काँग्रेसचे पळपुटे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी 'नफरत तोडो, भारत जोडो' हे घोषवाक्य देत भारत जोडो यात्रा सुरू केली खरी. पण ज्यांच्या नसानसांत द्वेष भरलेला आहे त्यांच्या तोंडून तो बाहेर येतोच. काँग्रेसला द्वेष कसा आवडतो त्याबद्दल यात्रा सुरू झाली तेव्हाच मी सविस्तर लिहिलं होतं. पुढील लिंकवर आपण ते वाचू शकता. https://parkhadsanket.blogspot.com/2022/09/hater-congress.html?m=1
काँग्रेसला बहुतांश क्रांतिकारकांबद्दल द्वेष आहे आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल तर अधिक आहे ही गोष्ट मी त्यात आवर्जून नमूद केली होती. राहुल गांधींनी पुन्हा एकदा त्यावरून गरळ ओकली आहे. नफरत तोडो म्हणता म्हणता तुम्हीच क्रांतीकारकांच्या बद्दल नफरत पसरवण्याचं काम केलं. म्हणजे जे घोषवाक्य घेऊन तुम्ही लोकांसमोर भारत जोडण्याचा दावा करत होता त्या आधारालाच तुम्ही हरताळ फासला. ज्या राहुल गांधींच्या पूर्वजांमुळे भारताचे तुकडे झाले त्यांची भारत जोडो असं म्हणायची सुद्धा पात्रता नाही. तुमच्या दाव्यानुसार जर भारत जोडायचाच असेल तर क्रांतीकारकांचा द्वेष करून भारत कसा जोडणार आहात? भले सावरकरांच्या क्रांतिकारी विचारांशी तुमचे मतभेद असतील पण त्यासाठी त्यांना हिणवून अपमानित करण्याची काय गरज आहे? त्यांचं योगदान नाकारून काय मिळवू पाहत आहात? त्यामुळे ही द्वेष पसरवणारी यात्रा बिनबुडाची असल्याचं सिद्ध झालं आहे.
मुळात काँग्रेसला काही विचारधारा उरली नाहीये. त्यांच्या समर्थकांना-कार्यकर्त्यांना विचारलं की तुमचं मत काय? तर ते दोनच गोष्टी सांगतात. भाजपला/नरेंद्र मोदींना हरवणं आणि राहुल गांधींना पंतप्रधान करणं. त्यांच्या राजकारणाच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट नाहीत त्याला औषध नाहीये. पण त्यांना एक गोष्ट समजत नाहीये की भाजपमध्ये स्वप्नं पाहणारे आणि ती सत्यात उतरवणारे नेते घडवले जातात. डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 370 कलम हटवण्याचं स्वप्न बघितलं. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी अंत्योदयाचं स्वप्न बघितलं. लालकृष्ण अडवाणी यांनी रामजन्मभूमी आंदोलन उभं करून राम मंदिराचं स्वप्न पाहिलं. ही सगळी स्वप्नं त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांनी मार्गी लावली. काँग्रेसकडे तसं कुठे काय आहे? आजीने वाजवलेली गरीबी हटाओची धून अजूनही नातू गुणगुणत आहे. राहुल गांधी राजकारणात आल्यावर यूपीए सरकारच्या कार्यकाळात गरीब कोणाला म्हणावं याची एक व्याख्या केली गेली. दिवसाला 30 रुपयांपेक्षा अधिक पैसे मिळवणारा गरीब म्हणाला जाणार नाही असा अजब निकष त्यात लावून जनतेचा अपमान केला होता. कोणताही अजेंडा, ध्येय नसलेली व ते पूर्णत्वास नेणारी कार्यकर्ते-नेत्यांची फळी नाही. त्यामुळे काँग्रेस पक्ष, त्यांची विचारधारा आणि आता यात्रा हे केवळ बेवारस आहे.
