Wednesday, 28 September 2022

द्वेष आवडे काँग्रेसला

 


काँग्रेसचे पळपुटे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो' यात्रेमध्ये केवळ आम्हीच प्रेम देतो आणि भाजपच द्वेष पसरवतो असा अपप्रचार सातत्याने केला जात आहे. पळपुटे यासाठी की ते नेहमीच पराभवाच्या भीतीने आणि जबाबदारी टाळण्यासाठी मैदान सोडून पळून जातात. मग ते अमेठीचं मैदान असो किंवा पक्षाध्यक्ष पदाची खुर्ची. असो. आज विषय त्या यात्रेचा आहे. यात्रेची दखल घेण्यासारखं काहीच नाही पण आम्ही द्वेष पसरवत नाही या मुद्द्याचा समाचार घेऊन काँग्रेसला आरसा दाखवणं आवश्यक आहे. वास्तवापासून दूर पळण्याची आणि वर जनतेची दिशाभूल करण्याची काँग्रेसची जुनी खोड आहे. दुसऱ्या पक्षावर/विचारधारेवर द्वेषाचा आरोप करण्यापूर्वी आपल्या पक्षाने द्वेषाचे किती विक्रम केले आहेत आणि त्याने देशाचं किती मोठं नुकसान झालं आहे याचा लेखाजोखा मांडला पाहिजे. पण काँग्रेस नेतृत्वाची मानसिकता आणि काही प्रमाणात बौद्धिक क्षमता लक्षात घेतली तर त्यांना हे जमेल असं वाटत नाही. चला तर मग त्यांना थोडी मदत करू.

राहुल गांधी यांना जर अभ्यास करण्याची इच्छा असेल तर त्यांनी आपल्या पणजोबांच्या कार्यकाळापासून सुरुवात केली पाहिजे. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना काश्मीर प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघात घेऊन जाण्यापूर्वी भारत जोडावा वाटला नाही का? भारताचा मोठा भूभाग चीनच्या ताब्यात जात असताना नेहरूंना वेदना झाल्या नाहीत का? त्यांच्यानंतर आलेल्या काँग्रेसच्या सरकारांनी ते भूभाग आपल्या ताब्यात परत मिळवण्यासाठी कोणते विशेष प्रयत्न केले? दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची दुर्दैवी हत्या झाली. त्यांनी देशासाठी बलिदान दिलं म्हणून कायम भांडवल केलं जातं. पण क्रांतिकारकांनी, आमच्या पूर्वजांनी रक्त सांडून मिळवलेला भूभाग पाकिस्तान आणि चीनच्या ताब्यात जाताना आपण काहीच केलं नाही. मग त्यांच्या बलिदानाची आपल्या लेखी काहीच किंमत नाही का? भारताच्या पवित्र भूमीबद्दल एवढा द्वेष कुठून आला याचं उत्तर काँग्रेसने दिलं पाहिजे. उठसूठ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारणाऱ्या राहुल गांधी यांनी चीन सोबत डोकलामचा वाद सुरू असताना रोज मोदींना प्रश्न विचारण्याचा सपाटा लावला होता. पण दुसऱ्या बाजूला चिनी दूतावासाच्या अधिकाऱ्यांना भेटले होते. ते कोणत्या अधिकारात भेटले? त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली? कारण ते कोणत्याही संवैधानिक पदावर नाहीत. राहुल यांच्या पक्षाची सत्ता असताना त्यांनी अशा गोष्टी किती वेळा केल्या? हे कोणत्या नैतिकतेमध्ये बसतं? केवळ मोदींविरोधात जनतेत द्वेष निर्माण करणं हाच उद्देश होता हे सरळसरळ दिसून आलं. काँग्रेसने ईशान्य भारताला इतके वर्षे विकासापासून दूर ठेवलं तेव्हा कधी भारत जोडण्याची बुद्धी झाली नाही का? राहुल गांधी राजकारणात सक्रिय झाल्यावर 10 वर्षे त्यांची देशात सत्ता होती. तेव्हा त्यांनी ईशान्य भारतातील नागरिकांसाठी काय केलं हे सांगायला हवं. आताही त्यांच्या यात्रेत ईशान्य भारताचा समावेश नाही. काँग्रेस ईशान्य भारताला देशाचा भाग गृहीत धरत नाही का? देशाच्या भूभागांबद्दल तुम्हाला एवढा द्वेष आहे तर मग तुम्ही कसला भारत जोडणार.

