Friday, 6 October 2017

'संताप'जनक 'राज'कारण


गेल्या आठवड्यात एल्फिन्स्टन रोड स्थानकावरील रेल्वे पुलावर चेंगराचेंगरीमध्ये 23 लोक मृत्युमुखी पडले आणि सुमारे 40 लोक जखमी झाले. या दुर्दैवी घटनेतून बोध घेऊन चांगल्या उपाययोजना करून असे संभावित प्रसंग कसे टाळता येतील याचा विचार किंवा चर्चा घडली पाहिजे. किमान अशी सुरुवात झाली तर चांगलं घडण्याची अपेक्षा बाळगायला अधिक वाव असतो. पण इतकी गंभीर घटना घडल्यावरसुद्धा आपले राजकीय पक्ष फक्त राजकारण करण्यात मग्न आहेत. दिवसेंदिवस जणू काही खालच्या पातळीवर उतरायची स्पर्धाच लागली आहे.
मुळात मुद्दा आहे सरकारच्या भूमिकेचा. खरी मेख तिथंच आहे. सरकारसोबत प्रशासनसुद्धा दिरंगाईत तितकेच कारणीभूत असते. पण सरकारमध्ये बसलेल्या लोकांचं कर्तव्य आहे की मुंगळ्यासारख्या चिकटलेल्या बाबूशाहीला कामाला लावणं. इतर 'विशेष' वेळी बाबूशाही आपल्या तालावर नाचवण्याचं कौशल्य बाळगणाऱ्या राजकारण्यांनी लोकहिताच्या कामांवेळी बाबूलोक ढिम्म कसे राहतात याचं उत्तर दिलंच पाहिजे. सत्तेसोबत माणसं बदलली आहेत याचा अनुभव नागरिकांना आला पाहिजे. नाहीतर माणसं नव्हे तर फक्त मुखवटे बदलल्यासारखंच वाटेल. मुखवटे नाही तर व्यक्ती आणि प्रवृत्ती बदलण्यासाठी लोकांनी मतदान केलं होतं. मुळात सरकारनं काम नीटपणे केलं तर असल्या लोकांना मिळणारं फुकटचं महत्व कमी होईल आणि यांची 'दुकानं' सुद्धा बंद होतील.
आता प्रश्न सत्ताधारी पक्षांचा. भारतीय जनता पक्षाचे खासदार सत्तेत नसताना फुटपट्ट्या लावून प्लॅटफॉर्म आणि लोकलच्या उंचीमधला फरक मोजण्यात प्रचंड रस घेत होते. किमान दुर्घटना घडल्यानंतर तरी त्यांनी सक्रिय होणं आवश्यक होतं. लोकांचे प्रश्न हे प्रश्नच असतात. मग सत्तेत असो वा नसो. त्याची जाणीव ठेवावीच लागते. किमान नेत्यासोबतच आपल्यालाही निवडून दिलंय याचं भान ठेवायचं असतं. नंतर सत्ता गेल्याचा शोक करून काहीच फायदा नसतो. कारण तेव्हा फक्त हातात फुटपट्टीच राहते. तीच घेऊन फिरायची वेळ येते मग. तसंच पक्षाच्या राज्य पातळीवरील कोणत्याही नेत्यांनी या घटनेबाबत विशेष रस घेतलेला नाहीये.
शिवसेनेच्या बाबतीत बोलायचं झालं तर घटनेच्या आधी त्यांनी जी तळमळ दाखवली होती त्याबद्दल त्या खासदारांचं अभिनंदन केलं पाहिजे. त्यांनी परिस्थितीची दखल घेऊन सरकारपर्यंत मागणी पोहोचवली होती. पण घटनेनंतर त्यांनी ज्या प्रकारचा धिंगाणा घातला तो म्हणजे अपरिपक्वतेचं प्रदर्शन होतं. घटना काय घडली आहे, आपण वागतोय काय याचं थोडं तरी भान बाळगलं पाहिजे. कारण शेवटी त्रास सामान्य नागरिकांना होतो. नंतर मग दावा करतात की आमच्या सैनिकांनीच जखमींना मदत केली वगैरे वगैरे. केली असेल तर चांगली गोष्ट आहे. पण असल्या आततायीपणाने चांगल्या गोष्टी झाकोळून जातात.
