यामुळे आज एखाद्या राजकीय गटाच्या सॉफ्ट कॉर्नरमुळे अध्यक्ष पदाची संधी मिळाली असली तरी गांगुलीने राजकीय आशीर्वादाने एंट्री केलेल्यांच्या दबावाला बळी न पडता क्रिकेटसाठी हितकारक निर्णय घ्यावेत हीच तमाम क्रिकेटप्रेमींची अपेक्षा आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटपटूंच्या आर्थिक स्थैर्यावर लक्ष केंद्रित करून त्याने आपल्या नेतृत्वाची आणि दूरदृष्टीची चुणूक दाखवली आहे. वास्तविक पाहता त्याला मिळणारा 9-10 महिन्यांचा कार्यकाळ अत्यंत कमी आहे. ट्रेलर तर मस्तच आहे, पूर्ण इंनिग अधिक दर्जेदार असेल असा विश्वास आहे. टीमसाठी नेतृत्व करताना जो कर्णधार बघायला मिळाला तोच आम्हांला बघायला मिळेल आणि सौरव गांगुली हा बीसीसीआय मधील निर्नायकी नंतरचा नायक ठरेल अशी खात्री आहे.

