Tuesday, 9 May 2017

'आप'ची अ'विश्वासा'र्हता

जनतेला भ्रष्टाचारमुक्त देशाचं स्वप्न दाखवून आम आदमी पक्षाची स्थापना झाली. खरं तर ती स्थापना म्हणजे आंदोलनातून निर्माण झालेली सत्तेची भूक होती हे आता स्पष्ट होतंय. असं म्हणायचं कारण म्हणजे सध्या सुरू असलेल्या अनेक घटना. कोणी पैसे घेतले किंवा नाही हा वेगळा मुद्दा आहे. पण आरोप होणं ही गंभीर बाब आहे. संसदीय सचिव नेमण्याचा वाद असेल, यादव-भूषण यांची गच्छंती असेल किंवा अगदी परवाचा MCD मधील पराभव असेल. आम आदमी पक्ष बाहेरून वादग्रस्त होताच. पण तो आता लाच आणि आमदारांच्या आरोपांमुळं आतूनही वादग्रस्त झालाय.
तपशिलात विश्लेषण करू. या सगळ्याला सुरुवात कुठून झाली? आंदोलनाचा फायदा घेऊन त्या लाटेवर स्वार होत (कारण दिल्ली बाहेर यांची डाळ शिजली नाहीये) यांनी राजकीय पक्ष काढला खरा, पण आंदोलन चालवणं आणि राजकीय पक्ष चालवणं यातला फरक त्यांना कधी कळालाच नाही. पक्ष चालवायचा तर संघटना लागते, 'सिलेक्ट कमिटी' नाही. या लोकांनी अपरिपक्वतेचा तर कहरच केला. दिल्लीच्या सत्तेतून 49 दिवसांत पळ काढणं हा त्यातलाच एक प्रकार. सत्तेत येऊनसुध्दा रात्रभर रस्त्यावर आंदोलनं करत बसायचं, रोज राज्यपालांबद्दल गळे काढायचे, काही घडलं की मोदींचं नाव घ्यायचं असले प्रकार केले. जे अधिकार आहेत ते वापरण्याऐवजी नसलेल्या अधिकारांवरून भांडणं काढली. एकूण काय की अपेक्षा उंचावून लोकांचा अपेक्षाभंग केला.
हा पक्ष स्थापन झाला तेव्हा जणू काही नवी गंगा उगम पावलीय या अविर्भावात अनेक लोक तिकडं जाऊन सामील झाले. पत्रकार, डॉक्टर, वकील असे अनेक लोक परिवर्तनाच्या स्वप्नासहित इथं दाखल झाले. त्यातले अनेक आज गायब आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. या पक्षाचं तर प्रस्थापित पक्षांपेक्षा वाईट झालंय. याचं मुख्य कारण म्हणजे राक्षसी बहुमताची सत्ता डोक्यात गेली आणि त्यामुळं पराभव पचेनासे झाले. बहुमत असलं तरी एकी कायम ठेवायला लागते.
एक गोष्ट खेदाने नमूद करावी लागेल. ज्या प्रस्थापित पक्षांच्या विरोधात यांनी दंगा केला त्याच पक्षांचे जमेल तेवढे वाईट गुण तेवढे घेतले. उदाहरणार्थ, कुठल्याही लोकांचं इनकमिंग करून घेतलं आणि कधीच बालहट्ट सोडला नाही. सुज्ञास याचा अर्थ नक्की कळेल. काहीही असो पण आम आदमी पक्ष आतून पोखरला गेलाय हे मात्र नक्की. यातून बाकीच्या पक्षांनी एक संदेश घेतला पाहिजे. प्रखर व्यक्तीविरोध, नकारात्मक राजकारण आक्रस्ताळेपणा हा तुमच्या पक्षाला अस्ताकडे घेऊन जाऊ शकतो. काहीच काम करणाऱ्यांना निष्क्रिय म्हणतात. पण लोकांना आम्हीच जगावेगळे आहोत हे दाखवण्याचा ढोंगी प्रयत्न तुमची असलेली विश्वासार्हता लयाला घेऊन जातो. हा 'विश्वास' 'आप'नं गमावलाय हेच खरं.

No comments:

Post a Comment

गर्दी नियंत्रणाचे अडलेले घोडे

  मध्यंतरी महाराष्ट्रात दुर्दैवी अपघात घडला. मुंब्रा-दिवा स्टेशन दरम्यान दोन लोकल शेजारून जाताना त्यातील काही प्रवाशांचा रेल्वे ट्रॅकवर पडून...