जसा काँग्रेसला देशाबद्दल द्वेष आहे तसाच तो क्रांतिकारकांबद्दल सुद्धा आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सातत्याने माफीवीर असं संबोधून काँग्रेसने त्यांची बदनामी केली. केवळ मूठभर लोकांमुळेच स्वातंत्र्य मिळालं हेच बिंबवण्याचा प्रयत्न केला. 1857चा उठाव कसा फसला हेच इतिहासाच्या पुस्तकांतून रंगवून रंगवून सांगितलं. ठराविक क्रांतीकारकांना प्रसिद्धी देऊन अन्य क्रांतीकारकांना अंधारात ठेवलं गेलं. इतका द्वेष कसा असू शकतो? माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची दुर्दैवी हत्या झाल्यानंतर राजीव गांधी असं म्हणाले होते की जेव्हा एखादा मोठा वृक्ष कोसळतो तेव्हा जमिनीला हादरे बसतातच. मूठभर वाईट लोकांमुळे एखाद्या समुदायाला लक्ष्य करत मोठं हत्याकांड घडवून आणणं हे कोणत्या प्रेमाला खतपाणी घातलं? हे म्हणजे शीख हत्याकांडाचं समर्थन करणं झालं. शिवाय भविष्यात देखील सज्जनकुमार, जगदीश टायटलर यांच्यासारख्या व्यक्तींना मोठं केलं. यावरून याबाबत काँग्रेस पक्ष किती निर्लज्ज होता ते लक्षात येईल.

गांधी घराण्याने काँग्रेसची अंतर्गत रचनाच अशी करून ठेवली आहे की जो नेता गांधी घराण्याच्या विरोधात बोलेल त्याचा द्वेष करायचा. भले तो काँग्रेसच्या भल्यासाठी का बोलत असेना. त्याला राजकीयदृष्ट्या संपवून टाकायचं. अशा बंडखोर नेत्यांवर टीका करून आपण गांधी घराण्याप्रति किती इमानदार आहोत हे दाखवण्याची सुभेदारांमध्ये कशी स्पर्धा लागेल याचीही विशेष काळजी गांधी घराण्याने घेतली आहे. सोनिया गांधी यांना अध्यक्ष करण्यासाठी तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष सीताराम केसरी यांचा कोणत्या प्रकारे अपमान केला गेला हे सगळ्या देशाला माहिती आहे. महाराष्ट्रात पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या हुशार आणि कर्तबगार नेत्यांचे पंख छाटले गेले. मुख्यमंत्री म्हणून काम करताना त्यांना मुक्त वाव दिला गेला नाही. वाचाळ सिद्धूला प्रदेशाध्यक्ष करून पक्षाची वाताहत करू नका असं सांगणाऱ्या कॅप्टन अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्री पदावरून हटवले गेले. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यापेक्षा 1984च्या शीख हत्याकांडाचा आरोप असणारे कमलनाथ जवळचे वाटले यात देखील बऱ्याच गोष्टी सामावलेल्या आहेत. हिंमत बिश्व सरमा हे देखील अपमानित केल्या गेलेल्या नेत्यांमध्ये गणता येतील. दुसऱ्याच्या कर्तबगारीचा अपमान करणे, त्यांच्यावर आपलं नेतृत्व थोपवणे आणि त्याने ते मान्य केलं नाही तर त्यावर आपल्या सुभेदारांकरवी हल्ला चढवणे हा द्वेष नव्हे का? मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष यांच्यात झुंजी लावत बघत बसायचं हा काँग्रेस हायकमांडचा आवडता उद्योग. तेच आता त्यांच्याच अंगाशी येत आहे. काँग्रेसच्या दरबारी राजकारणात अनेक कर्तृत्ववान नेत्यांचा बळी देण्यात आला हा एक प्रकारचा द्वेषच आहे. दुसरा आपल्यापेक्षा मोठा नाही झाला पाहिजे, भले आपण कितीही कर्मदरिद्री का असेना.

