काल एका परिचितांसोबत गप्पा सुरु होत्या. नेहमीप्रमाणे विविध विषयांवर चर्चा करत होतो. दिवाळीची खरेदी झाली का इथं चर्चा आली. मी म्हणलं,"किरकोळ खरेदी केलीय. थोडे फटाके घेतो दरवर्षी तेवढे घ्यायचे राहिलेत." तर ते म्हणाले की यावर्षी फटाके घेणार नाहीये. मी गमतीनं म्हणलं त्यांना,"पर्यावरण खूपच मनावर घेतलंय तुम्ही." त्यावर ते म्हणाले,"आमच्याकडं एक कामवाल्या बाई 3-4 वर्षांपासून काम करतात. 5 आणि 7 वर्षांची दोन मुलं आहेत. दरवर्षी त्यांना दिवाळीच्या 15 दिवस आधी बोनसचे पैसे देतो जेणेकरून त्यांना दिवाळीच्या आधी सर्व खरेदी करता यावी. परवा सहज कामवाल्या बाईंना विचारलं की झाली का दिवाळीची खरेदी? मुलांना कपडे वगैरे घेतले का?" त्या बाई म्हणाल्या,"दादा, मागच्या महिन्यात नवऱ्याला दवाखान्यात ऍडमिट केलं होतं तर खूप खर्च झाला. त्यामुळं यावेळी बोनसचे पैसे साठवले आहेत. कोणालाच नवीन कपडे घेणार नाही." ते गृहस्थ म्हणाले,"मोठ्या माणसांचं ठीक आहे पण किमान मुलांना तरी घ्या नवीन कपडे. लहान मुलांना अप्रूप असतं दिवाळीत नवीन कपड्यांचं. किती खर्च येईल ते सांगा. माझ्याकडून घ्या पैसे." मग ते गृहस्थ मला म्हणाले,"ती रक्कम त्या कामवाल्या बाईंना दिली. आणि मनात म्हणलं की यावर्षीची आपली फटाके खरेदी झाली. फटाके उडवून 2 मिनिटात त्याचा धूर करणार. पण एखाद्याच्या घरात चैतन्य आलं तर ते आपल्या मनात चिरकाल टिकेल." मी त्यांना म्हणलं की खूप छान केलं तुम्ही. उशीर झाला होता. त्यांना नमस्कार केला व म्हणलं की तुमचे असे विचार मला नेहमीच खूप काही शिकवून जातात. लोभ असावा. एवढ्या चर्चेनंतर मी निघालो तिथून.
गाडीवरून घरी येताना डोक्यात विचारचक्र सुरू झालं. कसल्या परंपरांच्या गप्पा मारतो आपण? आज आपल्या देशातील लोक कोणत्या स्थितीत आहेत आणि आपले बरेच लोक आत्मकेंद्रित विचारातच अडकले आहेत. मी फटाके घेऊन त्याचं धुरापेक्षा काही वेगळं होणार नाहीये. सण साजरा करणं म्हणजे नक्की काय असतं? त्या उत्सवात सगळ्या समाजघटकांना सामावून घेणं म्हणजे सण साजरा करणं. प्रत्येकाच्या घरात सण साजरा झाला पाहिजे. एकट्यानं कुठलाच सण होत नसतो. घरी येइपर्यंत माझाही विचार पक्का झाला की आपलीही फटाक्यांची खरेदी म्हणजे एखाद्या घराचं चैतन्य असेल. विचार आला आणि अंमलबजावणी सुद्धा केली. जिथं गैरवापर होणार नाही याची खात्री होती तिथं ती 'सहकार्य रक्कम' पोहोचवली आणि दिवाळी खरेदीची सांगता केली. फटाके चांगले का वाईट हा इथं मुद्दाच नाहीये. फटाके खरेदी करून सुद्धा आपण मदत करू शकतो हा युक्तिवाद सुद्धा केला जाऊ शकतो. मला त्याबद्दल आक्षेप नाही. पण अजून एक चांगला मार्गही असू शकतो असं मला वाटतं. अशी 'सहकार्य रक्कम' एखाद्या खऱ्या गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचवू आणि दिवाळी साजरी करू. आपल्या दारात होणाऱ्या धूरापेक्षा एखाद्याच्या घरात सण आला तर ते सर्वोत्तम असेल. समाज राहिला तरच परंपरा वगैरे राहतील. यासाठी समाजाच्या प्रत्येक स्तरात आपला सण साजरा झालाच पाहिजे. एकात्मता वगैरे हीच असते. मग कोणत्याच धूराची आणि ढोंगी धर्म रक्षकांची गरज पडणार नाही. आपला समाजच आपल्या परंपरा व सणांना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवेल. जाळ धूर संगट जाण्यापेक्षा सणांचा प्रकाश सगळ्यांसोबत गेला तर ते सगळ्यात मोठं सेलिब्रेशन असेल. तोच खरा सणांचा प्रकाश आहे.

No comments:
Post a Comment