गणेशोत्सव. वर्षभरासाठी लागणाऱ्या ऊर्जेचा स्रोत असणारा उत्सव. काही कारणाने मरगळ आली असेल तर ती झटकून टाकणारा उत्सव. उत्सव सार्वजनिक झाला तसं लोक आणखी एकमेकांच्यात मिसळू लागले. ही मंडळं आपली सुखदुःख वाटण्याची हक्काची ठिकाणं होऊ लागली. जिवाभावाचा मित्र परिवार तयार होऊ लागला. समाजात एकी वाढू लागली. लोकांच्या वर्गणीतून उत्सव साजरा होत असल्याने त्यात आपलेपणाची भावना निर्माण झाली. त्यामुळेच घरगुती गणेशोत्सवासोबतच सार्वजनिक उत्सवाचे देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे. घरगुती असणारा हा उत्सव सार्वजनिक कधी झाला बरं? 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच' या गर्जनेने लोकमान्य टिळकांनी जंग जंग पछाडले होते. ब्रिटिशांनी लोकांच्या एकत्र येण्यावर बंधने घालायला सुरू केल्यावर स्वातंत्र्य लढ्याची अडचण होऊ लागली. लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांना टक्कर देण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केले. हा एक प्रकारचा 'गनिमी कावा'च होता. तेव्हाच्या काही लोकांनी टिळकांवर यथेच्छ टीका केली होती. 'घरातला देव रस्त्यावर आणला' अशा प्रकारे त्यांना हिणवलं गेलं. पण त्यांचा उद्देश स्वच्छ होता. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लोकांना रस्त्यावर आणण्याचा खटाटोप होता. केवढा हा उदात्त हेतू. पण हेतू काय आणि आजचे वास्तव काय?
सध्याचा गणेशोत्सव म्हणजे डॉल्बीवाल्या मिरवणुका, आवाज कोणाचा मोठा, त्यातील विचित्र नाच, लेसर शो, वर्चस्ववादी स्पर्धा, वर्गणीची सक्ती, राजकारण्यांकडून उकळली जाणारी वर्गणी, त्याबदल्यात मतांची बेगमी, त्यातून गल्लीच्या रस्त्यावरील ढीगभर मंडळं, त्यातील गटबाजी, मिरवणुकीतील भांडणं, वर्गणीची अफरातफर. बहुतांश लोकांना गणेशोत्सव मंडळं हे उत्सवाचं माध्यम नसून धांगडधिंगा करायचे अड्डे वाटतात. हे सगळं गणपती बाप्पा करायला सांगतो का? अनेक मंडळं सामाजिक उपक्रम नक्कीच करतात. रक्तदान, आरोग्य शिबीर, गरजूंना खाऊ वाटप अशा प्रकारचे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. अशा मंडळांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. पण मंडळांची एकूण संख्या आणि प्रत्यक्षात असे काम करणाऱ्या मंडळांची संख्या यामध्ये दुर्दैवाने बरीच तफावत आढळते. कोणाची मिरवणूक मोठी होते यातील स्पर्धा कोणाच्या माध्यमातून चांगली कामे झाली अशी कधी होईल? गेल्या अनेक वर्षांची भरकटलेली अवस्था पाहता सध्या तरी ते अवघड वाटतं. पण अशक्य जरूर नाही. काही गोष्टी चुकीच्या होत असतील तर त्या सुधारायला हव्यात. पण नेमकं काय चुकत आहे ते मोकळ्या मनाने समजून घ्यायची तयारी हवी.
मग आता सार्वजनिक गणेशोत्सव बंद करायचा का? अजिबात नाही. तो धुमधडाक्यातच साजरा झाला पाहिजे. धुमधडाक्यात म्हणजे आणखी काही फटाक्यांच्या माळा लावायच्या का? तसंही नाही. उत्सव जोरात झाला पाहिजे, लोकमान्यांनी सुरू केलेली परंपरा आपण जपली पाहिजे. पण काळानुरूप त्याचं स्वरूप बदललं पाहिजे. बाजारू गणेशोत्सवाऐवजी तो लोकमान्यांना अभिप्रेत उत्सव झाला पाहिजे. देश स्वतंत्र झाला पण आव्हानं कायम आहेत. आव्हानांनी त्यांचं स्वरूप बदललं. मिरवणुका देखील निघाव्यात, ज्या आपल्या पारंपरिक वेशभूषा, वाद्ये व नृत्य असणाऱ्या आणि संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या असल्या पाहिजेत. मिरवणुकीत लावली जाणारी गाणी अंगावर शहारे आणणारी असली पाहिजेत. दुसऱ्या मंडळासोबत स्पर्धा केली तरी ती निकोप आणि सकारात्मक स्पर्धा असावी. गोळा केलेल्या वर्गणीतून विज्ञान, तंत्रज्ञान, स्वच्छता, आरोग्य, उद्योजकता, सुरक्षा यांसारख्या आधुनिक गोष्टींवर काम करता येऊ शकेल. एकूण काय तर एखाद्या वर्षीच्या गणेशोत्सवातून काय शिकायला मिळालं एवढं एका ओळीत तरी ज्यादिवशी आपल्याला लिहिता येईल त्यादिवशीच आपण लोकमान्य टिळकांच्या विचारांनी उत्सव करायला सुरुवात केली आहे असं समजायला वाव असेल. नुसत्याच महाप्रसादाच्या जेवणावळी घालून काही होणार नाही. पण विधायक कामांनी आपला देश पुढे गेला तर साक्षात गणरायच आशीर्वाद देतील. तोच खरा महाप्रसाद नव्हे काय? मान्य आहे की समाजातूनच अशा काही मागण्या होत असतात. पण चांगल्या गोष्टींची सुरुवात करायची की त्याच त्या जुनाट वाटेवरून जायचं हे ठरवण्याची वेळ आली आहे. कोरोनासारख्या महामारीमुळे का होईना सार्वजनिक गणेशोत्सवाचं जे बाजारीकरण सुरू होतं त्याला ब्रेक लागला. पण ही परिस्थिती निवळल्यानंतर पुन्हा मागील पानावरुन पुढे ही रडकथा होऊ नये. तूर्तास तरी लोकमान्य टिळक स्वर्गात सुखावले असतील. त्यांचं हे सुख औटघटकेचे ठरू नये याची काळजी आपण घेतली पाहिजे. अर्थात येणारा काळच ठरवेल की आपण लोकमान्यांचे फोटो लावण्यापुरते अनुयायी आहोत की वैचारिक अनुयायी.
