Sunday, 24 November 2019

शरद पवारांना अजितदादा खरंच हवेत?


दिनांक 31 ऑक्टोबर 2019 रोजी लिहिलेला लेख...

टीप- राष्ट्रवादी काँग्रेस सोबत वैचारिक मतभेद असले तरी यानिमित्ताने कोणावर वैयक्तिक आरोप करण्याचा हेतू नाही केवळ राजकीय निरीक्षण व्यक्त केलं जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवड(?) झाली. पण ही नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी खरंच मनापासून केली का हा प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही. पवार प्रेमाचे चष्मे उतरवू  शकणाऱ्या लोकांना राजकीय घटनाक्रम पहिला तर काकांना खरंच पुतण्या हवा का याचा उलगडा होऊ शकेल. यासाठी प्रामुख्याने 5 मुद्दे लक्षात घेऊ.

काका-पुतण्याचा हा छुपा संघर्ष गेल्या अनेक वर्षांपासूनचा आहे. त्यासाठी आपल्याला काही वर्षे मागे जावे लागेल.
1. 2010 ची अजित पवारांची उपमुख्यमंत्रीपदी निवड
आदर्श घोटाळ्यात अशोक चव्हाण यांचे नाव आल्यावर त्यांनी राजीनामा दिला. पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळाची रचना करताना आधीच्या मंत्रिमंडळातील उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना कारण नसताना बाजूला करून अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करण्यात आलं. त्यावेळी छगन भुजबळ हे कमालीचे नाराज झाले होते आणि ते बराच काळ चाललं होतं. अजित पवारांनी दबावतंत्र अवलंबल्याने शरद पवार यांनी छगन भुजबळ यांना दुखावून पक्ष फुटू नये यासाठी पडती बाजू घेतली होती.

2. 7 डिसेंबर 2012 रोजी मंत्रिमंडळात पुनरागमन.
सिंचन घोटाळ्याचे आरोप झाल्यावर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर केवळ अडीच महिन्यांतच त्यांनी मंत्रिमंडळात पुनरागमन करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय देखील शरद पवारांना रुचला नव्हता. हिवाळी अधिवेशनाच्या काही अवधी पूर्वी हा शपथविधी अचानक उरकण्यात आला होता.

3. 2019 लोकसभा निवडणुकीतील शरद पवारांची माघार.
निवडणुकीतून माघार घेताना शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्या उमेदवारीचं कारण देऊन एकाच कुटुंबातील अनेक जण उमेदवार असणं ही गोष्ट बरोबर नाही असं कारण दिलं होतं. पण शरद पवार हे बोलतात एक आणि करतात वेगळंच. ते फक्त सांगायचं कारण होतं. अनेक कारणांपैकी अजित पवारांशी संबंधित एक कारण म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील अजितनिष्ठ नेत्यांनी सुरुवातीच्या प्रचारात रस दाखवला नव्हता. शिवाय अजित पवारांमुळे मोहिते पाटील देखील शरद पवारांपासून दुरावले होते. ही देखील मोठी आणि अत्यंत महत्त्वाची कारणं होती.

4. अजित पवारांचा आमदारकीचा राजीनामा.
2019 ची विधानसभा निवडणूक लागल्यावर शरद पवार यांना ईडीची नोटीस मिळाल्यावर तापलेल्या वातावरणात त्यांनी चांगलीच सहानुभूती मिळवली होती. मीडियावर देखील चांगलं कव्हरेज मिळत होतं.  पण कुठे माशी शिंकली आणि अचानक अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. पर्यायाने ईडीचा विषय मागे पडून सगळा फोकस अजित पवारांवर गेला आणि तिथंच मोठा घोळ झाला. शरद पवार मागे पडले व टीआरपी अजित पवारांनी काबीज केला.

5. शरद पवारांच्या निकटवर्तीय नेत्यांसोबत अजित पवारांचं कधीच जमलं नाही. मग ते छगन भुजबळ असोत, विजयसिंह मोहिते पाटील असोत, शशिकांत शिंदे, उदयनराजे भोसले असोत. शरद पवारांचं देखील अजित पवारांच्या निकटवर्तीय नेत्यांसोबत कधीच जमलं नाही. सुनील तटकरे असोत किंवा जिल्हा पातळीवर अजितनिष्ठ म्हणून ओळखले जाणारे दीपक आबा साळुंखे, सुनील माने, राजेंद्र चोरगे, सत्यजित पाटणकर व बबनदादा शिंदे (शरद पवारांच्या मोहिते पाटील प्रेमाने काही काळ अजितदादांच्या जवळ होते) असे मातब्बर नेते असोत. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात अजित पवार यांनी आपला वेगळा गट निर्माण केला हे विशेष. त्यासोबतच शरद पवार गटाच्या लोकांचं पद्धतशीर खच्चीकरण केलं. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत पंढरपूर मतदारसंघातून विजयसिंह मोहिते पाटील यांचा झालेला(केलेला) पराभव हे त्याचंच एक जिवंत उदाहरण.

या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर हा संघर्ष किती जुना आणि खोल आहे ते कोणत्याही विचार करणाऱ्या व्यक्तीस लक्षात येईल. राज्यशास्त्राचा विद्यार्थी म्हणून या सगळ्या गोष्टींकडे पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. शरद पवार हे अत्यंत मुरब्बी राजकारणी आहेत. ज्या पद्धतीने त्यांनी रोहित पवार यांचं लॉंचिंग केलंय त्याला तोड नाही. अजित पवारांनी त्यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यासाठी घाईगडबडीत संपूर्ण ताकद लावलेली असताना कोणताही गाजावाजा शरद पवारांनी खूप आधीच कर्जत जामखेड मतदारसंघ रोहित पवारांसाठी हेरून ठेवला होता. भविष्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रं रोहित पवारांच्या हातीच राहणार आहेत. कारण शरद पवार यांनी रोहित पवारांना 'लंबी रेस का घोडा' बनवून ठेवलं आहे. आत्ता अजितदादांच्या विधिमंडळ पक्ष नेतेपदी नियुक्तीने त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. आत्ता सहजपणे त्यांना पद देऊन रिलॅक्स ठेवण्यात आलं आहे आणि रोहित पवारांना पुढील खेळ्या खेळायला मार्गातील अडथळे कमी करून दिले आहेत.

No comments:

Post a Comment

गर्दी नियंत्रणाचे अडलेले घोडे

  मध्यंतरी महाराष्ट्रात दुर्दैवी अपघात घडला. मुंब्रा-दिवा स्टेशन दरम्यान दोन लोकल शेजारून जाताना त्यातील काही प्रवाशांचा रेल्वे ट्रॅकवर पडून...