काँग्रेसच्या एकंदर इतिहासावर नजर टाकली तर सोनिया गांधी यांच्या कार्यकाळापासून काँग्रेसच्या द्वेष आणि अल्पसंख्यांकांचं तुष्टीकरण यांचं प्रमाण वाढलेलं असल्याचं निरीक्षण अनेक लोकं नोंदवतात. अल्पसंख्यांकांचं तुष्टीकरण हा काँग्रेसचा आत्मा राहिला आहे. खरंतर दहशतवादाला कोणताही रंग नसतो. पण युपीएच्या काळात हिंदू दहशतवाद नावाची खोटी संकल्पना मांडण्याचा प्रयत्न केला गेला. यातून केवळ अल्पसंख्यांकांचं तुष्टीकरण नव्हे तर हिंदूंविरोधात द्वेष पेरला गेला. युपीए अध्यक्षा असलेल्या सोनिया गांधी यांनी एकाही शब्दात याचं खंडन केलं नाही. हिंदूंविरोधात द्वेष पेरून काँग्रेसने काय मिळवलं? 2007च्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सोनिया गांधी यांनी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना 'मौत का सौदागर' असं संबोधून कोणती प्रेमाची बीजं पेरली होती? विरोध करताना त्यांनी इतक्या खालच्या पातळीवर उतरून आपली द्वेष्टी मानसिकता दाखवून दिली. आज नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सूडाच्या राजकारणाचा आरोप करणारे लोक काँग्रेसचं सरकार असताना मुख्यमंत्री असणाऱ्या मोदींची तासनतास चौकशी केल्याचं सोयिस्करपणे विसरतात. तो तेवढा चौकशीचा भाग आणि मोदींनी काही केलं की मोदी द्वेषापोटी सगळं करतात का? मोदी तर दुसऱ्या पक्षाचे आहेत. पण ज्यांनी स्वतःच्या पक्षातून पंतप्रधान झालेल्या मनमोहन सिंग यांचा कधी आदर केला नाही ते दुसऱ्यांचा काय आदर करणार. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या विद्वत्तेच्या जीवावर काँग्रेस पक्ष स्वतःची पाठ थोपटून घेत असतो. त्यांना तुम्ही पंतप्रधान केलेलं होतं तरी त्यांचे मंत्री तुम्ही नेमलेले होते. पण जेव्हा सरकारची नाचक्की होत राहिली. तेव्हा अपश्रेय घ्यायला मात्र त्यांचा चेहरा पुढं केला गेला. विरोधकांनी टीका केली की मनमोहन सिंग यांच्यावर टीका केली म्हणून आकांडतांडव करायचा. सोनिया गांधी यांच्या लेखी भारताच्या पंतप्रधानांना तुच्छ किंमत होती. त्यांनी मनमोहन सिंग यांना केवळ त्यांच्या विद्वत्तेमुळे पंतप्रधान केले नाही. आपण केवढी मोठी त्यागमूर्ती आहोत याचे ढोल त्यांना बडवायचे होते. पण राष्ट्रीय सल्लागार परिषद नेमून पंतप्रधानांना दुय्यम स्थान देत त्यांनी स्वतःचे मनसुबे उघड केले होते. हा पंतप्रधानांचा आणि भारतीय व्यवस्थेचा द्वेष नव्हे काय?

