Tuesday, 4 April 2017

"काश्मीरियत, इंसानियत आणि जम्हुरियत"

भारताचे नंदनवन अशी ओळख असलेलं राज्य म्हणजे जम्मू-काश्मीर. पाकिस्तानला तिथं कधीच शांतता नांदू नये हेच अपेक्षित होतं आणि आजपर्यंत तसंच घडत आलं. ते राज्य आपलं आहे आणि घडतंय शत्रू राष्ट्राला हवं तसं. तीच आपल्यासाठी नामुष्कीजनक गोष्ट आहे. यातून बाहेर येण्यासाठीच माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी 'काश्मीरियत, इंसानियत आणि जम्हुरियत' हा नारा दिला होता. एक प्रकारे जम्मू-काश्मीरच्या जनतेला दिलेली साद होती. त्यानंतर तिथं विकास वेग घेऊ लागला. त्यात फुटीरतावादी सोडले तर सगळ्याच पक्षांचं योगदान आहे.
दुर्दैवानं मध्यंतरी बुऱ्हाण वणी सारख्या घटनांनी काश्मीर जास्तच धुमसत होतं. तेथील युवकांना देशाविरोधात भडकावलं जातं आणि मग आपल्याच सैन्यावर दगडफेक होते. काश्मीरची भौगोलिक परिस्थिती पाहता तिथं पहारा देणं अतिशय आव्हानात्मक आहे. पण काहीवेळा नागरिकच विरोधात जात असल्यामुळं ते अजून कठीण होतं. काश्मीरला नैसर्गिक देणगी असून देखील दहशतवादी कारवायांमुळं पर्यटनाला आळा बसला आहे.
दुसऱ्या बाजूला तिथं दळणवळणाच्या सुविधा मोठ्या प्रमाणावर वाढतायत. चिनाब नदीवरील रेल्वेपूल व चेनानी-नाशरी बोगदा ही काही ठळक उदाहरणं. अशा अनुकूल परिस्थितीचा तेथील युवकांनी सदुपयोग करून घेऊन नवा काश्मीर घडवला पाहिजे. आपल्याच सैन्यावर हल्ले करण्यापेक्षा दहशतवाद्यांवर हल्ले केले पाहिजेत. मगच खऱ्या अर्थानं आपलं काश्मीर दहशतवादमुक्त नंदनवन होईल. त्यासाठीच हा नारा...'काश्मीरियत, इंसानियत आणि जम्हुरियत'. या तत्वावरच समृद्ध काश्मिरची उभारणी होईल असा विश्वास वाटतो. सर्वच राजकीय पक्षांनी व स्थानिक नागरिकांनी याला साथ दिली तर स्वप्न लवकरच सत्यात येईल.

काश्मीरियत - काश्मिरी अस्मिता/वारसा
इंसानियत - मानवता
जम्हुरियत - लोकशाही

By Sanket
नंदनवनाचा राजकारणापलिकडं जाऊन घेतलेला संक्षिप्त वेध...

No comments:

Post a Comment

गर्दी नियंत्रणाचे अडलेले घोडे

  मध्यंतरी महाराष्ट्रात दुर्दैवी अपघात घडला. मुंब्रा-दिवा स्टेशन दरम्यान दोन लोकल शेजारून जाताना त्यातील काही प्रवाशांचा रेल्वे ट्रॅकवर पडून...