भारतरत्न व माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विविध सरकारांमध्ये त्यांनी अत्यंत महत्त्वाची खाती भूषविली. खरंतर प्रणबदा कधी खासदार, मंत्री व राष्ट्रपती होते त्याबद्दल इंटरनेटवर माहिती सहज मिळेल. पण प्रणबदा भारतीय राजकारणात त्यापेक्षाही अत्यंत महत्त्वाच्या भूमिका पार पाडत होते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी त्यांना प्रथम संधी दिली आणि त्यांनी त्याचं सोनं देखील केलं. ते केवळ इंदिरा गांधींचे निष्ठावंत म्हणून नव्हे तर पक्षाच्या मूळ विचारधारेशी निष्ठावान राहिले. 'बिग फोर' पैकी संरक्षण, परराष्ट्र आणि अर्थ अशी तीन खाती त्यांनी समर्थपणे सांभाळली. त्यांच्या धोरणांबद्दल मतभिन्नता असू शकते पण ज्या पद्धतीने ते अनेक गोष्टी मांडायचे ते वाखाणण्यासारखे आहे. प्रणबदा लोकनेते नव्हते पण लोकहिताची जाणीव त्यांना होती. सरकार चालवताना आवश्यक कौशल्य त्यांच्यामध्ये होतं.
खरंतर इंदिरा गांधींच्या कार्यकाळातच प्रणबदा अर्थमंत्री बनले होते. पण त्यांना त्यापुरतंच सीमित ठेवण्यात आलं. 2004 साली सरकार स्थापन होत असताना पंतप्रधान पदावर त्यांचा नैसर्गिक हक्क होता. पण काँग्रेसला आदेशाचे पालन करणारी व्यक्ती हवी असल्याने प्रणबदांना संधी मिळू शकली नाही. अखेर त्यांनीच काळाची पावले ओळखून राष्ट्रपतीपदाची आपली उमेदवारी पक्की करून घेतली. पण त्यापूर्वी पक्षाने डावलून सुद्धा पूर्ण क्षमतेनं पक्षासाठी आपलं योगदान दिलं. युपीए-1 हा काँग्रेससाठी सुवर्णकाळ होता तर यूपीए-2 हा अत्यंत खडतर काळ होता. त्या खडतर काळात प्रणबदांनी संकटमोचकाची भूमिका पार पाडली होती. अन्य मंत्री पळ काढत असताना अथवा अडचणीत येत असताना एकटे प्रणबदा विरोधकांना सामोरे जात होते. भ्रष्टाचाराचे आरोप, अनागोंदी कारभार यामुळे सरकारची नाचक्की होत असताना अत्यंत कौशल्याने त्यांनी सरकारची बाजू लावून धरली होती.
प्रणबदा राष्ट्रपती असतानाच सत्तांतर होऊन नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. पण आपल्या पक्षाची व्यक्ती पंतप्रधानपदी नसताना देखील त्यांनी पूर्ण सहकार्य केले. नरेंद्र मोदी देशाच्या सरकारचे प्रमुख म्हणून नवीन असताना आवश्यक तिथे मार्गदर्शन देखील केलं. कोणताही भेदभाव केला नाही. प्रणबदा व नरेंद्र मोदी यांचं नातं गुरू शिष्याचं होतं. खुद्द नरेंद्र मोदी यांनीच याबद्दल सांगितलं होतं. दोघांनीही एकमेकांचं जाहीरपणे कौतुक केलं होतं. एकमेकांप्रती आदर व काळजी होती. मोदींच्या सातत्याने काम करण्याच्या सवयीवर 'थोडी विश्रांती घेत जा' अशा प्रकारचा प्रेमळ सल्ला दिला होता. नरेंद्र मोदी यांनी सुद्धा वेळोवेळी त्यांचे आशीर्वाद घेतले. तो कालखंड आपल्या लोकशाहीच्या इतिहासातील सुवर्णकाळ म्हणला तरी वावगं ठरणार नाही. त्यातून एका निकोप लोकशाहीचं दर्शन सर्वांना घडलं होतं.
काँग्रेसची खरी समस्या आहे की त्यांचा पक्ष पर्यायाने कार्यकर्ते हे कधीच घराण्याबाहेरच्या सक्षम व कर्तबगार नेत्यांना स्वीकारत नाहीत व प्रेमही देत नाहीत. त्यामुळे चांगल्या नेतृत्वाला काँग्रेस पक्ष मुकतो. आज काँग्रेसची वाताहत होण्याचे कारण कोणत्याही नेत्यांच्या आधी त्यांचे कार्यकर्ते आहेत. त्यांनाच एका घराण्याची हुजरेगिरी करण्यात धन्यता वाटते. प्रणबदा त्यांच्या पक्षाचेच इतके कर्तबगार नेते असताना देखील काँग्रेसच्या लोकांनी त्यांचं कधी खुल्या दिलानं कौतुक केलं नाही. एवढंच नाही तर त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यासपीठावर हजेरी लावल्याने त्यांच्यावर तिखट शब्दांत टीका करण्यात काँग्रेसचे लोक अग्रेसर होते. अर्थात पदं देऊन नेत्यांचा अपमान करायचा ही देखील काँग्रेसची जुनी संस्कृती राहिली आहे. काँग्रेसजनांच्या या संकुचित मनोवृत्तीची खंत प्रणबदांना नेहमीच राहिली असेल. आज त्यांचं निधन झालं. किमान यापुढे तरी काँग्रेस समर्थकांनी त्यांच्या संकटमोचक असण्याची कृतज्ञता व्यक्त करावी. अर्थात हीच कृतज्ञता त्यांच्या हयातीत व्यक्त केली असती तर प्रणबदा भरून पावले असते. एक बरे झाले की मोदी सरकारने हीच कृतज्ञता वेळीच दाखवल्याने 'प्रणबदा' त्यांच्या हयातीत 'भारतरत्न' झाले. त्याचे श्रेय केवळ त्यांच्या दैदिप्यमान कारकिर्दीचेच. राष्ट्रपती असताना त्यांच्या ट्विटर हँडलचं 'प्रेसिडेंट मुखर्जी' असणारं नाव राष्ट्रपतीपदावरून पायउतार झाल्यावर त्यांनी 'सिटीझन मुखर्जी' असं केलं होतं. मला वाटतं की हेच खरे प्रणबदा आहेत. सर्वोच्च शिखरावर असताना व त्यानंतर देखील आपल्याला 'सिटीझन मुखर्जी'च पाहायला मिळाले.