राहुल गांधी यांनी सातत्याने उद्योजकांवर खालच्या दर्जाची टीका करून उद्योजकांना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न चालवला आहे. या सगळ्यात उद्योजक विनाकारण बदनाम होत आहेत. ज्या उद्योजकांवर टीका करतात त्यांच्या आस्थापनांतून जेवढी रोजगार निर्मिती होते तेवढी काँग्रेस करू शकते का? एखाद्या उद्योगपती भ्रष्टाचार करतोय असं वाटत असेल तर आकडेवारी पुराव्यानिशी घेऊन न्यायालयात जावं. तिथं निश्चितच उलगडा होईल. नुसतं ट्विटर आणि सभांमधून उद्योजक भ्रष्टाचार करून श्रीमंत होत आहेत हे बोलण्याला काही अर्थ नसतो. आपण नेमलेले पंतप्रधान आपलं ऐकत नाहीत हे लक्षात आल्यावर पंतप्रधानांवर टीका करत फाडलेला अध्यादेश हा मनमोहन सिंग यांचा सन्मान होता का? पंतप्रधानांवरील द्वेष दाखवणाराच होता. सोनिया असोत वा राहुल, त्यांनी अगदी राज्य पातळीवर देखील कोणताही नेता मोठा होणार नाही याची काळजी घेऊन केवळ स्वतःचं अपयशी नेतृत्व पक्षावर थोपवलं आणि आज तोच पक्ष 'लोकतंत्र खतरे में है' म्हणून गळे काढत असतो. यापेक्षा मोठा दुटप्पीपणा काय असू शकतो. लोकशाहीचं वावडं तुमच्या पक्षाला आणि तुम्ही नाचक्की करताना देशाची करणार. हा कोणता न्याय?

ज्यांचा इतिहास कच्चा आहे त्यांनी आधी तो नीट अभ्यासावा आणि मग असल्या यात्रा काढाव्यात. ज्यांच्या पूर्वजांची आणि स्वतःची हयात द्वेष पेरण्यात गेली, ज्यांचा भूतकाळ आणि वर्तमानकाळ द्वेषपूर्ण आहे, ज्यांच्या उक्ती-कृतीतून द्वेषाचा दर्प येत असतो त्यांनी प्रेमाच्या गप्पा मारू नयेत. कधी जमलंच तर कुटुंबाच्या पलिकडे एखाद्या सामान्य व्यक्तीवर खरं प्रेम करून दाखवावं. वर उल्लेख केलेल्या द्वेषपूर्ण घटनांसाठी कोणतं प्रायश्चित्त घेणार ते सांगावं. स्वतःच्या पूर्वजांनी तोडलेला-गमावलेला भारत परत कसा मिळवायचा याची योजना मांडावी आणि मग असल्या 'भारत जोडो' यात्रा वगैरे काढाव्यात. ज्या लोकांना स्वतःचा पक्ष जोडता येत नाही त्यांनी देश जोडण्याच्या बाता मारू नयेत. एका ओळीतच सांगायचं झालं तर 'लबाड माणूस ढाँग करतंय, प्रेम करायचं साँग करतंय' एवढंच या यात्रेचं वर्णन करावं लागेल.

Saturday, 17 September 2022

भाजपा- पार्टी विथ अ डिफरन्स! - भाग 1

दोनच दिवसांपूर्वी महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली सरचिटणीसांची टीम घोषित केली. भाजपमध्ये अध्यक्षांच्या पाठोपाठ सरचिटणीस हे पद अत्यंत जबाबदारीचं समजलं जातं. भाजपवर इनकमिंगचा आरोप करणाऱ्यांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे सर्व सरचिटणीस हे केवळ कोअर भाजप मधील नसून हार्ड कोअर भाजपचे आहेत. तेवढंच नव्हे तर स्वतःला संघटनात्मक जबाबदारीतून, लोकप्रतिनिधी म्हणून सिद्ध केलेले आहेत. त्यामुळे भाजप विरोधकांनी स्वतःच्या पायात किती आग लागली आहे हे आधी पाहावं. भाजप इतर पक्षांपेक्षा कसा वेगळा आहे हे सांगण्यासाठी या ब्लॉगचा फोटो पुरेसा आहे. महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षांच्या यादीवर एक नजर टाकली तर काम करण्याची क्षमता, योग्यता आणि इच्छाशक्ती या निकषांवर नेमणूक करण्यात येते हे 'याचि देही याचि डोळा' पाहता येईल.

