Sunday, 22 August 2021

रामभक्तांचे 'कल्याण'

 


कल्याण सिंग. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, राजस्थानचे माजी राज्यपाल कल्याण सिंग यांचं काल निधन झालं. अनेक पदं भूषवली असली त्यांची खरी ओळख रामभक्त अशीच होती. जेवढी झुंज त्यांनी आजारावर दिली त्याहीपेक्षा कैक पटीची झुंज त्यांनी आपल्या उभ्या आयुष्यात दिली. शिवाय ती झुंज यशस्वी करून दाखवली. जेव्हा जी जबाबदारी मिळाली ती चोखपणे पार पाडली. त्यांनी काही कारणाने थोड्या काळासाठी भारतीय जनता पक्षासोबत फारकत घेतली तरी त्यांनी विचारधारेपासून कधीच फारकत घेतली नव्हती. हे देखील विशेषत्वाने लक्षात घेण्यासारखं आहे. पक्षानेही त्यांचं योगदान लक्षात घेऊन राज्यपाल म्हणून नियुक्ती करून त्यांचा सन्मान केला.

पुरोगाम्यांचा दुटप्पीपणा किती आहे बघा, मंदिर आणि माणसं तुडवून अतिक्रमण करणारा बाबर अहिंसक ठरला. पण ते अतिक्रमण केलेलं वादग्रस्त बांधकाम कल्याण सिंग यांच्या कार्यकाळात  जमीनदोस्त झालं म्हणून त्यांना खलनायक ठरवण्यात आलं. खरंतर दुसऱ्या पक्षाची सत्ता असताना शरयू तीरी कारसेवकांच्या रक्ताचे पाट वाहिले होते. पण तरीही केवळ कल्याण सिंग हेच दोषी, असं अजब व पक्षपाती तर्कट फक्त पुरोगामी आणि जीभ झिजेपर्यंत तुष्टीकरणाचं राजकारण करणारेच लावू शकतात. या लोकांना पारतंत्र्याचे मनोरे आवडतात पण मूळ भारतीय संस्कृतीचा लवलेशही नकोस असतो, त्याबद्दल नाकं मुरडली जातात हीच तर आपल्या देशाची खरी शोकांतिका आहे. कल्याण सिंग यांच्यासोबत तुमचे लाख मतभेद असतील, पण त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. तुम्ही कोणत्याही विचारधारेचे असला तरी कल्याण सिंग तुम्हाला खूप काही शिकवून जातात. भले तुमचा रामावर कितीही विश्वास नसेल तरीही कल्याण सिंग तुम्हाला खूप काही शिकवून जातात. पण त्यासाठी अस्पृश्यतेची नव्हे तर शिकण्याची वृत्ती हवी.

आपण एखादी गोष्ट केली तर आपलं मुख्यमंत्री पद जाऊ शकतं हे माहीत असताना देखील केवळ विचारधारेच्या अजेंड्यासाठी काम करणं निश्चितच अवघड गोष्ट आहे. त्यावेळी तर उत्तर प्रदेश हे आणखी मोठं राज्य होतं (उत्तराखंड वेगळं राज्य झालेलं नव्हतं). देशातील सर्वांत मोठ्या राज्याचं मुख्यमंत्री पद त्यागणं हे येऱ्यागबाळ्याचे काम नव्हे. त्यासाठी मनाशी दृढ निश्चय, विचारधारेवरचा अढळ विश्वास आणि समर्पित वृत्ती लागते. मला काय मिळेल यापेक्षा मला जे मिळालंय यातून मी नेमकं काय करतोय यावर त्यांचा भर दिसून आला. असं म्हणतात की सत्ता माणसाला भ्रष्ट करते. अर्थात भ्रष्टाचार हा केवळ आर्थिकच असतो असं नाही. तो तत्वांचा देखील असू शकतो. सत्ता पायाशी लोळण घेत असताना तत्वांना पायाशी देण्याचे प्रकार होऊ शकतात. पण कल्याण सिंग त्याला अपवाद होते. स्वतः राज्यातील सत्तेच्या सर्वोच्च स्थानी विराजमान असताना सुद्धा त्यांच्यासाठी विचारधारेची उद्दिष्ट अत्यंत स्पष्ट होती. एखादं स्वप्न आपण पाहतो. माहीत नसतं की हे आपल्या हयातीत पूर्ण होईल की नाही. असं असताना देखील त्या स्वप्नाला वाऱ्यावर न सोडता त्यासाठी प्रयत्न करत राहणे आणि एका टप्प्यावर ती पुढील पिढीच्या हाती पूर्णत्वासाठी सुपूर्द करणे यासाठी ध्येयाप्रती निस्वार्थी वृत्ती लागते. तीच वृत्ती कल्याण सिंग यांच्याकडे होती. म्हणून तर भारताच्या सांस्कृतिक वारशावरील काळा डाग पुसला गेला आणि आता सांस्कृतिक गतवैभवाच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. 

अनेक लोकांचं रामजन्मभूमी आंदोलनात मोठ योगदान आहे. फक्त कल्याण सिंग हे त्यातला मैलाचा दगड ठरले. ते रामभक्तांचे लाडके होतेच, पण त्यांनी रामभक्तांचं 'कल्याण' केलं असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. प्रभू श्रीरामांनीच त्यांना सेवा करण्याची संधी दिली असावी. त्या संधीचं सोनं केलं हेच खरं.

गर्दी नियंत्रणाचे अडलेले घोडे

  मध्यंतरी महाराष्ट्रात दुर्दैवी अपघात घडला. मुंब्रा-दिवा स्टेशन दरम्यान दोन लोकल शेजारून जाताना त्यातील काही प्रवाशांचा रेल्वे ट्रॅकवर पडून...