2019च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर राजकीय खेळ्यांमध्ये खंजीर खुपसण्याचा इतिहास असणाऱ्या खुद्द शरद पवारांनीच एकत्रित सत्ता स्थापन करण्याचा प्रस्ताव भाजपकडे दिला होता असा खुलासा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. आता असं वाटेल की झालं ते आता, किती दिवस उगाळणार तेच तेच. पण मुद्दा फक्त भाजपचा विश्वासघात हा नाहीये. जनमताचा विश्वासघात हा मुख्य मुद्दा आहे. त्यामुळे त्याचे गुन्हेगार आणि त्यांचे कारनामे यांचा खुलासा करणं क्रमप्राप्तच आहे. महाविकास आघाडी स्थापन केली तरी महाराष्ट्र, विकास आणि आघाडी यांचा कोणताही परस्पर संबंध नव्हता हे त्या सरकारच्या कारभारामुळे दिसून आलंच. पण मग महाविकास आघाडीचा उद्देश तरी काय होता? उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पद उपभोगायचं होतं. काँग्रेसला फुल नाही तर फुलाची पाकळी तरी हवी होती. भाजपला मुख्यमंत्री पद व सत्ता मिळू द्यायची नाही. यापेक्षा कोणतेही उदात्त हेतू नव्हते. पण शरद पवारांना मात्र बरंच काही हवं होतं. त्यांना नेहमी प्रमाणेच एका दगडात अनेक पक्षी मारायचे होते.
1. देवेंद्र फडणवीस यांची विश्वासार्हता कमी करणे.
देवेंद्र फडणवीस यांनी सलग दोनवेळा तीन आकडी आमदार निवडून आणले. शिवाय मुख्यमंत्री पदाची सलग पाच वर्षे आरामात पूर्ण केली. राजकारणात जवळपास हीरकमहोत्सवी कारकीर्द होत आली तरी शरद पवारांना या दोन्ही गोष्टी जमल्या नाहीत. शिवाय फडणवीस सरकारच्या विरोधातील ढीगभर आंदोलनांना फूस लावून देखील फडणवीसांनी अत्यंत कौशल्याने परिस्थिती हाताळली. त्यामुळेच फडणवीसांबद्दल पवारांना प्रचंड आकस आहे. शिवाय कार्यक्षम सरकार दिल्यामुळे सर्वसामान्य लोकांना फडणवीस आवडतात. पहाटेच्या शपथविधीमुळे फडणवीसांच्या विश्वासार्हतेला पवारांना धक्का लावायचा होता. पण विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस थेट जनतेत गेल्यामुळे पवारांची ही खेळी अपयशी ठरली. कोरोना काळात जे सत्ताधारी म्हणून पवार आणि ठाकरेंनी काम करणं अपेक्षित होतं त्यापेक्षा अधिक काम फडणवीसांनी विरोधी पक्षनेते म्हणून केलं. त्यामुळे फडणवीसांवर अन्याय झाला आणि ठाकरे-पवारांमुळे आपण चांगल्या नेतृत्वापासून वंचित राहिलो अशी भावना जनतेत निर्माण झाली.
2. पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणात अजित पवारांना खलनायक बनवणे.
शरद पवारांना अजित पवार किती आवडतात याबद्दल मी मागे एकदा सविस्तरपणे अगदी संदर्भासहित लिहिलं होतं. त्याची लिंक- https://parkhadsanket.blogspot.com/2019/11/sharad-pawarana-ajitdada-kharach-havet.html?m=1
अलीकडची उदाहरणं घ्यायची म्हणली तर अनिल देशमुख यांचं गृहमंत्री पद गेल्यानंतर खरंतर अजित पवारांना गृहमंत्री व्हायचं होतं. गृहमंत्री म्हणून वरिष्ठांना मी योग्य वाटत नसेल. अशी खंत त्यांनी थेट मीडिया समोर सुद्धा व्यक्त केली होती. शिवाय महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये घटकपक्षांचा राग अजित पवारांवर होता. जर अजित पवार त्या सरकारमध्ये खुश असते तर त्यांनी घटक पक्षांना नाराज करण्याच्या काड्या कशाला केल्या असत्या? अजित पवार नाराज होण्याचं एक मुख्य कारण असं वाटतं की मुख्यमंत्र्यांच्या निष्क्रियतेचं बिल त्यांच्या नावावर फाटत होतं. अजित पवार निश्चितच मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा बाळगून आहेत. पण त्यासाठी संख्याबळ लागतं हे ही पूर्णपणे जाणून आहेत. उगीच 8-10 खासदारांच्या जीवावर पंतप्रधान होण्याची स्वप्नं पाहण्याएवढा अवास्तव विचार करणाऱ्यांपैकी निश्चितच नाहीत. अजित पवारांची प्रतिमा प्रशासक म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांना आपणहून काड्या करण्यात रस नसतो. म्हणूनच अजित पवारांनी बंडखोरीच केली हेच चित्र माध्यमांतून रंगवण्यात आलं आणि शरद पवारांनी कधीच त्याचा इन्कार केला नाही.
3. उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्याआडून सत्तेची सूत्रं आपल्या हाती ठेवणे.
उभ्या आयुष्यात केवळ मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणात (की वसुलीत?) लक्ष घालण्याचा अनुभव असणाऱ्या उद्धव ठाकरेंना थेट मुख्यमंत्री पदावर बसवून शरद पवारांनी त्यांच्या अज्ञानाचा पुरेपूर फायदा घेतला. काडीचाही प्रशासकीय अनुभव नसणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्रीपदावर बसवलं म्हणून किती लोकांनी प्रश्न विचारले. एखाद्या किरकोळ ठिकाणी नोकरी हवी असेल तर 10 वेळा अनुभव विचारतात. पण इथं म्हणजे बातम्या काय...तर पवारांची खेळी, पवारांचा मास्टरस्ट्रोक. राज्याची वाताहत झाली आणि या लोकांचे पवार प्रेमाचे उमाळे काही संपायला तयार नाहीत. फडणवीसांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये शरद पवारांना एका मर्यादेच्या पलीकडे काहीच करायला वाव मिळाला नसता. म्हणून त्यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये अनुभवी एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा उद्धव ठाकरेच हवे होते.
4. सत्तेविना राष्ट्रवादीची तुटलेली 'रसद' पुन्हा जोडणे
जशी राष्ट्रवादीची पीछेहाट होऊ लागली तशी नेते-कार्यकर्तेच काय तर नातेवाईक देखील शरद पवारांना सोडून जाऊ लागले. याबद्दल खुद्द शरद पवारांनीच खदखद व्यक्त केली होती. सत्तेची ऊब मिळवून त्यातील रसदीच्या जोरावर पुन्हा पक्ष जोडता येतो का याची चाचपणी पवारांना करायची होती. त्यात ते काही प्रमाणात यशस्वी झाले.
आता मुद्दा हा आहे की हे भाजपला कळलं नसेल का? निश्चितच कळलं असेल. पण आपल्याला कोणाच्याही समर्थनाशिवाय सत्ता स्थापन करता येईल असं संख्याबळ नसल्याने व शिवसेनेने विश्वासघात केल्याने दुसरा पर्याय शोधणं भाग होतं. त्यासाठी जोखीम घेतल्याशिवाय तर काही होणार नव्हतं. पण दुसऱ्या बाजूला शरद पवारांनी केवळ आपल्या राजकीय डावपेचांसाठी महाराष्ट्राची सत्ता वापरली. त्यांना जर खरंच महाराष्ट्राचा विकास करायचा असता तर अडीच वर्षांत काही भरीव विकासकाम दिसलं असतं. उठसूट महाराष्ट्राचा अपमान झाला म्हणून टाहो फोडणाऱ्यांना हा महाराष्ट्राचा अपमान वाटला नाही का? तुमचे राजकीय डावपेच तुम्हाला लखलाभ होवोत. पण त्यासाठी महाराष्ट्राची सत्ता हे साधन नाही आणि जनतेला वेठीला धरण्याची गरज नाही.
शरद पवारांनी फडणवीसांचा हा खुलासा फेटाळताना फडणवीस असत्याचा आधार घेत आहेत असं म्हणलं आहे. पण मग पवारांच्या मते सत्य काय आहे हे सांगायचं धाडस ते अद्यापही करू शकले नाहीयेत. साधारणपणे 3 आठवड्यांपूर्वीच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पहाटेचा शपथविधी ही शरद पवारांची खेळी होती असं वक्तव्य केलं होतं. तेव्हा मात्र शरद पवारांना सत्यता/असत्यता आठवली नव्हती. शिवाय खुद्द पवारांनाच असत्याचा आधार घ्यायची सवय आहे. त्यांच्या असत्य बोलण्याची मालिका पाहिली तर जी फटाक्यांची माळ लागते ती बॉम्बस्फोटांच्या खोट्या आकड्यांपर्यंत जाऊन पोहोचते. त्यामुळे शरद पवारांनी किमान सत्य/असत्य असले शब्द वापरू नयेत. मुळात देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यात विश्वासार्हतेवरून तुलना करणं म्हणजे हिरा आणि गारा यांची तुलना करण्यासारखं आहे. पहाटेच्या शपथविधीमधील शरद पवारांची भूमिका जाहीर करून फडणवीसांनी आणखी एक घाव घातला आहे. शरद पवारांना हे अपेक्षित असावं की त्याबद्दल कोणी आणखी काही बोलू नये. कारण पवारांची जी 'प्रत्यक्षाहून उत्कट' प्रतिमा बनवायला जे काही प्रयत्न सुरू असतात त्याला सुरुंग लागेल. पण त्यांच्या अशा कित्येक डावांवर फडणवीस घाव घालत आलेले आहेत. मग ते पवारांच्या राजकीय साम्राज्यावर असोत की राज्यसभा-विधान परिषदेत महाविकास आघाडीचा पराभव करणं असो. आपल्या निष्प्रभ ठरणाऱ्या डावांवरून तरी आता पवारांनी धडा घ्यावा.
.jpeg)