महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस आधी आमदार, नंतर भाजप प्रवक्ते, प्रदेशाध्यक्ष म्हणून परिचित होते. पण महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी स्वतःच्या नावाचा दबदबा निर्माण केला. विचारधारेवरील निष्ठा, पक्ष संघटन कौशल्य, मेहनत आणि विकास कामांतून लोकांचा विश्वास या चतुसूत्रीवर हा दबदबा निर्माण केला. ऐऱ्यागैऱ्या कोणाच्या मेहेरबानीवर हा दबदबा तयार केला नाही. त्यामुळेच फडणवीस यांच्या असं मोठं झाल्याचा अनेकांना 'दर्द' होतो. अनेक समाजविघातक कृत्यांच्या माध्यमातून हा जो काही 'दर्द' आहे त्याचा 'दर्प' येत असतो. जसा एखादं विकासकाम मार्गी लावल्याशिवाय फडणवीस यांचा दिवस जात नाही तसा काही समाजकंटकांचा काड्या केल्याशिवाय दिवस जात नाही. 'क्रोनोलॉजी' लक्षात घेतली तर गेल्या काही महिन्यांत याचा सातत्याने प्रत्यय येतोय. फडणवीसांनी जरा काही चांगलं केलेलं दिसलं की यांच्या भानगडींना ऊत येतो. केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर मध्य भारताला वरदान ठरेल असं कॅन्सर इन्स्टिट्यूट फडणवीसांच्या पुढाकाराने नागपुरात सुरू झालं आणि थोड्याच दिवसांत महाराष्ट्रात सोशल मीडियावर स्टेटस ठेवून दंगली सुरू झाल्या. वारकऱ्यांना रेनकोट दिल्यामुळे फडणवीसांबद्दल वारकऱ्यांना आदर आहे. पण 'खऱ्या' वारकऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केल्याच्या बातम्या लावून फडणावीसांना बदनाम करणाऱ्यांचा नवीन डाव खेळण्यात आला. फडणवीस जपानमध्ये महाराष्ट्राचा डंका वाजवून आले तेवढ्यात इथं आरक्षणाच्या मुद्याला हिंसक वळण दिलं गेलं.
परवा घडलेली घटना केवळ फडणवीसांनाच नव्हे तर मराठा समाजाला बदनाम करण्याचा हा कट आहे का या दृष्टिकोनातून देखील या घटनेचा विचार व्हायला हवा. कारण मराठा समाजाने आरक्षण आणि विविध मुद्यांसाठी राज्यभरात मूक मोर्चे काढले. कोणताही अनुचित प्रकार घडू दिला नाही. एवढंच काय तर मोर्चा संपल्यानंतर स्वच्छता मोहिमा राबवून मोर्चा काढलेल्या मार्गावर कचऱ्याचा लवलेशही राहणार नाही याची काळजी घेतली. त्यामुळे त्यांच्याकडून कोणताही गैरप्रकार होण्याची सुतराम शक्यता नाही. ज्या मोर्चांमध्ये पोलीस यंत्रणेवर साधा ताण सुद्धा आला नाही तिथं एका उपोषणा दरम्यान पोलिसांवर हल्ले केले जातात ही घटना नक्कीच समाजकंटकांचा सहभाग असल्याचं दर्शवून देते. सद्सद्विवेक बुद्धी जागृत असणाऱ्या कोणाच्याही मनात हा विचार आपसूकच येईल. केवळ मराठा समाजच नव्हे तर पोलिसांनाही बदनाम करत त्यांचं मनोधैर्य खच्ची करण्याचे उपद्व्याप सुरू आहेत. काही झालं की पोलिसांनी असं केलं, तसं केलं असे आरोप सुरू होतात. आपण घरी शांतपणे झोपू शकतो त्याचं कारण आपले पोलीस बांधव आहेत. पण घाणेरड्या राजकारणासाठी पोलिसांच्या क्षमतेवर शंका घेऊन आणि त्यांच्यावर हल्ला करून आपण देशात घुसखोरी करणाऱ्यांच्या लेव्हलचे आहोत का याचा एकदा विचार केला पाहिजे. ज्यांना त्यांच्या शहरात कोणी विचारत नाही अशांनी मराठा आरक्षणाच्या तापलेल्या मुद्यावर नेते व्हायची स्वप्नं पाहिली. पदांसाठी लाचार झाले. पण त्यांची पात्रता नसल्याने मराठा समाजाने त्यांना मर्यादेतच ठेवलं. कारण सर्वांना माहिती आहे की आरक्षण फडणवीसांनी दिलं होतं आणि ते महाविकास आघाडीने घालवलं.