सर्वप्रथम उत्तमराव पाटील हे प्रदेशाध्यक्ष झाले होते. 1980 पासून 1986 पर्यंत त्यांच्याकडे ही जबाबदारी होती. भाजपची स्थापना झाल्या झाल्या लगेचच ही आव्हानात्मक जबाबदारी त्यांच्याकडे आली होती. एका सामान्य शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. त्यांच्यानंतर 1986 पासून 1991 पर्यंत गोपीनाथ मुंडे हे प्रदेशाध्यक्ष होते. गोपीनाथ मुंडे यांनी संघटनेसाठी वेचलेले कष्ट उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहेत. प्रा.ना.स.फरांदे 1991 ते 1995 आणि सूर्यभान वहाडणे-पाटील 1995 ते 2000 दरम्यान प्रदेशाध्यक्ष होते. तळागाळात पक्ष रुजवण्याचं काम करणारे पांडुरंग फुंडकर 2000 ते 2003 दरम्यान प्रदेशाध्यक्ष होते. गोपीनाथ मुंडे यांनी पुन्हा एकदा 2003 ते 2004 मध्ये प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. नितीन गडकरी यांनी देखील एक कार्यकर्ता म्हणून काम सुरू केलं होतं. त्यांना 2004 ते 2009 मध्ये प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करायला मिळालं. एक अभ्यासू नेते म्हणून सुधीर मुनगंटीवार यांना ओळखलं जातं. त्यांनाही 2010 ते 2013 मध्ये प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. देवेंद्र फडणवीस यांना राजकीय पार्श्वभूमी असली तरीही ते स्वकर्तृत्वाने जनमानसांत लोकप्रिय झाले. विरोधी पक्षात असताना सत्ताधारी पक्षाची मुद्देसूद चिरफाड करून त्यांनी आपला एक वेगळा ठसा उमटवला होता. महाराष्ट्रात पक्षाला पहिल्या क्रमांकावर आणण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. 2013 ते 2015 त्यांनी प्रदेशाध्यक्ष असताना पक्षाला सत्तेत आणलं. रावसाहेब दानवे हे केंद्रात राज्यमंत्री असताना त्यांना राज्याचं अध्यक्षपद स्वीकारण्यास सांगितलं गेलं. त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन 2015 ते 2019 दरम्यान प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलं. आतापर्यंत दोन वेळा आमदार तर पाच वेळा खासदार म्हणून ते निवडून आले आहेत. चंद्रकांतदादा पाटील यांनी 2019 ते 2022 दरम्यान प्रदेशाध्यक्षपद सांभाळलं आहे. चंद्रकांतदादा नेहमी म्हणतात की मी कोरं पाकीट आहे, संघटना त्यावर जो पत्ता लिहिते त्या पत्त्यावर मी जातो. संघटना जे सांगेल ते काम करण्याची मानसिकता भाजपमध्ये कशी निर्माण होते हे शिकण्यासारखं आहे. आणि आता चौथी टर्म आमदार असणारे, माजी मंत्री व प्रदेश सरचिटणीस म्हणून जबाबदारी पार पाडलेले चंद्रशेखर बावनकुळे हे प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. सगळे प्रदेशाध्यक्ष म्हणजे कोणी सुभेदार किंवा कोण्या सुभेदाराचे वारसदार नव्हते, नाहीत आणि नसतील. तळागाळातून संघटनेचं काम करत, प्रचारासाठी भिंती रंगवत, पोस्टर चिकटवत, हजारो किलोमीटरचा प्रवास करत कार्यकर्ते जोडलेले नेतेच प्रदेशाध्यक्ष झालेले दिसत आहेत. भाजपमध्ये शीर्ष नेतृत्वाच्या जवळचा कोण यापेक्षा पक्षवाढीसाठी जवळचा कोण याचा विचार अधिक प्रमाणात केला जातो.

