राजकीय पक्षाचं मुखपत्र हे पक्षाची भूमिका कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याचं एक प्रभावी माध्यम असतं. आजकाल ते दुसऱ्यावर टीका करून जास्त प्रसिद्धी मिळवण्याचं साधन बनलंय. टीका करायला हरकत नाही. पण वर्षानुवर्षे साधी नालेसफाई नीट न करणाऱ्यांनी राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर दुसऱ्यावर टीका करणं म्हणजे रणजी खेळायची पात्रता नसणाऱ्याने आंतरराष्ट्रीय खेळाडूला शहाणपणा शिकवल्यासारखं होईल. शिवाय टीका करण्यात मुद्देसूदपणा लागतो, सोयीस्करपणा नव्हे. दुसरा बदललाय असं म्हणताना काळ व आपण किती बदललोय तेही बघावं लागतं.
मुंबई बाहेर डोकावून न पाहता शेतकऱ्यांचा येणारा कळवळा ढोंगीच आहे. ज्या जनतेच्या प्रश्नांवर आपण टाहो फोडतो तिथं आपले 5 पैकी 4 कॅबिनेट मंत्री थेट लोकांमधून निवडून आलेले नाहीत. शिवाय आपलं सल्लागार मंडळसुद्धा असंच. जनतेतून एक मत मिळवायची बुद्धी नाही. मतं मॅनेज करायची बुद्धी आहे हे मान्य. पण कॅमेरासमोर येताना आपण लाखोंचे प्रतिनिधी असल्यासारखं छाती फुगवून बोलायचं. इथं असं आहे की ठराविक लोकांनाच अनेक पदं मिळतात. शिवाय आपल्याला हा घराणेशाहीचा शाप. याच शापातून आणि नको त्या 'उद्धट'पणातून बाहेर पडलं पाहिजे. कारण जो मित्रासोबत भावालाही दुखावतो तो जनतेला काय सुखावणार?
जनतेला महत्व दिलं पाहिजे. पण त्यासाठी गुंडगिरी करण्याची आवश्यकता नाही. आपण जो हिंदुत्वाचा टिळा लावल्याचं सांगतो तो आता खरंच भगवा राहिलाय असं वाटत नाही. तसंही आज विकासावर राजकारण करायचे दिवस आहेत. धर्मांधतेचे नाहीत. ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे नव्हे तर ज्वलंत टीकेचा भडिमार करणारे दैनिक आहे असं खेदानं म्हणावं लागेल. आपली भूक भागल्यावर या टिकेपासून 'यू टर्न' घेतलेली अनेक उदाहरणं आहेत. त्यामुळं टीका करण्याला अर्थ रहात नाही. अशाने टीका करणाऱ्याचाच मुखभंग होतो. मुखपत्रातून होणारा हा सततचा मुखभंग टाळला पाहिजे. तरच सैनिकांत आदर वाढेल. अन्यथा सैनिकसुद्धा 'उद्धट' म्हणू लागतील. फार बोलण्यात अर्थ नाही. मुद्दा कळणं महत्वाचं.
No comments:
Post a Comment