सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीमध्ये देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हिरो ठरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आपणच चुका करायच्या आणि त्याचे परिणाम अंगावर यायला लागले की मला त्रास होतोय तरी मी सहन करतोय असं बोलत सहानुभूतीचा उच्छाद मांडायचा ही नवीन पद्धत महाराष्ट्राच्या लक्षात आली. शिवाय आपल्या सरकारने कितीही घोडचूका केलेल्या असल्या तरी आपण त्यातले नाहीच आणि आपल्याला कोणाची गरज नाही अशा मस्तीत राहणं याला उन्मादच म्हणलं पाहिजे.
अर्थात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून हे उपद्व्याप महाराष्ट्राला आता नवीन राहिले नाहीत. मागे कोरोना काळात तसेच इतर नैसर्गिक आपत्तींमध्ये उद्धव ठाकरे केवळ घरात बसून मजा बघत आणि खूपच अंगावर आल्यावर केंद्राकडे बोट दाखवत असताना त्यांना त्यांच्या लाडक्या मीडियाकडून 'बेस्ट' ठरवलं गेलं. एखादी तगडी यंत्रणा यासाठी विशेषत्वाने कार्यरत असल्याशिवाय हे शक्य नाहीच. आमदार सोडून गेले ते तुमच्या नाकर्तेपणामुळे, तुमच्या घरात बसण्यामुळे, तुमच्या कच खाण्यामुळे आणि तुम्ही इकडे सहानुभूती गोळा करताय. विशेषतः पुरोगामी वर्गाला राहुल गांधी, शरद पवार यांच्यापेक्षा सध्या उद्धव ठाकरे यांचा पुळका येत आहे. अर्थातच कारण सोपं आहे, जी व्यक्ती जास्त ढोंग करेल ती पुरोगाम्यांना आपली वाटते हा आजवरचा इतिहास आहे. मुख्यमंत्र्यांनी 'वर्षा' हे शासकीय निवासस्थान सोडलं तर म्हणे किती नेमस्त, नम्र अशी विशेषणं दिली. पण मुख्यमंत्री मैदान सोडून पळाले हे यांना कळू नये यासारखा निर्बुद्धपणा नाही. आपल्या कर्माने घर सोडायची वेळ आली तर मिरवणूक कसली काढतात, फुलं कसली उधळतात? यापेक्षाही अधिक धोकादायक म्हणजे सकाळी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीने रात्री जमाव जमवून हे उद्योग करायचे असतात? हेच भाजपच्या कोणी केलं असतं तर काही विचारायची सोय नव्हती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एखादी गोष्ट केली तर त्याला इव्हेंट केला असं म्हणत संभावना केली जाते. मग उद्धव ठाकरे यांनी केलेला इव्हेंट होता की पराभवाचं जश्न होतं? ते तर केवळ सहानुभूती गोळा करण्याचं हत्यार होतं. महाराष्ट्रानं इतके हतबल, असहाय्य आणि सहानुभूती लाटणारे मुख्यमंत्री कधीच पाहिले नाहीत. काँग्रेसचे मुख्यमंत्री एकवेळ पक्षाच्या हातचं बाहुलं होते पण त्यांनी कधीच सहानुभूती गोळा केली नाही. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांच्या संबोधनात म्हणाले होते की माझ्या उद्धवला सांभाळा. त्यांना असं का म्हणावं वाटलं असेल ते गेल्या अडीच वर्षांत महाराष्ट्र अनुभवतोय. आजारी होतात तर पर्रीकर यांच्यासारखं काम करताना दिसला नाहीत पण केंद्राकडे जबाबदारी ढकलताना मात्र दिसलात. आजारी होतात तरी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या लोकांना भेटत होतात पण शिवसेनेच्या आमदारांना भेटायला महाग होतात.
