Friday, 17 April 2020

लॉकडाऊन नंतरच्या टिप्स


भविष्यात जेव्हा सरकार लॉकडाऊन शिथिल करेल तेव्हा बाहेर पडण्यापूर्वी हे लक्षात ठेवूया-

1. आपलं रुटीन सुरू करताना धोका टळलेला नाही ही मानसिकता बनवून बाहेर पडूया.

2. सोशल डिस्टनसिंगचं काटेकोरपणे पालन करूया.

3. स्वतःची काळजी घेणे यापेक्षा अधिक प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय कोणताही नाही.

4. प्रत्येकाने तोंडाला मास्क/रुमाल लावूनच घराबाहेर पडूया.

5. हात धुतल्यावरच चेहऱ्यावर लावला जाईल अशी सवय लावून घेऊया. एव्हाना 'स्वच्छतेचं' महत्त्व आपल्या लक्षात आलं असेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

6. कामाशिवाय अतिरिक्त भटकंती टाळून काम संपलं की आपलं घर गाठणे एवढं जरी आपण केलं तरी गर्दी कमी करण्यात आपला मोठा वाटा राहील.

7. आपल्याशी संबंधित योग्य गरजू लोकांना यथाशक्ती मदत करूया.

8. आपल्याला परिस्थिती खडतर वाटत असेल तेव्हा आपल्यापेक्षा अडचणीत असलेल्या व्यक्तीकडे पाहूया. मनोधैर्य नक्कीच वाढेल.

9. 'लूट न करणाऱ्या' व्यावसायिकांसोबत शक्यतो 'बार्गेनिंग' टाळूया.

10. तब्येत बरी नसेल तर घराबाहेर पडण्याचे टाळणे. जेणेकरून आपल्यामुळे कोणाची गैरसोय होणार नाही आणि आपणही धोक्यात येणार नाही.

11. आपली रोगप्रतिकारशक्ती वाढावी यासाठी व्हिटॅमिन 'सी' असणाऱ्या लिंबाचा आपल्या आहारात योग्य प्रमाणात समावेश करूया.

12. आपल्या जीवनशैलीवर बंधने नक्कीच येणार आहेत पण ती आपल्या सुरक्षेसाठी आहेत हे लक्षात ठेवूया.

13. सध्या मजबूर सगळेच आहेत, पण कोणीच एकमेकांच्या मजबुरीचा गैरफायदा घ्यायला नको.

14.केंद्र/राज्य सरकार/स्थानिक स्वराज्य संस्था यांना सहकार्य करूया. कदाचित आपले यांच्यापैकी कोणासोबतही राजकीय मतभेद असतील. धोरणात्मक त्रुटी दाखवल्या तरी यंत्रणांना आपलं सहकार्य हवं. त्यांचे नियम पाळायला हवेत. शिथिलता आणली म्हणून त्याचा गैरफायदा घेणे नाही. एखाद्या यंत्रणेसोबत मतभेद आहेत म्हणून त्यांचे नियम न पाळणे हे सुसंस्कृतपणाचे लक्षण नाही.

15. देशाला पुन्हा एकदा स्ट्रॉंग बनवायचं आहे. आपण आजूबाजूच्या व्यक्तींना सहकार्य करत पुढं जाऊ. सध्या आपल्या सारख्या सामान्य व्यक्तींनी तेवढं करणं अपेक्षित आहे. आपला खारीचा तर वाटा असू द्यात.

16. गेल्या काळात अत्यावश्यक सेवांवर जो ताण आला आहे तो कमी करायचा प्रयत्न करूया. ती सुद्धा माणसंच आहेत ना. त्यांनाही स्वतःचं आरोग्य आणि आयुष्य आहे. त्यांनाही सुखाने जगावं वाटत असेलच की. आपल्या गाढवपणामुळे आपल्यासोबतच त्यांना देखील संकटात आणतो आपण. मग ते डॉक्टर, नर्सेस, सफाई कर्मचारी वा अन्य कोणीही असतील. आपण त्यांचा सुद्धा विचार केला पाहिजे. कारण लॉकडाऊन असताना ते सगळे आहेत म्हणून आज आपण आहोत.

पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येणार नाही हे काही प्रमाणात तरी नक्कीच आपल्या हातात आहे. दुर्दैवाने जर आपल्या बाबतीत काही दगाफटका झालेला कळाला तर त्वरित स्वतःला लोकांपासून वेगळं करून घेऊ. या रोगाचा फैलाव रोखण्यात आपला उपयोग होईल अशाप्रकारची आपली वागणूक असली पाहिजे. अन्यथा आपण जगण्याच्या लायकीचे नाही. शब्द कठोर असतील, पण धड वागलो नाही तर परिस्थितीच आपली विकेट घेईल.

मी गरजेच्या वस्तूंसाठी बाहेर पडतो तेव्हा वर लिहिलेल्या गोष्टी फॉलो करतो. सुरुवात तर माझ्यापासूनच केलीय. अजून काही गोष्टी करण्यासारख्या असतील तर जरूर सुचवा.

जिंकायचंय ना कोरोनाविरुद्ध? एवढं केलं तर जिंकूच आपण...

गर्दी नियंत्रणाचे अडलेले घोडे

  मध्यंतरी महाराष्ट्रात दुर्दैवी अपघात घडला. मुंब्रा-दिवा स्टेशन दरम्यान दोन लोकल शेजारून जाताना त्यातील काही प्रवाशांचा रेल्वे ट्रॅकवर पडून...