सन 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'आमचे पैलवान तेल लावून तयार आहेत पण राष्ट्रवादीकडे लढायला पैलवानच नाहीत' असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अवस्थेवर बोट ठेवलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 'मी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष असून पैलवानांबद्दल मला काय सांगता. महाराष्ट्रातील सगळ्या तालमी माझ्या अखत्यारीत येतात' असं वक्तव्य केलं होतं. आज मुद्दा राजकारणाचा नाही. मुद्दा हा आहे की राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष म्हणून शरद पवार आहेत कुठे? निमित्त आहे ते कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने सातारा इथं पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं. ज्या कुस्तीगीर परिषदेचं अध्यक्ष असण्याची शेखी राजकीय आखाड्यात शरद पवार मिरवतात, त्या कुस्तीकडे बघायलाच त्यांना वेळ नाही किंबहुना तो त्यांचा प्राधान्यक्रम नाही असं खेदाने नमूद करावं लागेल. इतिहास नेहमी लक्षात ठेवेल की पैलवान अडचणींना सामोरे जात होते आणि शरद पवार संजय राऊत यांच्यावरील 'ईडी' कारवाईची चिंता वाहत होते. संपूर्ण स्पर्धेदरम्यान खेळाडूंच्या गैरसोयीची नैतिक(?) जबाबदारी अध्यक्ष म्हणून घ्यायला हवीच. इतर वेळी पाठ थोपटून घेताना मजा येते तर चुकलेल्या गोष्टींना अनाथ करून किंवा दुसऱ्याच्या माथी मारून चालणार नाही.
स्वतंत्र भारतासाठी पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकणारे कुस्तीपटू खाशाबा जाधव यांची जन्मभूमी असलेल्या सातारा जिल्ह्यात तब्बल 60 वर्षांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली. खरंतर राज्यात दोन वर्षांनी होणारी स्पर्धा अधिक चांगली करता आली असती. पण स्थानिक संयोजकांनी सुरुवातीलाच पवार चरणी लोटांगण घातलं होतं. शरद पवार यांच्यामुळेच स्पर्धेचा मान साताऱ्याला मिळाला अशा अविर्भावात त्यांचे आभार वगैरे मानले गेले. त्यामुळे पुढे काय होणार याचा ट्रेलर दिसलाच होता. स्पर्धेचं यशस्वी आयोजन कमी आणि साहेबांचं कौतुक जास्त हा शिरस्ता येथेही पाळला गेला. स्पर्धेच्या वेळी पैलवनांचे जे हाल झाले ते अक्षम्य असेच आहेत. त्यांना ना झोपण्यासाठी गादी होती ना पिण्यासाठी पाणी. जिल्हा क्रीडा संकुलात येण्या-जाण्यासाठी गाड्यांची सोय केलेली असताना वेळेला गाड्या फरार असल्याने रिक्षाने यावं लागत होतं. रोज किमान 200-250 रुपये केवळ रिक्षासाठी द्यावे लागत होते. कर्मवीर भाऊराव पाटील वसतिगृहात सोय केलेल्या पैलवानांना तर चक्क सतरंजीवर झोपण्याची वेळ आली. उष्णतेची लाट असताना एका खोलीत चक्क 10-12 पैलवानांना कोंबण्यात आले. आयोजकांकडून होणारा एवढा त्रास कमी की काय तर डास देखील त्रास द्यायला धावून आले. ही 'मन की बात' नसून 'ग्राउंड की बात' आहे. माध्यमांनी देखील या बातम्या दिल्या होत्या. पण पवार प्रेमामुळे दिसल्या नसतील तर त्याला कोणी काही करू शकत नाही. एकंदरीत पाहता पैलवानांना प्रतिस्पर्ध्यांपेक्षा गैरसोयींचाच अधिक सामना करावा लागला. नैसर्गिक आपत्तीमुळे स्टेज कोसळणे वगैरे एकवेळ हातात नसते पण ज्या गोष्टी हातात होत्या त्या ढिसाळ नियोजनामुळे मातीमोल केल्या.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षे पैलवानांसाठी खूपच आव्हानात्मक होती. निर्बंधांमुळे महाराष्ट्रात मैदाने झालीच नाहीत. बार जोरात सुरू झाले पण निर्बंधांत शिथिलता आणल्यावर सुद्धा कुस्तीच्या मैदानांना महाविकास आघाडी सरकारने परवानगी दिली नाही. खुराकाचा तर प्रश्न होताच पण याचा परिणाम थेट पैलवानांच्या मनोधैर्यावर झाला. प्रसंगी उत्तर भारतात जिथं मैदाने होत होती तिथं पैलवानांनी हजेरी लावली. हार-जीत यापेक्षा त्यांना खेळ जिवंत ठेवायचा होता म्हणून एवढा खटाटोप केला. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात यशस्वी पैलवानांच्या भवितव्याकडे लक्ष दिलं जात नाही. सरकारकडून काही ठोस मदत होत नाही ही तक्रार आहे. पण कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षांना आपण सातत्याने सत्तेत असून देखील काहीच करावं वाटलं नाही हे खेदजनक म्हणावं लागेल. 2018 मध्ये सांगली व सातारा जिल्ह्यातील पैलवानांचा कुस्ती मैदान आटोपून येताना अपघाती मृत्यू झाला होता. केवळ 8 महिन्यांमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 मृत पैलवान व चालक यांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत केली होती. पण पवारांनी केवळ अध्यक्ष आहे हे ताठ मानेने सांगण्यापालिकडे काय केलं हा संशोधनाचा विषय आहे. काही केलं असेल तर एकूण सत्ता उपभोगलेला काळ आणि केलेलं काम याचं गुणोत्तर काय हे समजून घेतलं पाहिजे. आताही महाराष्ट्र केसरी बनलेल्या मल्लाला कुस्तीगीर परिषदेने रोख रक्कम द्यायची की स्थानिक संयोजकांनी हा मुद्दा प्रलंबित असताना देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन भाजपच्या वतीने नूतन महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यांना 5 लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. नियत आणि इच्छाशक्ती असेल तर काहीही करता येऊ शकतं. त्यामुळे खरे तेल लावलेले पैलवान देवेंद्र फडणवीस आहेत असं म्हणता येईल. पावसाने चिखल झाला म्हणून पवार अंतिम सामन्याला उपस्थित राहिले नाहीत अशा बातम्या दिल्या गेल्या. जर ते खरं असेल तर त्यांना खरंच पैलवान म्हणावं का आणि त्यांनीही तसा दावा करावा का? एक महिन्यापूर्वी स्वतः पवारांनीच अजून मी म्हातारा झालो नाही असं शिरूर येथे वक्तव्य केलं होतं.
खरंतर जो हाडाचा पैलवान असतो तो कधीच रणांगणातून पळ काढत नाही. स्वतःसोबत कुस्ती पाहणाऱ्यांचा देखील श्वास रोखून कुस्ती जिंकण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो. पण शरद पवार यांचा राजकीय इतिहास शड्डू ठोकून पळून जाण्याचा आणि प्रतिस्पर्ध्यांवर चढाई केलीच तर ती मागून करण्याचा आहे. पवारांनी आखाड्यात शड्डू ठोकून तिथून पळ काढण्याची उदाहरणं सातत्याने पाहायला मिळाली आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन केल्याचं श्रेय घ्यायचं पण अपयशाचं खापर इतर पक्षांवर फोडायचं. आपल्या वक्तव्यांपासून घूमजाव करायचे, दिलेल्या वचनांपासून फारकत घ्यायची. आखाडा अवघड वाटला की सोप्या आखाड्यात उडी घ्यायची आणि तिथं जिंकल्यावर पवार साहेब जिंकले अशी उदोउदो करणारी यंत्रणा तयार असतेच. त्यामुळे पळपुटेपणाची चर्चा फार होत नाही. माढा लोकसभा मतदारसंघातील पराभवाच्या भीतीने घेतलेली माघार, महाविकास आघाडीच्या अपयशापासून स्वतःला दूर ठेवणं आणि 'युपीए'च्या अध्यक्षपदाची आपल्याच पक्षामार्फत पुडी सोडून पुन्हा नाही म्हणायचं ही पळ काढण्याची काही ताजी उदाहरणं देता येतील. राजकारणात जी रडकथा सुरू आहे तीच कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष म्हणून कायम आहे हे ताज्या घटनेवरून दिसत आहेच. खेळाच्या संघटनांमध्ये आपले 'राजकीय खेळाडू' पेरायचे आणि खेळाचा 'खेळखंडोबा' करायचा ही काँग्रेसची जुनी खोड आहे. काँग्रेसच्या मुशीत तयार झालेल्या पवारांनी ही खोड अधिक पुढे नेली असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. अगदी जिल्हास्तरापासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंत अशी पोत्याने उदाहरणं आहेत. कारभार झेपत नसेल तर सोडून द्यावं आणि सक्षम उत्तराधिकारी बघावा. मातीत घाम गाळून मल्लविद्या आत्मसात करणाऱ्या तरुणांची अशी हेळसांड करणे चुकीचे आहे. नुसतं तेल लावलं, बाता मारल्या म्हणून कोण पैलवान होत नाही. तसं कोण करत असेल तर त्यांना 'बनावट' आणि 'ढोंगी' पैलवान म्हणतात.
.jpeg)

No comments:
Post a Comment