शिल्लक सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अद्यापही आपल्या कार्यकर्त्यांना 'तुम मैदान में लड़ो, हम घर बैठे बैठे तुम्हें शाबाशी देते हैं' या पवित्र्यात कायम आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील स्वतःला विरोधी पक्षनेते पद मिळालं नाही म्हणून विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासोबत कोल्ड वॉर खेळण्यात मग्न आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे मध्यंतरी आंदोलन करताना जोशात येण्याऐवजी डुलताना दिसले होते. खरंतर गटात न बसणाऱ्या व्यक्तींची तुलना होऊ शकत नाही. पण चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र प्रदेशाध्यक्ष म्हणून अक्षरशः पायाला भिंगरी लावली आहे. नुकतेच ते 3 दिवसांच्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर होते. बारामती मतदारसंघासारख्या आव्हानात्मक पेपरला सुरुवातीपासूनच भिडायला सुरुवात केली आहे. प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून 8 दिवसांतच त्यांनी विविध मोर्चा/आघाड्या यांच्यासोबत आढावा बैठक घेऊन रणनीती निश्चित केली. त्यांनी राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश व महाराष्ट्र भाजपचे प्रभारी सी.टी. रवी यांच्या प्रमुख उपस्थितीत सोशल मीडियाच्या टीमसोबत बैठक घेतली तेव्हा मी स्वतः त्या बैठकीला उपस्थित होतो. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे चर्चिल्या जाणाऱ्या सगळ्याच मुद्यांकडे अत्यंत बारकाईने लक्ष देत होते आणि त्या गोष्टींची स्वतःच्या डायरीत नोंद करून घेत होते. या बैठकीच्या दरम्यान त्यांनी एकही फोन घेतला नाही. आपला 100 टक्के वेळ बैठकीला दिला. एक प्रदेशाध्यक्ष संघटनात्मक बैठक किती गांभीर्याने घेऊ शकतात याचं हे चालतं बोलतं उदाहरण आहे. कार्यकर्ते यातूनच घडत असतात. नेत्यांचं आचरण जसं असतं त्याप्रमाणे कार्यकर्ते बोध घेत असतात. महाराष्ट्रातील इतर पक्ष आणि भाजप मधला हा मूलभूत फरक आहे.

याशिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सरकारमध्ये राहून सुशासनाची गाडी सुसाट पळवत आहेत. प्रशासनावर मजबूत पकड असणाऱ्या मोजक्या राजकारणी व्यक्तींपैकी एक म्हणून त्यांनी स्वतःला सिद्ध केलं आहेच. सुशासन राबविणे व नावीन्यपूर्ण संकल्पना प्रत्यक्षात उतरविणे यावर त्यांचा नेहमीच भर राहिला आहे. एकूण काय तर पक्ष संघटना आणि राज्य सरकार या दोन्ही पातळीवर अत्यंत कार्यक्षम व्यक्तींच्या हाती नेतृत्व दिलं आहे. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे विरोधकांचे तथाकथित गड नेस्तनाबूत करत पक्ष संघटना मजबूत करतील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सरकारच्या माध्यमातून जनतेच्या विकासाची आटलेली गंगा पुनरुज्जीवित करत आहेत. हे 'डबल इंजिन' महाराष्ट्रात भाजपला आणखी शक्तिशाली बनवेल याची खात्री आहे. भाजपा म्हणजे 'पार्टी विथ अ डिफरन्स' आहे ही गोष्ट प्रदेशाध्यक्ष निवडीच्या इतिहासावरून सहजपणे कळेल. भाग 1 असं लिहिण्याचं कारण म्हणजे अनेक मुद्दे आहेत ज्यावरून 'पार्टी विथ अ डिफरन्स' हे त्या त्या वेळी सांगता येतील.

गर्दी नियंत्रणाचे अडलेले घोडे

  मध्यंतरी महाराष्ट्रात दुर्दैवी अपघात घडला. मुंब्रा-दिवा स्टेशन दरम्यान दोन लोकल शेजारून जाताना त्यातील काही प्रवाशांचा रेल्वे ट्रॅकवर पडून...