शिवसेनेच्या निर्णय प्रक्रियेत कोण? सुभाष देसाई, अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर, संजय राऊत, प्रियांका चतुर्वेदी, नीलम गोऱ्हे, आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई आणि खुद्द उद्धव ठाकरे. यांच्यापैकी कोणीही थेट जनतेतून निवडून येऊ शकत नाही. सुभाष देसाई 2 वेळा आमदार होऊन पडले, आदित्य ठाकरे निवडून येण्यासाठी विधान परिषदेच्या दोन जागा 'कुर्बान' केल्या. यावरून आदित्य ठाकरे यांचा जनाधार लक्षात आला असेल. बाकी सगळ्यांच्या आमदारक्या आणि खासदारक्या केवळ विधानसभेत लाखो लोकांमधून मर मर काम करून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या जीवावर. पण कॅमेऱ्यासमोर कोण बोलणार? संजय राऊत. बाकीचे कॅमेऱ्यासमोर बोलले तर बंडखोर आणि राऊत बोलले तर शिवसेनेची भूमिका. ही यांची कार्यपद्धती. ज्या पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत लोकांमधून निवडून येणाऱ्या लोकांना स्थान देखील नाही तो पक्ष कोणते आणि कसे जनहिताचे निर्णय घेणार? ही काँग्रेसची कॉपीच आहे. शिवसेनेचे असे कित्येक लोक आहेत ज्यांनी रक्ताचं पाणी करून आपल्या भागात संघटना वाढवली. परिस्थितीमुळे कोणी रिक्षा चालवायचे वा अन्य कोणते काम करून आपला उदरनिर्वाह करायचे. त्यांना शिवसेनेमुळे मानसन्मान मिळाला आहेच. पण याचा अर्थ तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यांनी आणि सगळं फुकट बसल्या जागी मिळायची सवय असलेल्यांनी गरीब परिस्थितीतून संघर्ष करत वरच्या पदापर्यंत पोहोचलेल्या शिवसैनिकांच्या आत्मसन्मानावर घाला घालावा असं नाहीये ना. शिवसेनेच्या सन्मानासाठी वेगळी भूमिका घेतलेल्या आमदारांना तुमची लायकी काय असं बोलून स्वतःची सहानुभूती वाढवण्याचा उच्छाद मांडणे कितपत बरोबर आहे?
आजवर महाराष्ट्रातील कोणत्याही सरकारने जेवढ्या चुका केल्या नसतील त्यापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात घोडचूका महाविकास आघाडी सरकारने केल्या. वसुली, एसटी कर्मचाऱ्यांचा संप व आत्महत्या, अनियंत्रित लॉकडाऊन, पालघर साधू हत्या प्रकरण, विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबणे, कैद्यांना पॅरोलवर सोडणे, कोलमडलेली कायदा व सुव्यवस्था, बोगस बियाणं, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, आरक्षण घालवणे, एमपीएससीच्या परीक्षार्थींना त्रास देणे, पेपरफुटीचे प्रकरण, कोरोनाच्या वेळचा ढिसाळपणा, बदल्यांमधील राजकारण, कल्याणकारी योजनांना स्थगिती, तुरुंगात असणाऱ्या व्यक्तीला मंत्रीपदी ठेवणं, अशा असंख्य गोष्टी आहेत. यातल्या एकाही मुद्यावर सहानुभूती दाखवणाऱ्या एकाही पुरोगाम्याचे रक्त खवळू नये हा तर असंवेदनशीलपणाचा कळसच म्हणावा लागेल. 'ईडी'वर खापर फोडणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की झेपत नव्हतं तर भानगडी करायच्या नव्हत्या. तुम्हाला भीती वाटते कारण तुमच्या भानगडी आहेत. भाजपमधल्या लोकांवर संशय आहे तर करा तक्रारी. एवढं सरळ सोपं आहे. पण आपल्यावर अन्याय होतो असं भासवायचं आणि दुसऱ्या बाजूला मस्तीत राहायचं ही या सरकारची खासियत आहे. एवढ्या घोडचूका करून सुद्धा हे सरकार उन्मादात आहे.
शिवसेनेने भाजपसोबत दगाबाजी केली तेव्हा तो शिवसेनेचा स्वाभिमान म्हणून त्या घटनेला तमाम पुरोगाम्यांनी गळ्यातला दागिना म्हणून मिरवलं होतं. आणि आज शिवसेनेच्या लोकांनी नेतृत्वाच्या चुका सांगत त्यांची लायकी दाखवली तर तोच दागिना गळ्याला फास लावायला लागला. तेव्हा तो शिवसेनेचा अपमान, भाजपचा डाव असं म्हणत दुसऱ्यावर खापर फोडणं सुरू झालं. एवढं दुतोंडी तर कोणीच नसेल. महाविकास आघाडीचा सरकार नावाचा पोपट मेलेलाच आहे, फक्त तो अधिकृतरित्या कधी जाहीर होणार एवढंच बाकी आहे. ज्यांना सहानुभूती लाटायची आणि उन्माद करायचा त्यांना करू देत. लवकरच महाराष्ट्राची नवी सुरुवात होऊ घातली आहे तेव्हा यांचा उरलासुरला बाजार सुद्धा उठेल हे मात्र नक्की.
.jpeg)
nice one..!
ReplyDeleteपरखड आणि सत्य 👍👍👍
ReplyDelete