ज्यावेळी समाजकंटक सक्रिय होतात त्यावेळी विरोधी पक्षांनी जबाबदारीने वागणे अपेक्षित असते. तापलेल्या तव्यावर पोळी भाजायची नसते. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील गटाने शांततेतील मूक मोर्चांची 'मुका मोर्चा' अशी हेटाळणी केली होती हे विसरता येणार नाही. ज्यांची हयात हुजरेगिरी करणाऱ्यांना पदं देऊ की कुटुंबाला मोठं करू या 'कन्फ्युजन' मध्ये गेली त्यांची सामाजिक विषयांवर बोलण्याची पात्रता नाही. शरद पवार आता जे सांगितलं ते किती मिनिटांत बदलतील हे कदाचित त्यांनाही माहिती नसतं. पण त्यांनी 8 महिन्यांपूर्वी केलेलं वक्तव्य जरूर बघा. म्हणजे त्यांची मराठा आरक्षणाबद्दलची कळकळ नक्की कळेल.
https://marathi.abplive.com/news/politics/maratha-kranti-morcha-protests-against-sharad-pawar-s-statement-on-reservation-demands-to-stop-reservation-of-political-dynasties-1135318 ज्या वेगाने शरद पवार जालन्याला गेले तसे कधी आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांच्या घरी गेल्याचं पाहिलेलं नाही. ज्या संदर्भाने गृहमंत्री फडणवीसांचा राजीनामा मागता तो संदर्भ तुम्हाला लावायचा झाला तर तुम्हाला तुमच्या कार्यकाळात रोज राजीनामा द्यावा लागला असता. ज्या काँग्रेसने केवळ लांगूलचालनाचं राजकारण केलं. त्यांना आरक्षण या भिजत ठेवलेल्या घोंगड्यावर बोलण्याचा काही एक नैतिक अधिकार नाही. कारण सत्तेत असताना त्यांनी मराठा समाजासाठी काहीच केलं नाही.
काड्या करणाऱ्या समाजकंटकांची लायकी एका वाक्यात सांगायची झाली तर ते लोक सदैव जातींमध्ये भांडणं लावण्यात अडकलेले असतात, पण दुसऱ्या बाजूला फडणवीस महाराष्ट्रासाठी जपानला जाऊन आले. 'ज' तोच आहे, फरक फक्त व्हिजनचा आहे. आता वेळ आहे ती फडणवीसांच्या बदनामीसाठी सक्रिय असणाऱ्यांना सडेतोड उत्तर देण्याची. भाजपच्या नेत्यांनी तर यात अग्रेसर असायला हवं. क्षमता असणाऱ्या नेत्यांच्या सोबत आपण जनता म्हणून वेळीच उभे राहिलो नाही तर आपल्याला कोणी वाली राहणार नाही. सातत्याने सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या लोकांवर कारवाई केली पाहिजे. त्यांनी मांडलेला हा बाजार उठवला जावा. अगदी कितीही मोठे चेहरे असतील तरी. अशाने भाजपला पर्यायाने सुशासनाच्या समर्थनासाठी सोशल मीडियावर, जमिनीवर आणि प्रत्यक्ष मतरुपी आशीर्वाद देण्यासाठी तत्पर असणाऱ्या मतदारांमध्ये दहा हत्तींचं बळ येऊन नवचैतन्य संचारेल. विकासकामांचा 'स्ट्राईक रेट' जबरदस्त असल्याने फडणवीस हे जनतेचे 'फेव्हरेट' आहेत. कदाचित म्हणूनच ते समाजकंटकांचे 'टार्गेट' बनले आहेत. 'टार्गेट' करणारे कोणाचे 'पपेट' आहेत ते शोधून आपल्याला त्यांना 'अपसेट' करायचं आहे आणि फडणावीसांना सांगायचं आहे की 'ऑल सेट फॉर डेव्हलपमेंट. गो अहेड!'