ज्यांना खानदानी जहागिरीतून मिळालेल्या मतदारसंघातील जनतेने सांगितलं की तुम्ही संसदेत बसायच्या आणि बोलायच्या लायकीचे नाही त्यांनी देशात बोलू दिलं जात नाही असा कांगावा करावा हे हास्यास्पद आहे. ज्यांनी पराभवाच्या भीतीने आयत्या मिळालेल्या पक्षाध्यक्षपदापासून पळ काढला त्यांनी दुसऱ्यांना डरपोक किंवा माफीवीर संबोधण्याचा अधिकार आहे? आपण स्वतः किती डरपोक आहोत याकडे दुर्लक्ष करून किती बायकांनी मिठ्या मारल्या याचं मार्केटिंग केलं जातं हे तर घृणास्पद आहे. दिल्लीत दुर्दैवी निर्भया प्रकरण घडलं तेव्हा दिल्ली व केंद्रात काँग्रेसचं राज्य होतं. तिथं महिला मुख्यमंत्री, पक्षाच्या अध्यक्षा महिला आणि केंद्र सरकारच्या अनधिकृत प्रमुख देखील महिलाच होत्या. एवढं सगळं असताना तेव्हा कोणी राहुल गांधींना मिठ्या मारल्याचं दिसलं नाही. राहुल गांधींना मुळातच राजकीय नेता म्हणून गांभीर्याने घेतलं जात नाही. मुळातच विश्वासार्हता आणि त्यांचा दूरदूरचा संबंध नाही. पण हे असलं मिठ्या मारण्याचं भांडवल केलं जातं हे बोगसगिरीची परिसीमा दाखवणारं आहे. एका लहान मुलीला चॉकलेटसाठी झुलवणारा पेड प्रमोशन केलेला व्हिडीओ तर संतापजनक आहे. त्या मुलीचं वय बघता आपण कुठे, कोणासोबत, कशासाठी चालत आहोत याचा थांगपत्ता देखील नसेल. पण फुशारक्या काय तर लहान मुले यात्रेत आली. त्यांना चॉकलेटसाठी झुलवलं. चेष्टा मस्करी करताना देखील आपण कुठे आहोत, कशासाठी चाललो आहोत एवढीही परिपक्वता नसणाऱ्या राहुल गांधींना मिठी मारल्यावर कोणाला सुरक्षित वाटत असेल तर कदाचित सुरक्षिततेची व्याख्या बदलावी लागेल. यात्रेत आलेल्या केवळ काँग्रेस नेत्यांच्या मुलांना राहुल गांधींच्या सोबत सुरक्षित वाटलं असेल की हा माणूस आपल्या पूर्वजांनंतर आपल्याला नक्कीच तिकीट देईल.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं स्वातंत्र्यलढ्यात योगदान काय असं विचारणाऱ्यांनी आधी स्वतःच्या खानदानातील किती लोकांनी स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिलं आहे याचं संशोधन करावं. केवळ ब्रिटिशांसोबतचा स्वातंत्र्यलढाच नव्हे तर सत्तेच्या आडून काँग्रेसने घडवून आणलेल्या दंगली आणि भीषण नरसंहार घडवलेल्या 1948, 1975, 1984 अशा वेळी आपल्या बापजाद्यांपैकी कितीजणांच्या केसाला धक्का लागला आणि खानदानाला कोणती झळ बसली याचाही विचार करावा. जर झळ बसली असेल तर पुन्हा आपण काँग्रेसचे तळवे चाटून त्या पूर्वजांना नरकयातना देत आहोत आणि जर झळ बसली नसेल तर संघाचं-भाजपचं योगदान काय यावर बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही.
संघ असो वा भाजप यांनी कधीच कोणत्या क्रांतीकारकांचं स्वातंत्र्यलढ्यातील योगदान नाकारलं नाही. कोणत्याही क्रांतिकारकांचा अपमान तर मुळीच केला नाही. उलट काँग्रेसने सातत्याने ज्या क्रांतीकारकांना आणि त्यांच्या योगदानाला देशापासून लपवून ठेवलं अशा वीरांना भाजपने सन्मान मिळवून दिला. नुकत्याच पार पडलेल्या 'आझादी का अमृत महोत्सव' अभियानांतर्गत 'आझादी के अनसंग हिरोज' या मथळ्याखाली अनेक क्रांतिकारकांची माहिती केंद्र सरकार व भाजपने जनतेसमोर आणली होती. काँग्रेसला असं करण्याची कधीच गरज वाटली नाही. कारण त्यांना केवळ एकाच परिवाराला मोठं दाखवायचं होतं आणि त्यासोबतच महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्यांना तुच्छ दाखवायचं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागे संसदेत म्हणलं होतं की काही लोकांना वाटतं स्वातंत्र्य हे केवळ एका परिवाराने मिळवून दिलं आहे. राहुल गांधी, त्यांचं घराणं आणि आंधळेपणाने त्यांच्या मागे फिरणारे हे सगळे एकाच वर्गवारीमधील आहेत. त्यांना केवळ द्वेष पेरता येतो, लोकांची दिशाभूल करत त्यांना वेडं बनवायला आवडतं. राजकारणात राहुल गांधी नेहमीच बेभरवशाचे खेळाडू म्हणून ओळखले जातात. यात्रेची एकूण वाटचाल पाहता बेभरवशाच्या खेळाडूची यात्रा केवळ बिनबुडाची बेवारस बोगसच आहे असंच म्हणलं पाहिजे.