बाकी विरोधी पक्षांबद्दल न बोललेलंच बरं. एका पक्षाचे आमदार तर नेहमी चवताळलेल्या अवस्थेतच असतात. आक्रमकता आणि आक्रस्ताळेपणा यातला फरक माहित नसला की असं होतं. प्रश्न सोडवण्याऐवजी यांचा वेळ आरडाओरडा करण्यातच जातो. आंदोलन म्हणजे कार्यकर्ते कमी आणि पत्रकार जास्त अशीच स्थिती होती. तसंच राष्ट्रीय पक्ष काँग्रेसचं कोणतंही तरुण तुर्क नेतृत्व साधं फिरकल्याचं दिसलं सुद्धा नाही. नुसतंच तरुण असून चालत नाही. सत्ता आणि मंत्रिपदं गेली म्हणून काहीच करायचं नाही असं नव्हे ना. मग बाकीचे परवडले की. किमान फुटपट्टी तरी घेऊन फिरायचे.
आता राहिला प्रश्न अजून एका सक्रिय झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा. एखादी बंद पडलेली गोष्ट अंशतः जरी सुरू झाली तरी वापरणाऱ्याला हुरूप येतो. त्यातला प्रकार या पक्षाचा झाला आहे. जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवायचा हे ठीक आहे. पण नुसताच आवाज करून चालत नाही. घटना घडल्यावर पत्रकार परिषद काय मोर्चा काय? लगेच त्यावर पाठपुरावा करणारी माणसं हुडकून काय आणली. आदल्या दिवशी त्या माणसांनासुद्धा माहित नसेल की उद्या आपला वापर करतील. नेहमी हिंसक धमक्या द्यायच्या. उधळून लावू, खळ्ळ खटॅक-बिटॅक असल्याच भाषा वापरायच्या. कामाच्या दिवशी लोकं गोळा करायची, रस्ते अडवून ठेवायचे आणि मग गुजरात्यांनी धंदा केला म्हणून हिणवायचं. तुमची पोरं फक्त तोडफोडच करत बसले धंदा कधी करणार? मोर्चातलं भाषण पाहिलं तर 5 मिनिटं सुद्धा त्यादिवशीच्या विषयावर नव्हती. हेच ऐकवायचं होतं तर दुसऱ्या विषया आडून रस्त्यावर येण्याची गरज नव्हती. खरं तर या मुद्द्यावर या पक्षानं काहीतरी स्थायी उपाय सरकारला किंवा लोकांना देण्याचा प्रयत्न केला असता तर ते जास्त कौतुकास्पद ठरलं असतं. फेरीवाले कुठं जातील याचं उत्तर नाहीये. ते सुद्धा नागरिकच आहेत. एकाला वाचवण्यासाठी दुसऱ्याला मारणं हाच उपाय असू शकत नाही. इथं मुंबईसारखी शहरं आपल्याच देशाच्या नागरिकांचा भार पेलू शकत नाहीत आणि इथं परदेशी घुसखोर रोहिंग्यांसाठी आग्रह धरला जातो हे दुर्दैवी आहे.
राजकारण नेहमी गोष्टी कशा चांगल्या होतील यावरून व्हायला पाहिजे. आपल्याकडं अशा मेलेल्या लोकांवर वा मरण येऊ घातलेल्या परिस्थितीवर राजकारण होतं. जे अतिशय संतापजनक आहे. एकत्र येऊ, चांगली चर्चा तरी करू. राजकारण करायला हजार मुद्दे असतात. पण महत्वाच्या गोष्टींवर चुकीच्या दिशेनं राजकारण करून समाजाचं भलं झाल्याचं इतिहास सांगत नाही. तुम्ही पद्धत बदला देश बदलेल. हे तेव्हाच होईल जेव्हा असलं सर्वसामान्यांना संतापजनक असणारं राजकारण बंद होईल. हे सर्वच पक्षीयांना लागू आहे.

No comments:

Post a Comment

गर्दी नियंत्रणाचे अडलेले घोडे

  मध्यंतरी महाराष्ट्रात दुर्दैवी अपघात घडला. मुंब्रा-दिवा स्टेशन दरम्यान दोन लोकल शेजारून जाताना त्यातील काही प्रवाशांचा रेल्वे ट्रॅकवर पडून...