उदाहरण- मध्य प्रदेश
कमलनाथ यांच्यासारख्या व्यक्तींनी नेत्यांना खुश करण्यासाठी 1984 साली दिल्लीत देखील पराक्रम करून दाखवला होता. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री पदासोबतच प्रदेशाध्यक्ष पदाची दुहेरी जबाबदारी देण्यात आली. त्यासाठी वेळप्रसंगी दिग्विजय सिंग यांना सिंधियांच्या विरोधात कमलनाथ यांच्या पारड्यात वजन टाकायला सांगण्यात आलं. हे तेच दिग्विजय सिंग ज्यांनी हिंदू दहशतवादाची संकल्पना मांडली होती. एका तरुण नेत्याचं खच्चीकरण करण्यासाठी 2 वयोवृद्ध दरबारी राजकारणी वापरण्यात आले आणि पक्षाचं भवितव्य अंधारात लोटलं.
उदाहरण- महाराष्ट्र
महाराष्ट्राचं उदाहरण घ्यायचं झालं तर पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या अत्यंत हुशार नेत्यावर देखील शरद पवारांमुळे (पाऊण डझन खासदारांसाठी) दिल्लीतून डोळे वटारले गेले. अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे वगैरे मंडळी केवळ दरबारी राजकारणामुळे पदे मिळवत गेली. पण पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे कॅलिबर होतं. काँग्रेसनं त्यांना फ्री हँड दिला असता तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस साफ करून दाखवली असती. राष्ट्रवादीचे घोटाळे बाहेर काढणे, राज्य सहकारी बँकेवरील निर्बंध वगैरे एकदम मुरब्बी राजकारण्यासारख्या चाली होत्या. पण काँग्रेसने पृथ्वीराज यांना ताकद दिली नाही. पश्चिम महाराष्ट्रात त्यांनी काँग्रेसला गतवैभव मिळवून दिलं असतं. पण आपल्या नेत्यांवर विश्वास ठेवेल ती काँग्रेस कुठली? आजच्या ज्योतिरादित्य यांच्या राजीनाम्यावर पृथ्वीराज चव्हाण यांची आलेली प्रतिक्रिया अत्यंत बोलकी आहे.
उदाहरण- आसाम
आसाम मधील तत्कालीन काँग्रेस नेते हिमंत विश्व शर्मा हे राहुल गांधी यांना भेटायला गेले असताना राहुल हे कुत्र्याला बिस्कीट भरवण्यात दंग होते असं सांगितलं जातं. ती अतिशयोक्ती आहे असं गृहीत धरलं तरी त्यांनी हिमंत विश्व शर्मा यांना दुर्लक्षित केलं आणि पर्यायाने आसाम मधील सत्ता गमावली.
राजकारणात बहुतांश लोक संधीसाधू असतात हे खरं असलं तरी प्रत्येक नेता केवळ त्यासाठीच बाहेर पडतो असं समजणं चुकीचं ठरेल. ज्या ज्योतिरादित्य सिंधिया यांचा राजकीय बळी देण्यात आला त्यांच्या कामाचा एक आढावा घेऊ. काँग्रेस 2007 साली केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री म्हणून त्यांना जबाबदारी दिली गेली. त्यावेळी ए. राजा नावाची व्यक्ती कॅबिनेट मंत्री होती. एकीकडे 2जी घोटाळ्याचे अध्याय लिहायला सुरुवात झालेली असताना ज्योतिरादित्य यांनी पोस्ट ऑफिसचा कायापालट करून दाखवला. जुनाट कार्यालये चकचकीत झाली आणि ऑनलाईन सिस्टीममध्ये आणायला सुरुवात झाली त्यात ज्योतिरादित्य यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी परफॉर्म करून दाखवलं, पण त्याचं बक्षीस त्यांना डावलून आणि पराभूत करून मिळालं. त्याचं एकमेव कारण म्हणजे दरबारात वशिला असणारे सुभेदार. मेरिट असून देखील दरबारात ज्योतिरादित्य कमी पडले. त्याची परिणती त्यांच्या काँग्रेस पक्षातून बाहेर पडण्यात झाली आहे. एवढे पराभव सहन करून देखील अजून काँग्रेस बदलली नाही याचं याचं सखेद आश्चर्य वाटतं.
सर्वच राजकीय पक्षांनी या घटनांमधून धडा घेण्याची आवश्यकता आहे. अन्यथा history repeats यापलीकडे त्याला काहीच म्हणता येणार नाही. पक्षाचं नुकसान तर होईलच पण त्यासोबतच राजकीय क्षेत्राचं नुकसान होईल. या साठमारीमुळे चांगली माणसे राजकारणातून हद्दपार होतील तेव्हा दोष द्यायला देखील कोणी शिल्लक नसेल. पर्यायाने नागरिकांच्या पदरी निराशाच येत राहील. त्यामुळे नागरिकांनीच निवडणुकांमधून अशा राजकीय पक्षांना धडा शिकवायला हवा.
